22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
Homeटॉप न्यूजशिवरायांचा पुतळा आता काश्मीरमध्ये, मुख्यमंत्र्यांनी केले अनावरण

शिवरायांचा पुतळा आता काश्मीरमध्ये, मुख्यमंत्र्यांनी केले अनावरण

काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमे नजीकच्या 41 राष्ट्रीय रायफल (मराठा लाइट इनफन्ट्री) याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण मंगळवारी (7 नोव्हेंबर) रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. झांज आणि लेजीमच्या तालावर संपूर्ण परिसर दुमदुमला होता. यावेळी, उपस्थितांसमोर भाषण करताना मुख्यमंत्री म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळेसैनिकांना प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल त्यामुळे शत्रूची आपल्याकडे बघण्याची हिंमत होणार नाही.”

मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या प्रमुख नद्यांच्या पाण्याने महाराजांच्या पुतळ्यावर जलाभिषेक करण्यात आला. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. “छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष या पर्वतरांगांच्या पलिकडे असलेल्या पाकिस्तानात पोहचला पाहिजे. छत्रपतींचा हा पुतळा प्रेरणादायी असून शत्रूच्या छातीत देशाचा तिरंगा गाडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा सैनिकांना प्रेरित करेल, त्यांना उर्जा देईल. त्यामुळे शत्रूची आपल्याकडे बघायची हिंमत होणार नाही,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


“छत्रपतींचा हा पुतळा प्रेरणादायी आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मिळाले. विश्वास बसत नाही भारत पाक सीमेवर छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आहे.”

“लाल चौकात सामान्य माणसांना जाणे कठीण होते. तिथे पंतप्रधानांनी तिरंगा फडकवला आहे. महाराष्ट्र आणि काश्मीरचे नाते जुने होते. महाराष्ट्रातील अनेक संस्था काश्मीरमध्ये काम करत आहे. त्यांचे योगदान अतिशय मोठे आहे,” असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.

यानंतर, त्यांनी कुपवाडा येथील 41 राष्ट्रीय रायफल्स यांच्या आवारातील स्मृती स्थळाला वंदन करून शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतींना अभिवादन केले. तसेच जवानांसोबत फराळ करत त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.


आम्ही पुणेकर या संस्थेच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काश्मीर मधील कुपवाडा येथे बसविण्यात आला आहे. 20 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई राजभवन येथून समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारुढ पुतळ्याचे ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात स्वागत करण्यात आले. तेथून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखवून कुपवाडाकडे हा पुतळा मार्गस्थ करण्यात आला होता.

महाराष्ट्रातून सुरू झालेला हा प्रवास सुमारे 2200 किमी अंतर पार करीत एका आठवड्यात कुपवाडा येथे पोहोचला. रस्त्यातील महत्वाच्या शहरांमधील ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी या पुतळ्याचे पूजन करतानाच स्वागतही करण्यात आले. आज सकाळी या पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले असून यावेळी जम्मू -काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

हे ही वाचा 

भारत-पाकिस्तान सीमेजवळ शिवछत्रपतींचा पुतळा

भुजबळांच्या नातेवाईकांचे हॉटेल त्यांच्याच माणसांनी फोडले?

MPSC अध्यक्ष आहेत कुठे? रोहित पवार यांचा सवाल

कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन यंदाच्या पाडव्याच्या दिवशीच करण्यात आले. त्यासाठी शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड आणि रायगड या पाच किल्ल्यांवरील माती आणि पाणी आणण्यात आली होती. हा पुतळा साडे दहा फूट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि 7 बाय 3 या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावण्यात आला आहे.

पुतळ्याच्या समोरच्या दिशेने असलेल्या पर्वंतरांगांच्या पलिकडे पाकिस्तान आहे. अश्वारूढ पुतळ्यावरील शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेने असावे अशापद्धतीने पुतळा बसविण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे 1800 ट्रक माती टाकून भराव करण्यात आला. शिवाय याभागातील हवामान, भूस्खलन याबाबी पाहता पक्के बांधकाम करून पाया तयार करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी