33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeटॉप न्यूजअमिताभ बच्चन यांनी शिवाजी महाराज अनादरप्रकरणी मागितली माफी

अमिताभ बच्चन यांनी शिवाजी महाराज अनादरप्रकरणी मागितली माफी

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : तमाम महाराष्ट्रातील जनतेचे आराध्यदैवत असलेल्या शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दांत उल्लेख करणे सोनी टिव्हीला महाग पडले आहे. शिवप्रेमींमध्ये उसळलेल्या संतापाची दखल घेत सोनी टिव्हीच्या वतीने अमिताभ बच्चन यांनी अखेर माफी मागितली आहे. मालिका निर्माते सिद्धार्थ बसू यांनीही माफी मागितली आहे.

अमिताभ बच्चन यांनी शिवाजी महाराज अनादरप्रकरणी मागितली माफी
सोनी टिव्ही कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती.

अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करीत असेल्या सोनी टिव्हीवरील असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख ‘शिवाजी’ असा एकेरी पद्धतीने करण्यात आला होता. स्क्रीनवर ‘इनमें से कौनसे शासक मुगल सम्राट औरंगाबाद के समकालीन थे ?’ असा प्रश्न लिहिलेला होता. त्यासाठी A. महाराणा प्रताप, B. राणा सांगा, C. महाराजा रणजीत सिंह व D. शिवाजी असे चार पर्याय देण्यात आले होते. विशेष म्हणजे, या प्रश्नात व त्यांच्या पर्यायांतील एकूण चार ऐतिहासिक महापुरूषांबद्दल आदरार्थी उल्लेख केला होता. मात्र एकट्या शिवाजी महाराजांबद्दलच एकेरी उल्लेख केला होता. कळस म्हणजे, हा प्रश्न वाचताना स्वतः अभिताभ बच्चन, स्पर्धक व या स्पर्धकाला मदत करणारा तज्ज्ञ या तिघांनी बोलताना सुद्धा शिवरायांचा उल्लेख एकेरीच केला होता. परिणामी शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. सोनी टिव्ही, केबीसी व अमिताभ बच्चन यांच्या विरोधात सोशल मीडियावर जोरदार संताप व्यक्त करण्यात आला. विविध संघटनांनी सुद्धा सोनी टिव्हीच्या कार्यालयाबाहेर आंदोलने केली होती.

या वादावर पडदा टाकत मालिकेचे निर्माते सिद्धार्थ बसू यांनी ट्विटरद्वारे माफी मागितली आहे. बसू यांच्या या ट्विटला अमिताभ बच्चन यांनीही रिट्विट करून माफी मागितली आहे. बसू यांनी म्हटले आहे की, ‘केबीसीमध्ये यापूर्वी अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण उल्लेख करण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान किंवा अनादर करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. त्यांच्याबद्दलचा उल्लेख अनावधाने झाला होता. तो आता आम्ही वगळला आहे.’ बसू यांच्या या ट्विटला रिट्विट करता अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे की, अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो.’

अमिताभ बच्चन यांनी शिवाजी महाराज अनादरप्रकरणी मागितली माफी
स्क्रीनवर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे दुरूस्ती केलेले छायाचित्र मालिका निर्माते सिद्धार्थ बसू यांनी जारी केले आहे.

या माफीनाम्यानंतर बसू यांनी सुधारित स्क्रीनचे छायाचित्र जारी केले आहेत. त्यात प्रश्नाच्या चौथ्या पर्यायामध्ये D. छत्रपती शिवाजी महाराज अशी सुधारणा करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी