30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रचोरून केलेलं काम कोणतं, हे शिवसेनेनं आम्हाला शिकवू नये : आशिष शेलार

चोरून केलेलं काम कोणतं, हे शिवसेनेनं आम्हाला शिकवू नये : आशिष शेलार

लय भारी न्यूज नेटवर्क 

मुंबई : चोरून केलेलं काम कोणतं, हे शिवसेनेनं आम्हाला शिकवू नये. काळ्या गाडीतून जे नेते रात्री काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांना भेटायला जातात, त्यांनी कोणतं चांगलं काम केलं? असा चिमटा भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला काढला.

शेलार यांनी शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांच्यावर रविवारी तोफडागली. काँग्रेसशी संधान साधलं तर तो त्यांचा गोराबाजार आणि आम्ही बारामतीच्या पवारांशी सलगी केली ती म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही केलेला काळाबाजार? हे कसे काय असू शकते. असाही टोला आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. याबाबत शेतकरी, तरूण, गृहिणी, व्यापारी, उद्योजक अशा सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. आम्ही जनतेला मानणारे आहोत. महाराष्ट्राच्या जनतेला मी आश्वस्त करू इच्छितो की हे सरकार कालावधी पूर्ण करेल आणि जनतेच्या हिताचेच काम करेल, असा विश्वास भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

शेलार म्हणाले की, राज्यपाल कोश्यारी यांनी आम्हाला बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने याचिका केली आहे. त्याचा निकाल येईलच. पण, 170 पेक्षा जास्त मतांनी आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकू, असा दावाही आशिष शेलार यांनी केला.

राऊत यांना प्रत्युत्तर देताना शेलार म्हणाले की, ”शपथविधी भल्या पहाटे का केला, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी हे लक्षात ठेवावे की आम्ही सकाळी ६ वाजता शाखेत जाणारे स्वयंसेवक आहोत. हा रामप्रहर असतो. शपथविधी रामप्रहरी झाला. या वेळेत सगळी चांगलीच कामे केली जातात. पण, जे रामालाच विसरले त्यांना हे काय कळणार? असा चिमटा शेलार यांनी काढला. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरु असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी