30 C
Mumbai
Friday, July 5, 2024
Homeटॉप न्यूजमोठी बातमी : महाविकास आघाडीच्या दीडशे आमदारांचे राज्यपालांना पत्र, न्यायालयातही हे पत्र...

मोठी बातमी : महाविकास आघाडीच्या दीडशे आमदारांचे राज्यपालांना पत्र, न्यायालयातही हे पत्र सादर होणार

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : फडणवीस – पवार सरकारची, तसेच राज्यपालांचीही थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयात अग्निपरीक्षा आहे. अशातच ‘महाविकास आघाडी’ने जबरदस्त खेळी केली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र राज्यपालांकडे सादर केले आहे. हेच पत्र काही वेळानंतर सर्वोच्च न्यायालयातही सादर होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या कायदेशीवर व राजकीय घडामोडींना आता मोठी कलाटणी मिळाली आहे.

एकनाथ शिंदे (शिवसेना), बाळासाहेब थोरात (काँग्रेस) व जयंत पाटील (राष्ट्रवादी) अशा तिन्ही पक्षांचे गटनेते राजभवनवर पोहोचले आहेत. त्यांच्या सोबत असलेल्या पत्रांवर आपापल्या आमदारांच्या स्वाक्षरी आहेत. सुमारे दीडशे आमदारांच्या स्वाक्षरी या पत्रावर आहेत. सत्ता स्थापनेसाठी १४५ आमदारांची गरज असते. परंतु त्यापेक्षाही जास्त स्वाक्षरी असलेल्या आमदारांचे पत्र महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांकडे सादर करणात आहेत.

मोठी बातमी : महाविकास आघाडीच्या दीडशे आमदारांचे राज्यपालांना पत्र, न्यायालयातही हे पत्र सादर होणार

आमदारांच्या या पत्रात नक्की काय लिहिले आहे, हे अद्याप समजले नाही. परंतु त्यात सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला असू शकतो, व बहुमताच्या दृष्टीने १५० आमदारांच्या स्वाक्षरी सादर केल्या असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कायदेशीर पेच

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या पत्राची खेळी केल्यामुळे राज्यपालांची कायदेशीर गोची होणार आहे. राज्यपालांवर अगोदरच पक्षपातीपणाचा आरोप करण्यात आला आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयासमोरही फार मोठा पुरावा सादर होणार आहे. अजित पवार यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र सादर केले होते. त्यामुळेच राज्यपालांनी फडणवीस – पवार यांना शपथ दिली होती. पण त्या ५४ आमदारांपैकी ४१ आमदारांनी रविवारी वेगळे पत्र राज्यपालांना सादर करून अजित पवार आमचे गटनेते नसल्याचे म्हटले होते. हे पत्र काल सर्वोच्च न्यायालयातही सादर करण्यात आले होते. आता महाविकास आघाडीच्या १५० आमदारांनी राज्यपालांकडे सादर केलेले पत्रही सर्वोच्च न्यायालयासमोर येईल. त्यामुळे अजित पवारांच्या पत्राच्या वैधतेवर साशंकता उपस्थित होणार आहे. आमदारांचे बहुमत महाविकासआघाडीकडे असल्याचा वैध पुरावा न्यायालयासमोर आणण्याचाही प्रयत्न यातून होणार आहे. अजित पवारांचे पत्र अवैध ठरविण्यासाठीही महाविकास आघाडीच्या वतीने न्यायालयात प्रयत्न करण्यात येत आहेत. असे झाले तर फडणवीस – पवार सरकार औट घटकेचे ठरू शकेल, असे बोलले जात आहे.

न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष

सर्वोच्च न्यायालयामध्ये थोड्याच वेळात, म्हणजे १०.३० वाजता सत्तापेचाबाबत सुनावणी होऊ घातली आहे. राज्यपालांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे फडणवीस – पवार यांना शपथ दिली, तसेच पहाटे राष्ट्रपती राजवट उठवताना घेतलेला निर्णय याबाबतची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ही कागदपत्रे आज न्यायालयासमोर येतील. त्यात अजित पवारांनी दिलेल्या ५४ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्रही असेल. पण अजित पवारांच्या शिळ्या पत्रानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यातील बहुतांश आमदारांच्या स्वाक्षरींची ताजी पत्रे राज्यपालांकडे सादर केली आहेत. त्यामुळे अजित पवारांचे पत्र खरे की, नंतरची पत्रे खरी याचाही सोक्षमोक्ष न्यायालयापुढे लागू शकतो.

विधानसभा अधिवेशन तातडीने बोलविण्यासाठी पक्षकारांचा आग्रह

विधानसभेचे तातडीने अधिवेशन बोलावावे, व तिथे बहुमताची चाचणी घ्यावी, अशी मागणी महाविकास आघाडीचे वकिल कपिल सिब्बल व अभिषेक मनु सिंघवी यांनी काल केली होती. आज या मागणीवर ते पुन्हा जोर देतील. त्यामुळे या मुद्द्यावर न्यायालय काय भूमिका घेईल याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

भाजपचे गाजर : अजित पवार गटाला १२ मंत्रीपदे, १५ महामंडळे

अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे आमदार फुटावेत यासाठी भाजपने मोठे गाजर दाखविले आहे. अजित पवारांबरोबर येणाऱ्या आमदारांपैकी १२ जणांना मंत्रीपदे, तर १५ जणांना महामंडळे दिली जातील अशी पुडी भाजपच्या गोटातून सोडण्यात आली आहे. अजित पवारांबरोबर २७ आमदार आहेत. या सगळ्या आमदारांना मंत्रीपद किंवा महामंडळ दिले जाईल असा संदेश भाजपच्या गोटातून प्रसारित करण्यात आला आहे. शरद पवारांसोबत सध्या जवळपास ५० आमदार आहेत. या आमदारांपर्यंत मंत्रीपदे व महामंडळांचा संदेश पोचला तर ते आयत्या वेळी फडणवीस – पवार सरकारला मतदान करतील, अशी भाजपला आशा वाटत आहे. त्यामुळेच मंत्रीपदे व महामंडळाची पुडी सोडण्यात आल्याचे बोलले जात आहे.

अजित पवारांकडील तीन आमदारांना गुडगावमधून मुंबईत आणले

अजित पवार यांच्याकडे असलेल्या पाच आमदारांपैकी तीन आमदारांना शरद पवारांनी आपल्याकडे आणले आहे. गुडगाव येथील ओबेरॉय हॉटेलमध्ये हे आमदार होते. अनिल पाटील, दौलत दरोडा व नितीन पवार हे तीन आमदार त्या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली होती. या तिघांनाही तेथून काढण्यात आले असून मुंबईत आणले आहे. आता आण्णा बनसोडे व नरहरी झिरवळ हे दोनच आमदार अजित पवारांकडे उरले आहेत.

शरद पवारांनी आम्हाला असे काहीही सांगितले नाही : छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला पाठिंबा आहे, असे अजित पवार भासवत आहेत. परंतु शरद पवारांचा त्यांना पाठिंबा नाही. अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी लगेचच त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपला पाठिंबा देण्याबाबत शरद पवारांनी आम्हाला असे काहीही सांगितले नाही. उलट भाजपच्या विरोधातच सरकार स्थापन करण्याची भूमिका शरद पवार यांनी वारंवार घेतली असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

LIVE Update : न्यायालयातील निकालाच्या सुनावणी

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शिवाजी महाराजांचा केला एकेरी उल्लेख, भाजपचे ‘हे’ खासदार संतापले

धनंजय मुंडेंचे नवे स्पष्टीकरण, वाचा काय म्हणाले

‘शरद पवार भाजपला पाठींबा देणार, शिवसेनेतही भूकंप होणार’

…आमदार खरेदी विक्रीचा बाजार तेजीत, आमदार फोडण्यासाठी ‘हे’ नेते लागले कामाला

‘भाजपकडे १७० आमदारांचे संख्याबळ’

अजित पवारांच्या नव्या दाव्याने खळबळ : मी राष्ट्रवादीतच, शरद पवार आपले नेते

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी