29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयमहाराष्ट्रातील राजकारणाची वाटचाल गुंडगिरीच्या दिशेने

महाराष्ट्रातील राजकारणाची वाटचाल गुंडगिरीच्या दिशेने

टीम लय भारी

मुंबई : गेल्या ४ दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये वेगवेगळे नाट्यमय असे दृश्य पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केलेली सुरतवारी ते आता गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेल मधून करण्यात येत असलेले शक्तिप्रदर्शन हे सर्व काही चित्रपटापेक्षा कमी नाही. बंडखोर आमदारांचा गट बैठका घेऊन सोशल मीडियाद्वारे आपले म्हणणे राज्यासमोर मांडत आहे, तर सत्तेत असलेले सत्ताधारी पत्रकार परिषद घेऊन आपली सत्ता कायम राहणार असल्याचे वारंवार सांगत आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राचे राजकारण गुंडगिरीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आता नेत्यांकडूनच एकमेकांना धमकी देण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण हे अगदी खालच्या थराला जात असल्याने आता हे राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी राज्याला कोणते दिवस पाहायला लावणार आहेत? याची चर्चा सामान्य जनतेमध्ये सुरु झाली आहे.

‘सरकारकडे बहुमत आहे की नाही, ते सभागृहात सिद्ध होईल. शिवसेनेचे जे आमदार बाहेर गेले आहेत, ते परत आल्यानंतर ते शिवसेनेबरोबर राहतील. विधानसभेत आघाडी सरकारचे बहुमत सिद्ध होईल.’ असे शरद पवार यांनी सांगितले. पण यावर उत्तर देताना बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी कायदे सांगत शरद पवार यांच्यावर थेट वार केला. तर ‘कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो!’ असे म्हणत प्रत्युत्तर दिले.

या सर्व प्रकरणात आता नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. शरद पवार हे आमदारांना सभागृहात येण्याबाबतची धमकी देत आहेत. आमदार हे सभागृहात तर येतीलच आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करतील, त्यांच्या केसालाही धक्का लागल्यास घर गाठणे कठीण होईल, अशी धमकी नारायण राणे यांनी शरद पवार यांना दिली आहे.

नारायण राणे यांनी शरद पवार यांना धमकी दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. ‘महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू, अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल… पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही.’

एकंदरीतच, हे राजकीय नाट्य आणखी किती दिवस सुरु राहणार आहे? सध्या असलेली ठाकरे सरकार कायम राहणार की, जाणार? एकनाथ शिंदे यांना त्यांच्या बंडखोरीचा फायदा होईल की तोटा? या बंडखोरीचा कितपत फायदा भाजपला होईल? यांसारखे अनेक प्रश्न सामान्य नागरिक जाणून घेण्यास उत्सुक आहे. परंतु सध्या सुरु असलेले धमकीचे राजकारण हे भविष्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा :

‘या ‘महाभारतामागे भारतीय जनता पक्षाचाच हात

अजित पवारांचा अजब दावा; म्हणे, एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचे बडे नेते नाहीत

EXCLUSIVE : एकनाथ शिंदेंची भूक वाढली, भाजपकडे केली मुख्यमंत्रीपदाची मागणी

बंडोपंतांच्या गोटातून परत आलेले आमदार खोटं बोलत असल्याचा तानाजी सावंत यांचा आरोप

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी