32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजसचिन वाझेंना शिवसेनेत आणणारा नेता कोण; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

सचिन वाझेंना शिवसेनेत आणणारा नेता कोण; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

पोलिसांना हे कृत्य करायला लावणारे कोण? याचा तपास केंद्र सरकारने करावा

केंद्राने योग्य चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल

टीम लय भारी

मुंबई : वाझे आणि अंबानी स्फोटके प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी थेट ठाकरे सरकारलाच घेरले आहे. ख्वाजा युनूस प्रकरणात 17 वर्षे निलंबित असलेल्या सचिन वाझे (Sachin Vaze) यांना शिवसेनेत कोणी आणले, त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मध्यस्थी करणारी ती व्यक्ती कोण होती, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा हे राजकीय मुद्दे आहेत. यात आत्ता नको पडूया. आधी या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित होऊ द्या. कारण चौकशी व्यवस्थित झाली नाही तर उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील. पोलिसांना हे कृत्य करायला लावणारे कोण हे आधी कळू द्या, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी अंबानी स्फोटक प्रकरण कल्पनेपेक्षा अधिक धक्कादायक असल्याचा दावा केला. त्यासाठी हे प्रकरण फक्त सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्यापुरते मर्यादित राहता कामा नये. हा विषय दुसरीकडे भरकटता कामा नये. त्यासाठी केंद्र सरकारने याप्रकरणात हस्तक्षेप करुन त्याची कसून चौकशी करावी. ही चौकशी खरंच नीटपणे पार पडली तर अक्षरश: फटाक्याची माळ लागेल. या सगळ्यात कोण कोण आत जाईल, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. या सगळ्यात अनेक धक्कादायक चेहरे समोर येतील, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

भाजप आणि शिवसेनेचे सरकार असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेण्याची विनंती केली होती, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. याचा अर्थ सचिन वाझे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सचिन वाझे प्रकरणी बदली करण्यात आली आहे. मात्र, जर परमबीर सिंग यांचा वाझे यांच्याशी संबंध असेल तर त्यांची बदली का केली. त्यांचा जर या प्रकरणात संबंध असेल तर त्यांची चौकशी का केली नाही, असाही सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत सरकारने अद्याप उत्तर दिलेले नाही. याचा अर्थ आपल्या काही अंगाशी आलं का ते झटकून टाकने, असाच होतो, असे म्हणत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटींचं टार्गेट दिलं होतं. राज्यात अनेक शहरं आहेत. त्यात अनेक पोलिस आयुक्त आहेत. त्यांना कितीचं टार्गेट देण्यात आलं? असा सवाल करतानाच या प्रकरणाचा केंद्र सरकारने तपास करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप ही देशाच्या इतिहासातील पहिलीच घटना असेल. परमबीर सिंह यांना पदावर नियुक्त होऊन एक वर्षच झाले असेल त्यानुसार त्यांनी १२०० कोटी द्यायला हवे असेल. पण लॉकडाऊनमुळे बार बंद होते. त्यामुळे ही वसुली झाली नसेल. राज्यात शहरं किती, पोलीस कमिशनर किती, त्यांना काय टार्गेट दिलं, हे अजून बाहेर आलं नाही. गृहमंत्र्यांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मधुर संबंध सर्वश्रूत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला अंबानी व्यासपीठावर उपस्थित होते. मग असे असताना पोलीस अंबानी यांच्याकडे पैसे मागायची हिंमत कशी करू शकतील? अंबानी यांच्या घराखाली कोणाला सांगितल्याशिवाय एखादा पोलीस अधिकारी बॉम्ब कसा ठेवेल? कोणाच्या सूचना असल्याशिवाय पोलीस असं धाडस करणार नाहीत, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त असतो. या सुरक्षाकड्यात इस्रायली लोकांचाही समावेश आहे. याशिवाय, मध्य प्रदेशचे पोलीसही अंबानी यांच्या दिमतीला आहेत. ते याठिकाणी का आहेत, हे कोडे अद्याप मला उलगडलेले नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

यापूर्वी अतिरेकी बॉम्ब ठेवतात असं ऐकलं होतं. आता पोलीसच बॉम्ब ठेवत असल्याचं उघड झालं आहे. ही धक्कादायक बाब आहे. कुणाच्या तरी सांगण्यानुसार वाझे हे कृत्य करतील का? पोलिसांना कुणाच्या तरी सूचना असल्याशिवाय पोलीस हे धाडसच करणार नाही, असंही ते म्हणाले. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ते केवळ पोलीस दलातील वादाशी संबंधित नाही. तर बॉम्ब ठेवण्यापर्यंतचं हे प्रकरण आहे. त्यामुळे केंद्राने यात हस्तक्षेप करावा. केंद्राने याची चौकशी करावी. महाराष्ट्र सरकार या प्रकरणाची योग्य चौकशी होणार नाही. केंद्राने चौकशी चौकशी केली तर या प्रकरणात फटाक्याची माळ लागेल. अनेक अनाकलनीय चेहरे समोर येतील, असं सांगतानाच या प्रकरणात कोणकोण आत जातील याची कल्पनाही कोणाला करता येणार नाही. केंद्राने जर हस्तक्षेप केला नाही तर राज्य अराजकाकडे जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मुळात परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावरून का हटवलं, जर ते दोषी होते तर मग त्यांना निलंबित का नाही केलं? त्यांची चौकशी का नाही केली गेली? त्यांची बदली का केली गेली? मुळात मुकेश अंबानींच्या घराच्या समोर बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे, तो विषय मागे पडला आहे? त्या गाडीत सापडलेले जिलेटीन कुठून आले?,’ अशी शंका राज ठाकरेंनी उपस्थित केली आहे.

‘सचिन वाझे ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित होते, मग फडणवीस म्हणतात त्या प्रमाणे सचिन वाझे ह्यांना सेवेत परत घ्या म्हणून उद्धव ठाकरे मागे लागले होते. हेच वाझे शिवसेनेत होते आणि मुकेश अंबानी आधी उद्धव ठाकरे हे घनिष्ट मित्र आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला मुकेश अंबानी सहपरिवार उपस्थित होते. आणि त्यांच्या घराबाहेर बॉम्बची गाडी सापडते आणि ती गाडी पोलिसांनी ठेवली असा आरोप आहे. मुळात अशी घटना कोणीतरी वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकतं का? ही गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली? म्हणूनच या प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी. कारण याची चौकशी महाराष्ट्रात होणार नाही. आणि याची चौकशी योग्य प्रकारे झाल्यास फटाक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावं बाहेर येतील, त्याची कल्पनाही कोणी केली नसेल’, असे सूचक वक्तव्य राज यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी