29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रएका भावाच्या विजयासाठी, तर दुसऱ्याच्या पराभवासाठी बहिणीचा झंझावाती प्रचार

एका भावाच्या विजयासाठी, तर दुसऱ्याच्या पराभवासाठी बहिणीचा झंझावाती प्रचार

लय भारी न्यूज नेटवर्क : अजित जगताप

सातारा : राजकारणात टिकून राहण्यासाठी नातेवाईकांची मदत गरजेची असते. पण कधी कधी सख्खे भाऊ पक्के वैरी बनतात. अशाच वैरी बनलेल्या दोन भावांपैकी एकाच्या मदतीसाठी बहिण परिश्रम घेत आहे. शिवसेनेची उमेदवारी करणाऱ्या भावाला विजय मिळवून देण्यासाठी, तर भाजपची उमेदवारी करणाऱ्या भावाच्या पराभवासाठी सौ. सुरेखा पखाले ही बहीण माण – खटाव मतदारसंघात प्रचाराचा झंझावत निर्माण करीत आहे.

सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील माण – खटाव मतदारसंघात काँग्रेस मधून भाजपात जाऊन कमळ चिन्हावर निवडणूक लढविणारे आमदार जयकुमार गोरे व त्यांचे सख्खे बंधू सेनेचे उमेदवार शेखर गोरे हे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या प्रचार दौऱ्याला तुफान गर्दी जमत आहे. भाजप – सेनेची युती महाराष्ट्रात झाली असली तरी या मतदारसंघात भाजप व सेना प्रचारक एकमेकांच्या उमेदवारांचा चांगलाच उद्धार करू लागले आहेत. त्यात आता आमदार गोरे यांनी दहा वर्षात एवढी विकासकामे केली, पाणी आणले, रस्ते केले असे सांगत आहेत. त्यांनी कोणत्या पक्षात असताना विकास केला हे सांगण्यास ते नेमके विसरत आहेत. त्यांना कामाची इतकीच खात्री असेल तर एकेका मतासाठी माण – खटाव मतदारसंघात वाड्या वस्तीत कशाला  हिंडताय ? असा खोचक सवाल त्यांची सख्खी बहीण सौ. सुरेखाताई पखाले यांनी प्रचार सभेत करून आमदार गोरे यांच्या भाजपच्या कमळाच्या पाखळ्या खुडण्यास सुरवात केली आहे.

बिदाल जिल्हा परिषद गटातील महिलांशी संवाद साधण्यासाठी नणंद भावजय एकत्र येऊन सेनेचे शेखर गोरे यांचा दिमाखात प्रचार करीत आहेत. शेखर गोरे यांची पत्नी सौ. सोनलताई गोरे या सुध्दा आक्रमक पवित्रा घेत आहेत.  दहा वर्षे माण – खटावच्या जनतेने आमदार जयकुमार गोरे यांना साथ दिली आता विकास कामे केली असे सांगणारे गोरे यांनी पक्षाशी निष्ठा ठेवली नाही. त्यामुळे  त्यांचे कमळ  वाळूत नव्हे तर चिखलात ही उमलणार नाही. कॉग्रेसमधून पराभूत होऊ नये म्हणून त्यांनी भाजपचे उपरणे खांद्यावर घेतले आहे. कॉग्रेसच्या डीएनए सकट भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असा वार करून सौ. पखाले यांनी सेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या कामाचे कौतुक केले.

दुष्काळी भागात पाणी आणलय  मग अजून पाण्याचे टँकर कसे सुरू होते ? असाही प्रश्न उपस्थित केला आहे. या महिला मेळाव्याला मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होत्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी