31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeटॉप न्यूजकेंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शिवाजी महाराजांचा केला एकेरी उल्लेख, भाजपचे ‘हे’...

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शिवाजी महाराजांचा केला एकेरी उल्लेख, भाजपचे ‘हे’ खासदार संतापले

लय भारी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राज्यात देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील अनपेक्षित सरकार शनिवारी सत्तेत आले. या सरकारचे अभिनंदन करण्याबरोबरच विरोधकांवर हल्लाबोल करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते विधी व न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद तावातावाने बोलू लागले. परंतु शब्दांचे बाण सोडत असताना शिवाजी महाराजांचा त्यांनी ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केला. त्यांनी दोन वेळा एकेरी उल्लेख केला. चुकतोय असे लक्षात येताच त्यांनी तिसऱ्या वेळी छत्रपती शिवाजी अशी दुरूस्ती केली. रवीशंकर यांच्या या ‘शहाणपणा’बद्दल भाजपचे खासदार व शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी महाराज यांनी लेखी पत्रच काढून संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट सुद्धा केले आहे.

खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी पत्रात म्हटले आहे की, आपण एक जबाबदार मंत्री आहात. पण आपण पत्रकार परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवाजी, शिवाजी असा केला. यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावनांना ठेच पोचली आहे. महाराजांच्या नावाचा उल्लेख कसा करावा हे आपल्याला माहित असायला हवे. सध्याचे राजकारण व राजकीय नेत्यांशी छत्रपती शिवाजी महाराजांचा व त्यांच्या विचारांचा काहीही संबंध नाही. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनीही या पद्धतीची चूक केली होती. त्यांनाही लोकांनी माफी मागण्यासाठी मजबूर केले होते. त्यांनी माफी मागून शिवभक्तांचा आदर केला होता. तुम्हीही माफी मागून शिवभक्तांच्या भावनांचा आदर करावा, अशी मागणी खासदार संभाजी महाराज यांनी या पत्राद्वारे केली. हा सगळा संताप त्यांनी ट्विटवरसुद्धा व्यक्त केला आहे.

संभाजी महाराजांच्या ट्विटनंतर रवी शंकर प्रसाद यांनी लगोलग संभाजी महाराजांना फोन केला, व माझ्याकडून अनावधानाने एकेरी उल्लेख झाल्याचे सांगितले. प्रसाद यांनी ट्विटरवर संभाजी महाराजांना प्रत्यूत्तर देत माफी मागत असल्याचेही नमूद केले. प्रसाद यांनी केलेल्या माफिनाम्यानंतर खासदार संभाजी महाराज यांनी या प्रकरणी नमती भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

शिवाजी महाराजांचा आदरयुक्त उल्लेख कसा करावा याबाबत कायदा करण्याबाबत संभाजी महाराज यांनी रवीशंकर प्रसाद यांच्याकडे मागणी केली. त्यावर प्रसाद यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे संभाजी महाराजांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

हे सुद्धा वाचा

अमिताभ बच्चन यांनी शिवाजी महाराज अनादरप्रकरणी मागितली माफी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी