31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeटॉप न्यूजगरीबांची उपेक्षा करणाऱ्या इंडी आघाडीला पापाची शिक्षा द्या! पंतप्रधान मोदी

गरीबांची उपेक्षा करणाऱ्या इंडी आघाडीला पापाची शिक्षा द्या! पंतप्रधान मोदी

घराणेशाहीच्या राजकारणातून देशावर सत्ता गाजविणाऱ्या इंडी( indie ) आघाडीने देशातील गरीबांची, दलितांची, वंचितांची सतत उपेक्षा केली असून गरीबांना राज्य करण्याचा हक्क नाकारल्यामुळेच काँग्रेस आणि इंडी आघाडीचे नेते मोदीविरोधात उभे ठाकले आहेत, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi) यांनी आज रामटेक येथील जाहीर सभेत बोलताना चढविला.नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,रामटेक चे उमेदवार राजू पारवे आणि भंडारा-गोंदिया चे उमेदवार खा. सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ झालेल्या या विराट सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते.(Punish the indie coalition for its sins for neglecting the poor! PM Modi )

या सभेत पंतप्रधानांनी काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या राजकारणाची अक्षरशः चिरफाड केली.देशातील समाजात फूट पाडण्यासाठी इंडी आघाडीचे निकराचे प्रयत्न सुरू असून संघटितपणे त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी रालोआला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. जनता संघटित झाली तर इंडी आघाडीचे राजकारणच संपून जाईल अशी त्यांना भीती आहे, पण त्या आघाडीला ताकद मिळाली तर देशाचे तुकडे तुकडे होतील, असा इशाराही मोदी यांनी दिला. आता त्यांना पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. म्हणूनच त्यांनी आता मोदींना लक्ष्य केले आहे. घराणेशाहीची मक्तेदारी संपुष्टात आणून गरीबाघरचा मुलगा सत्तेवर आला, हे त्यांना सहन होत नसल्यामुळेच मोदींवर वैयक्तिक हल्ले सुरू झाले आहेत.असे असले तरी मी देशसेवेच्या माझ्या संकल्पापासून मागे हटणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

आजकाल टीव्ही, मिडियावाले वेगवेगळ्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर करून एनडीएच्या प्रचंड विजयाचे अंदाज वर्तवित आहेत. पण त्यासाठी त्यांना एवढा खर्च करण्याची गरजच नाही. जेव्हा मोदींच्या नावाने लाखोली सुरू होते, तेव्हा मोदींचा विजय निश्चित आहे, हे समजून घ्या. जेव्हा ईव्हीएमवर प्रश्नचिन्हे सुरू होतात, तेव्हा मोदी सत्तेवर येणार हे स्पष्ट असते, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांची खिल्ली उडविली. मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आले तर लोकशाही संपुष्टात येईल, अशी अफवा अलीकडे इंडी आघाडीवाले पसरवत आहेत. मी सत्तेवर आलो तेव्हापासून ते हीच भाषा बोलत आहेत. हीच त्यांची बौद्धिक दिवाळखोरी असून त्यांच्याकडे नवे मुद्देच नाहीत, नव्या कल्पनाच नाहीत, अशी खरमरीत टीकाही मोदी यांनी केली. आणीबाणीच्या काळात सरकारवर एका परिवाराचा कब्जा होता, तेव्हा लोकशाही संकटात नव्हती का, एक गरीबाचा पुत्र सत्तेवर आला, तेव्हाच यांना अचानक लोकशाही संकटात आल्याचा साक्षात्कार कसा होतो, असा सवाल त्यांनी केला. गरीबाने देशाचे नेतृत्व करावे ही कल्पनाच इंडी आघाडीला सहन होत नाही, म्हणूनच मोदींवर वैयक्तिक हल्ले होत आहेत, पण कितीही हल्ले झाले तरी देशसेवेच्या संकल्पापासून हा मोदी मागे हटणार नाही, असा निर्धारही पंतप्रधानांनी बोलून दाखविला.

इंडी आघाडीवाले पूर्ण ताकद पणाला लावून देशाच्या जनतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणूनच, एकजूट होऊन देशासाठी मतदान करा. भारतीय संस्कृतीला दूषणे देण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. यावेळी रामनवमीला अयोध्येत रामलल्ला तंबूत नाही, तर भव्य मंदिरात दर्शन देणार आहेत. पाचशे वर्षांनंतर हा सुवर्णयोग आला आहे. पूर्ण देश एका अदभुत अनुभूतीचा आनंद घेत आहे, पण जेव्हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आला, तेव्हा इंडी आघाडीने निमंत्रण नाकारून सोहळ्यावर बहिष्कार घातला. ते सनातन संपविण्याची भाषा करतात. हिंदू धर्माच्या शक्तीला संपविण्याची यांची भूमिका असते. अशा इंडी आघाडीला महाराष्ट्रात एकाही जागेवर विजय मिळू देऊ नका. या निवडणुकीत त्यांना नाकारून त्यांच्या सनातनविरोधी मानसिकतेला शिक्षा द्या, असे आवाहनही त्यांनी केले. तुमचे एक एक मत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेला विजयी करणार आहेच, पण इंडी आघाडीला शिक्षा देण्यासाठी देखील महत्वाचे आहे. काँग्रेसने गरीबांची, महिलांची, दलितांची उपेक्षा केली. बाबासाहेब आंबेडकरांना भाजपा चा पाठिंबा असलेल्या सरकारने भारतरत्न किताबाने गौरविले. आदिवासी समाजातील महिलेला एनडीएने राष्ट्रपती बनविले. एनडीए सरकारने पहिल्यांदाच ओबीसींना मंत्रिमंडळात सर्वाधिक प्रतिनिधित्व दिले. मेडिकल शिक्षणात ओबीसींना आरक्षण, स्वतंत्र आदिवासी मंत्रालय, दहा वर्षांत आदिवासी कल्याणासाठीचे बजेट पाचपट वाढले. एनडीए सरकारमुळेच मागासवर्गीय समाजघटकांतील युवकांच्या शैक्षणिक संधी वाढल्या. ‘सब का साथ सब का विकास’ हा मंत्र हीच संविधानाची प्रामाणिक भावना आहे, पण परिवारवादी पक्षांनी नेहमीच या भावनेचा अपमान केला, आणि सामाजिक न्यायाची भाषा करत आपल्या परिवारांचे कल्याण करून घेतले. गरीबांना सुविधांपासून वंचित ठेवले. या गरीबांना सुविधा देण्याचे काम एका गरीब मातेच्या पुत्राने, मोदीने केले आहे, असे ते म्हणाले.

शतप्रतिशत विकासाची गॅरंटी हाच खरा सामाजिक न्याय असतो. कारण यात भेदभावाची शक्यता नसते, प्रत्येक लाभार्थीला त्याच्या हक्काचा लाभ मिळून भ्रष्टाचाराची दुकाने बंद होतात. पक्के घर, मोफत रेशन, मोफत इलाज, टॉयलेट, वीज पाणी ,गॅस कनेक्शनची गॅरंटीमुळे असंख्य परिवारांना विकासाच्या नव्या आशेचे किरण दिसू लागले आहेत. यामुळेच 25 कोटी जनता गरीबीतून बाहेर आली. काँग्रेसने एक देश, एक संविधान लागू करण्यात अडथळे आणले. 70-75 वर्षे बाबासाहेबांचे संविधान संपूर्ण देशात लागू नव्हते, याला जबाबदार कोण, असा सवाल करून, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत संविधान लागू करण्याचे काम मोदींनी केले, असे ते म्हणाले, तेव्हा पुन्हा मोदीविजयाच्या घोषणा गरजल्या. बाबासाहेबांचा आत्मा जिथे कोठे असेल, तेथून काश्मीरमध्ये 370 हटविल्याबद्दल धन्यवाद देत असेल, पण 370 हटवून देशाला काय मिळणार ही काँग्रेसी भूमिका म्हणजे, काँग्रेसच्या गरीब, आदिवासी आणि व्होट बँकेच्या राजनीतीचा जिवंत पुरावा आहे, असा आरोपही त्यांनी केला. 370 कलम हटविल्यामुळे जम्मू काश्मीरातील जनतेला सर्व संविधानिक लाभ मिळाले आहेत. दलित, महिला, गरीबांना नागरिकत्वाचे सारे हक्क प्राप्त झाले आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे ही जनता वंचित होती. बाबासाहेबांनी दिलेले अधिकार जम्मू काश्मीरच्या लोकांना नव्हते.

‘सीएए’ला विरोध करून दलित, वंचितांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा काँग्रेसचा कट आहे. इंडी आघाडी म्हणजे विरासत आणि विकासाचे विरोधक आहेत. गोसीखुर्द योजनेला काँग्रेसने कित्येक दशके रोखून ठेवले. पण राज्यातील महायुती सरकारमुळे या कामास वेग आला, आणि लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. हर घर नल से जल ही मोदी सरकारची गॅरंटी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील सरकार कठोर परिश्रम करत आहे. महाराष्ट्रात पीएम स्वनिधी योजनेतून हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. येत्या पाच वर्षांत संपूर्ण आत्मनिर्भरता हाच आमचा संकल्प आहे, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.आज नागपूरच्या, विदर्भाच्या विकासाला अभूतपूर्व वेग आला आहे. पर्यटनाला चालना मिळणार आहे. समृद्धी महामार्गामुळे पूर्ण क्षेत्राचा कायापालट झाला आहे. असा मजबूत विकास केवळ एनडीए सरकारच करू शकते. गेल्या दहा वर्षांतील विकास हा तर ट्रेलर आहे. अजून खऱा विकास पुढेच आहे. येत्या पाच वर्षांत देशाला, महाराष्ट्राला आणखी पुढे न्यायचे आहे. तुमचे स्वप्न हा मोदीचा संकल्प आहे. ‘हर पल देशके नाम, हर पल आपके नाम’ अशी ग्वाहीदेखील मोदी यांनी जनतेस दिली. 19 एप्रिलला रामटेकमधून राजू पारवे, भंडारा – गोंदियातून सुनील मेंढे व नागपूरातून नितीन गडकरी यांना जास्तीत जास्त मतदान करून ऐतिहासिक विजय मिळवून द्या, असे आवाहन पंतप्रधानांनी केले

आशीर्वाद हीच ऊर्जा…

“तुमच्याकडे माझे वैयक्तिक काम आहे. जेव्हा तुम्ही प्रचारासाठी घरोघरी जाणार, तेव्हा नक्की सर्वांना सांगा, मोदीजी रामटेकला आले होते, आणि त्यांनी तुम्हाला रामराम सांगितला आहे. माता, वयोवृद्धांकडून मिळणारा आशीर्वाद मला नवी उर्जा देईल आणि तुमच्यासाठी अपार काम करण्याची ताकद मला मिळेल.”अशा भावनिकतेने मोदी यांनी उपस्थितांना केलेल्या आवाहनानंतर प्रचंड गर्दीने जोरदार घोषणा देत त्यांना प्रतिसाद दिला. त्याआधी, भाषणाच्या प्रारंभी मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत जनसमुदायाने आपल्या मोबाईलचे फ्लॅश उजळून रोषणाई करत अगोदरच विजयाची ग्वाही दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी