32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयविश्वगुरू होण्यासाठी गांधी-नेहरूंची बदनामी - पूर्वार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)

विश्वगुरू होण्यासाठी गांधी-नेहरूंची बदनामी – पूर्वार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)

'गांधी - नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?' या नावाने 'लय भारी'ने नुकताच एक विशेषांक प्रसिद्ध केला आहे. या अंकात राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रातील ४५ पेक्षा जास्त नामवंत मान्यवरांनी लेख लिहिले आहेत. यांत शरद पवार, राजदीप सरदेसाई, भाऊ तोरसेकर, श्रीराम पवार, यशवंतराव गडाख, तुषार गांधी, राजू परूळेकर, प्रा. एन. जी. राजूरकर, कुमार सप्तर्षी, अशोक चौसाळकर, संजय आवटे, श्रीमंत माने, राजेंद्र साठे, अतुल भातखळकर, माधव भांडारी, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार, सत्यजित तांबे, चंद्रकांत दळवी, प्रभाकर देशमुख, प्रसाद काथे, बंधुराज लोणे, प्रमोद चुंचूवार, रफिक मुल्ला, प्रफुल्ल फडके, राजन वेळूकर, नाना पटोले, उल्हास पवार, , विश्वास काश्यप, राज कुलकर्णी, राजेश खरात आदींचा समावेश आहे. या अंकातील निवडक लेख आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. हा विशेषांक खरेदी करण्यासाठी संपादक श्री. तुषार खरात यांच्याशी ९८२१२८८६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

(शरद पवार) मराठी साहित्यातील विख्यात गीतकार-कवी ग. दि. माडगुळकरांनी एका कवितेत ‘भारतभूमी ही सीता-रघुत्तमाची, पार्थास बोध करणाऱ्या माधवाची, तथागत सिद्धार्थ गौतमाची आणि झुंझार शिवप्रतापी नरसिंहाची आहे’ असे म्हटले आहे. भारतदेशाच्या संस्कृतीचा, देदिप्यमान परंपरेचा आणि वैभवशाली इतिहासाचा आपल्या सर्वांनाच सार्थ अभिमान आहे. प्राचीन वैदिक काळापासून सांप्रत काळापर्यंत भारतात अनेक थोर विभूती, महात्मे आणि व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी भारताच्या जडणघडणीत, उत्कर्षात भर घातली. एत्तदेशीय व परदेशस्थ अभ्यासकांना भारताची ही ओळख माहीत आहे. तथापि मागील आठ दशकांहून अधिक काळापासून जगाच्या पटलावर भारताची ओळख एका महात्म्याच्या उल्लेखाविना अपुरी राहते. ती थोर व्यक्ती म्हणजे मोहनदास करमचंद गांधी !
महात्मा गांधी ही भारताची ओळख असल्याची साक्ष देणारे पुतळे आपल्याला जगभरात पाहायला मिळतात. जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका), वेस्टमिन्स्टर चौक, लंडन (इंग्लंड), वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्क (अमेरिका), मॉस्को (रशिया), माद्रिद (स्पेन), जिनिव्हा (स्वित्झर्लंड), ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) याशिवाय अर्जेंटिना, युगांडा, सुरीनाम असे कितीतरी देश या यादीत आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास महात्मा गांधी हे आजही भारताची अपरिहार्य अस्मिता आहेत. त्यामुळे महात्मा गांधींच्या योगदानाचे चिकित्सक मूल्यमापन करताना ‘त्यांनी भारताचे नुकसान केले’ या विधानाला कुणी गांभीर्याने घेणार नाही. आणि असे विधान करणारे पूर्वग्रहबाधित, कूपमंडूक वृत्तीचे अथवा उथळ व अर्धवट ज्ञानी समजले जातील.
महात्मा गांधी हे राजकीय व्यक्तिमत्व होते. परंतु ते केवळ व्यक्तिमत्व राहिले नाहीत तर ‘गांधी’ हा विचार (ism) झाला आहे. विचार हा अजरामर राहतो, कितीही सामाजिक–राजकीय उलथापालथी झाल्या तरी तो ऱ्हास पावत नाही. काळाच्या एखाद्या आवर्तनात तो अव्यक्त, सुप्त राहील परंतु, अनुकूल अथवा प्रतिकूल अशा दोन्ही परिस्थितीत तो कधीही फोफावू शकतो. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेचे अधिष्ठान असणारा दिलेला विचार ही जगाला दिलेली देणगी आहे. त्यामुळे महात्मा गांधींजींचे मूल्यमापन भारतीय परिप्रेक्ष्यात करण्याचा विचार हाच अविचारीपणा ठरेल. गांधी विचाराला निकोप कृतीशीलतेची जोड असल्यामुळे आणि त्यात व्यवहार्यता असल्यामुळे तो कालातीत ठरला आहे.

Mahatma Gandhi - Pandit Jawaharlal Neharu
‘गांधी – नेहरू यांनी देशांचं खरंच नुकसान केलं का ?’ हा विशेषांक खरेदी करण्यासाठी संपादक श्री. तुषार खरात यांच्याशी ९८२१२८८६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा

खरे पाहता भारताची देश म्हणून संकल्पना विकसित व्हायला ब्रिटिश राज्य कारणीभूत ठरले, असे म्हणायला वाव आहे. भारतात अनेक मोठमोठी साम्राज्ये होऊन गेली तरी देखील भारत हा खंडप्राय देश अनेक संस्थाने आणि राज्यांमध्ये विभागला गेला होता. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात विविध संस्थाने सहभागी झाली आणि बहुतांशी भारत एका सूत्रात बांधला जाऊ लागला. ब्रिटिशांचा एकछत्री अंमल सुरू झालेला ब्रिटिश इंडिया हा नेमस्त आणि जहालांसाठी राजकीय कॅनव्हास होता. नेमस्त धोरणाला विरोध करून लाल-बाल-पाल या त्रिमूर्तीने अखिल भारतात ब्रिटिशांविरूद्ध रान उठवले. या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेतील वांशिक भेदाभेदाविरूद्ध लढा दिल्याने जगपरिचित झालेले मोहनदास करमचंद गांधी ९ जानेवारी, १९१५ रोजी मुंबईच्या अपोलो बंदरात उतरले.
गांधीजी हे नामदार गोपाळ कृष्ण गोखलेंचे शिष्य असल्यामुळे ते नेमस्त वृत्तीचे आणि निरूपद्रवी राहतील, असा ब्रिटिशांचा देखील कयास होता. त्यामुळे ब्रिटिशांनी कैसर-ए-हिंद पदवीने त्यांना विभूषित केले. ब्रिटिशांसाठी ‘कैसर-ए-हिंद’ असणारे गांधी हेच पुढे देशाचे पिता अर्थात राष्ट्रपिता झाले. ही गांधीजींच्या जीवनाची यशस्वीता आहे. महात्मा गांधीजींनी भारतीय राजकारणात लागलीच उडी घेतली नाही. त्यांनी भारताची भ्रमंती केली. सामाजिक, सेवाभावी आणि आध्यात्मिक कार्यात लक्ष घातले. त्यामुळे ते नेमस्त आणि जहालांपासून समानांतर राहिले.

हे सुद्धा वाचा

लोकमान्य टिळकांनी मुस्लीमांना वेगळे मतदारसंघ दिले, पंडित नेहरूंनी ते काढून घेतले; गांधींनी मुस्लिमांचे फाजिल लाड केले नाहीत

PHOTO: …म्हणून पंडीत नेहरूंचा चाहतावर्ग जगभरात होता!

हा विशाल खंडप्राय देश एका सूत्रात बांधणे अशक्यप्राय काम होते. त्यांनी चरखा हाती घेतला. सूत उभे आणि आडवे जोडल्याशिवाय वस्त्र तयार होत नाही हे त्यांना चांगलेच अवगत होते. हा प्रयोग त्यांनी देश जोडण्यासाठी केला. देशातील उभी सामाजिक उतरंड जोडण्याचे काम त्यांनी हाती घेतले आणि विविध प्रांत पादाक्रांत करून भारत आडव्या भौगौलिक सूत्रात जोडण्यात ते गुंतले. राजकीयदृष्ट्या भारतदेश एका तलम वस्त्राप्रमाणे बांधला. १९४७ मध्ये देश भारत म्हणून स्वतंत्र झाला. गांधीजी खऱ्या अर्थाने राष्ट्राचे जनक (पिता) झाले. भारत-पाकिस्तान अशी फाळणी झाली तरी भारत एका सूत्रात बांधणाऱ्या निर्मिकाला नुकसानकर्ता म्हणणे हे पाप आहे.

Mahatma Gandhi Pandit Jawaharlal Neharu
या विशेषांकात देशभरातील मान्यवरांनी लेख लिहिले आहेत

गांधीजींना महात्मा उपाधी मिळाली तरीदेखील महात्मा गांधीच्या व्यक्तित्वातील दोष आणि उणिवा मांडल्या गेल्या आहेत. त्यात गैर असे काही नाही. परंतु, त्यामुळे देशाला हानी पोचली असा कुणी अर्थ काढत असेल तो मोठा प्रमाद ठरेल. ‘महात्मा गांधी भारताची फाळणी रोखू शकले नाहीत आणि त्यांनी पाकिस्तानला ५५ कोटी रूपये देऊ केले’ प्रामुख्याने हा दोष त्यांना दिला जातो. गांधीजींचा मारेकरी आणि टिकाकारांच्या मते महात्मा गांधींजींकडे देशाचे राजकीय नेतृत्व असताना देशाची फाळणी झाली. परंतु, गांधी, नेहरू , पटेल यांनी एकदाही फाळणीचे समर्थन केले नाही.
१९३०-३१ मध्ये काँग्रेसने संपूर्ण स्वराज्याची मागणी उचलून धरली. तशा स्वतंत्र भारताच्या कल्पना मनात आकार घेऊ लागल्या होत्या. मात्र त्याचवेळी हिंदू बहूसंख्य असणाऱ्या देशात मुस्लिमांना कायम दुय्यम स्थानावर राहावे लागेल ही भावना बॅरिस्टर जीनांमध्ये बळावली. मुस्लीम लीगच्या १९४० मधील अधिवेशनापासून बॅरिस्टर जीनांनी द्विराष्ट्र संकल्पनेचा जोरदार पुरस्कार सुरू केला. त्याचप्रमाणे हिंदू संघटना ‘भारत हे हिंदूराष्ट्र व्हावे’ म्हणून चळवळ उभारत होत्या. गांधी-नेहरूंना अभिप्रेत असणारा निधर्मवाद (सेक्यूलर) हा सम्यक आणि व्यवहार्य मार्ग होता. परंतु, हिंदू-मुस्लीम दरी वाढत गेली. त्यात जीनांनी १६ ऑगस्ट १९४६ हा प्रत्यक्ष कृती दिन पुकारल्यानंतर भारतातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली. बंगाल, पंजाब, बिहार प्रांतात हिंदू-मुस्लीम समाजामध्ये प्रचंड दंगली झाल्या. एकट्या कलकत्ता शहरात ७२ तासांत ४ हजारांवर बळी गेले. रावळपिंडी, कलकत्ता, नौखाली भागातील हिंदू तसेच मुस्लिमांनी जे भोगले त्याचा दाहक इतिहास वाचला तर भारताची फाळणी ही परिस्थितीनुरूप अपरिहार्यता झाली होती, हे कुणीही मान्य करेल.
दुसरी बाब अशी की, नव्याने अस्तित्वात आलेल्या पाकिस्तानला रचनात्मक कामासाठी आणि आर्थिक स्थैर्यात मदत व्हावी म्हणून ७५ कोटी रुपये देणे हे काँग्रेस-मुस्लीम लीगमध्ये ठरलेले होते. ते नंतर नाकारणे यात सुज्ञता नव्हती. यापैकी २० कोटी रुपये पाकिस्तानला दिले होते. त्यामुळे उर्वरित ५५ कोटी रुपये देण्यावरून महात्मा गांधीना दोषी ठरविण्याची काही कडव्या गटांनी भूमिका घेतली. महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांनी देखील त्यांच्या दुष्कृत्याचे समर्थन करण्यासाठी हे कारण सांगितले. सध्या महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांचे गोडवे गाणाऱ्या कडव्या घटकांनी पुन्हा डोके वर काढले आहे. एकीकडे नथुराम गोडसेचा जयजयकार होत असताना महात्मा गांधींविरूद्ध उघड भूमिका घ्यायला मात्र सत्तास्थानातील शक्ती कचरतात. सांप्रत नेतृत्वाला महात्मा गांधीच्या प्रतिमेपुढे नतमस्तक व्हावे लागते. कारण गांधीजींची उपयुक्तता काय आहे हे ते जाणतात.

(लेखाचा उत्तरार्ध सोमवारी प्रसिद्ध केला जाईल)

(लेखक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी केंद्रात संरक्षणमंत्री आणि कृषिमंत्री म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावरही ते दीर्घकाळ होते.)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी