29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeटॉप न्यूजउद्धव ठाकरेंचा अजित पवारांना खोचक टोला, डोळ्यांत अश्रू आणून शेती करायचं म्हणताय...

उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना खोचक टोला, डोळ्यांत अश्रू आणून शेती करायचं म्हणताय पण धरणांत पाणी कुठंय ?

लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : त्या दिवशी अजित पवारांच्या डोळ्यात अश्रू आले. आम्ही मगरीच्या डोळ्यातील अश्रू पाहिले होते. अजित पवारांचे हे नक्राश्रू. राजकारण खालावले म्हणून शेती करणार असे अजित पवार म्हणतात. पण धरणात पाणी नाही, मग शेती कशी करणार असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला. शिवाजी पार्क येथे आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते.

ठाकरे पुढे म्हणाले, ज्यावेळी शेतकरी धरणात पाणी सोडा म्हणत होते. त्यावेळी तुम्ही त्याकडे लक्ष देत नव्हता. आता कर्माने तुमच्यावर ही वेळ आली आहे. शिवसेनेशी काँग्रेस – राष्ट्रवादी जशी वागली तीच वेळ तुमच्यावर आली आहे. आई जगदंबा हे करतेय.

उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना खोचक टोला, डोळ्यांत अश्रू आणून शेती करायचं म्हणताय पण धरणांत पाणी कुठंय ?

शरद पवारांना ईडी घाबरली अशी चर्चा झाली. शरद पवार, अजित पवार यांच्याबाबत सुडाने राजकारण चालू आहे असे आरोप केले जात आहेत. त्यात खरे असू शकेल. पण सुडाचे राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्र कधी माफ करीत नाही. तुम्ही 2000 साली शिवसेनाप्रमुखांवर कोणता खटला दाखल केला होता. 15 दिवस जनतेला छळले. सेनाप्रमुख आज अटक होणार, उद्या अटक होणार अशा अफवा पसरायच्या. शाळा – कॉलेज सोडावी लागायची. त्यावेळी बाबरी मशीद पडली अयोध्येत पण दंगल घडली मुंबईत. बॉम्बस्फोट झाले मुंबईत. त्यावेळी सुधाकर नाईक – शरद पवार यांचेच सरकार होते. त्यावेळी शिवसेनेनेच हिंदूंना वाचवले. सरकारने ‘सामना’चा जुना अग्रलेख शोधून काढला आणि शिवसेनाप्रमुखांवर गुन्हा दाखल केला. हिंदूंना वाचवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करता ही तुमची औलाद. शिवसेनाप्रमुखांवर गुन्हाच होऊ शकत नाही असे कोर्टाने सांगितले होते याची आठवण उद्धव यांनी करून दिली.

शिवसेना कुणा समोर वाकत नाही. मरेन नाहीतर मारेन ही शिवसेनेची जातकुळी आहे. आम्ही भाजपसोबत युती केली. नाहीतर काँग्रेससोबत करायला हवी होती का ? असाही सवाल उद्धव यांनी केला.

काँग्रेस – राष्ट्रवादीचे टार्गेट आम्ही आहोत, तोपर्यंत आमचे टार्गेट सुद्धा तेच असतील. काँग्रेस – राष्ट्रवादी थकून गेल्याचे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. तुम्ही तर गेली 60 वर्षे खाऊन खाऊन थकले आहात. एवढ्यात थकू नका. आमच्या विजयाचे पेढे खाण्यासाठी तयार राहा. सोनिया गांधी की शरद पवार तुमचे नेते नक्की कोण आहेत, असाही सवाल उद्धव यांनी सुशीलकुमार शिंदेंना केला.

राम मंदिर हे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न आहे. अमित शाहांना मी सांगतो बांगलादेशींना हाकलून लावा. समान नागरी कायदा अंमलात आणा. जाती धर्मभेद नको. 50 वर्षानंतर सेनाप्रमुखांचे विचार जगाने स्विकारले. ट्रम्पने स्विकारले. भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य द्यायचा निर्णय ट्रम्पने घेतला. काँग्रेस – राष्ट्रवादीने आता त्यांच्या जाहिरनाम्यात 80 टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्यांत प्राधान्य द्यायचे आश्वासन दिले. तुम्ही बेरोजगार झाल्यानंतर तुम्हाला हे सुचते. पण याच मागणीसाठी शिवसैनिक आंदोलने करायचे. त्यामुळे तुम्ही शिवसैनिकांना मारहाण करायचा. त्यांना सोलून काढायचा. आता तुम्ही स्वतः बेरोजगार झाल्यानंतर तुम्हाला हे सुचत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी