33 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeराजकीयनितिषबाबू भाजपची साथ सोडणार?

नितिषबाबू भाजपची साथ सोडणार?

टीम लय भारी : अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार

अरुणाचल प्रदेश मधील संयुक्त जनता दलाचे (जेडीयु) सहा आमदार भाजपने फोडून आपल्या कळपात घेतल्याने सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितिषबाबू (Nitish Kumar) कमालीचे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाने (राजद) थेट नितीशकुमार यांनाच साद घातली आहे. आमच्या बरोबर या, एक चांगले आणि भक्कम सरकार बनवू, असे आवाहन राष्ट्रीय जनता दलातर्फे करण्यात आले आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये संयुक्त जनता दलाचे सात आमदार होते. पण त्यातील सहा आमदार भाजपने फोडून आपल्या पक्षात घेतले. 60 विधानसभा सदस्य संख्या असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये आता नितीशकुमार यांच्या पक्षाचा एकच आमदार उरला आहे, तर भाजपची संख्या 48 वर पोहोचली आहे. या फोडाफोडीच्या भाजपच्या वृत्तीने नितीशकुमार प्रचंड नाराज झाले आहेत.

बिहारमध्ये सर्वात कमी आमदार असूनही भाजपच्या टेकुवर नितीशकुमार मुख्यमंत्री पदी आरूढ झाले असले तरी सर्व काही आलबेल नाही. सुरुवातीपासूनच बळेबळे नितिषबाबू यांना मुख्यमंत्रीपदी बसवल्याचे स्पष्ट चित्र दिसत होते. राष्ट्रीय जनता दल सर्वाधिक 75 जागा घेऊनही सत्तेपासून वंचित राहिला आहे. तर 74 जागी भाजप आमदार निवडून आले आहेत. केवळ 43 जागा जिंकून नितीशकुमार भाजपच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे सध्या त्यांची अवस्था एखाद्या शोभेच्या बाहुल्या सारखी झाली आहे. गृह खाते वगळता अन्य सर्वत्र भाजपचे वजनदार मंत्री असल्याने नितिषबाबू यांना मुक्तपणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या मातोश्रीचे निधन अलीकडेच झाले. पण नितीशकुमार यांनी त्यांना भेटून सांत्वन करण्याचेही टाळले. याची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

अरुणाचल येथील घटनेचे पडसाद आता बिहार मध्ये उमटू लागले आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी थेट नितिषबाबू यांनाच साद घालून आता आमच्याकडे या, अशी विनंती केली आहे. आजवरचा इतिहास पाहता नितीशकुमार यांनी अनेकदा लालू प्रसाद यादव यांच्याशी सोयीस्कर मिळतेजुळते भूमिका घेतली आहे. येत्या दोन दिवसात जदयुच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मिटिंग होत आहे. यावेळी ते नितिषबाबू राजेडीच्या प्रस्तावाला कसा प्रतिसाद देतात यावर बिहारचे आगामी राजकारण अवलंबून राहणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी