26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeराजकीयटोलच्या नथीने सरकारचा ठाकरे सेनेवर हल्ला

टोलच्या नथीने सरकारचा ठाकरे सेनेवर हल्ला

टोल संदर्भात मनसेने केलेले आंदोलन काही राज्यस्तरीय नव्हते. मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील टोलसाठी राज ठाकरे आक्रमक झाले. या आंदोलनाला  सरकारनेच हवा दिल्याची बाब लपून राहिली नाही. त्याला कारण आहे आगामी महानगरपालिका  निवडणुका. मुंबईत मनसेची हवा करून उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेची मतकोंडी करण्याचा हा प्रयत्न होता. असे असताना गेल्या काही दिवसात राज ठाकरे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका. नंतर त्यांची ‘सामीलकी’ ची भाषा यामुळे मनसे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलप्रकरणी मनसेशी साधलेली ‘जवळीक’ उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्रासदायक ठरते का, हे आगामी काळात कळू शकेल. पण मनसेचे नगरसेवक शिवसेनेने फोडले होते. याचे उट्टे मनसेला आगामी मुंबई महापालिकेत काढायचे आहे, ही बाब शिंदे यांनी हेरून राज ठाकरे यांचे वजन वाढवले, असेही बोलले जात आहे.

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची कितीही मैत्री असली तरी मुंबई महापालिकेत भाजपा एकनाथ शिंदे गटाबरोबर लढायला तयार असली तरी सोबत मनसे नकोय. उत्तर भारतीय मतदार भाजपाच्या प्रेमात आहे. आणि मनसेची उत्तर भारतीय बाबतची भूमिका भाजपला माहीत आहे. त्यामुळे त्यांना मनसेशी मैत्री नकोय. त्यामुळेच शिवसेना एकनाथ शिंदे गट जाळे विणून  बसला आहे.

ओबीसी आरक्षण, मराठा आंदोलन, मतदारसंघ पुनर्रचना, वाढवलेली प्रभाग संख्या कमी करणे अशा विविध मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात डझन याचिका प्रलंबित आहेत. त्यामुळे १४ महापालिका, ५ जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या आहेत. आमदार अपात्रतेची टांगती तलवार सरकारवर आहे. सत्ताधारी मंडळींनी केलेल्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला जनतेचा कौल आहे. हे सगळे पाहता यंदाची निवडणूक शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपला वाटते तितकी सोपी नाही.

विधानसभा किंवा त्याआधी महानगरपलिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणूक स्बबळावर जिंकणे हे भाजपचे टार्गेट आहे. मनसेला बरोबर घेतले तर आपली मूळची अमराठी व्होट बँक निसटण्याची शक्यता भाजपला आहे. शिंदे गट या निवडणुकीत फारसा यशस्वी होणार नाही हे या गटाला आणि भाजपला माहीत आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांना बळ प्राप्त झाल्यावर आपोआप ठाकरे यांच्या  शिवसेनेला नुकसान होईल. ही  शिंदे-फडणवीस यांची खेळी आहे. त्यात राज ठाकरे अलगद सापडले.

हे सुद्धा वाचा
कुछ कुछ होता है फक्त २५ रुपयात!
गाझामध्ये वीज, पाण्याशिवाय कसे जगतात लोक?
मंत्री अतुल सावेंच्या विभागाची कामगिरी न्यारी! कोट्यवधीच्या योजनांचा शेकडो विद्यार्थ्यांना लाभ


त्यामुळे येत्या काळात राज ठाकरे मराठी आणि मध्यमवर्गीय माणसांसाठी जी काही आंदोलने करतील, त्याला प्रत्युत्तर न देता ती निवडणुकीपर्यंत जिवंत ठेवत, ठाकरे यांच्या शिवसेनेची मते विभाजित करण्याचा प्रयत्न होणार आहे. गणेशोत्सवाआधी मनसेने मुंबई-गोवा  महामार्गावरील खड्डे  हा प्रश्न हाती घेऊन वातावरण निर्मिती केली. भाजपने एक दोन ठिकाणी आंदोलन करून मनसेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. गणेशोत्सव पार पडला. हा महामार्ग काही मार्गी लागला नाही.

मनसेही या प्रश्नावरून शांत झाली. हे सगळे पाहता, मुंबई आणि अन्य महापालिका आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मुख्य टार्गेट ठाकरे गटाची शिवसेना आहे. म्हणूनच की काय मराठी माणसाच्या मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी मनसेला बळ देण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, मनसेच्या पाच वर्षातील बदलत्या भूमिका पाहता दगाफटका होऊ नये याची पुरेपूर काळजी शिवसेना ठाकरे गट घेत आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी