33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांनी निवृत्त IAS अधिकाऱ्याला दिले मानाचे स्थान !

शरद पवारांनी निवृत्त IAS अधिकाऱ्याला दिले मानाचे स्थान !

बहुजन वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेचा वटवृक्ष आज राज्यभर पसरला असून संस्थेची धुरा ज्येष्ठ नेते शरद पवार सांभाळत आहेत. अत्यंत कार्यकुशल व्यक्तींची या संस्थेच्या कार्यकारिणीवर निवड व्हावी यासाठी देखील ते दक्ष असतात. पवार यांच्या अध्यक्षतेखाली कर्तव्यदक्ष व्यक्तीमत्व म्हणून राज्यभरात नावलौकीक असलेले निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकात दळवी यांची एकमताने आज संस्थेच्या चेअरमनपदी (कार्याध्यक्ष) निवड केली आहे.

रयतच्या नवनिर्वाचित मॅनेजिंग कौन्सिलची पहीली बैठक संस्थेचे अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली, शनिवारी (दि. 27) रोजी पुणे येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये दळवी यांची चेअरमन (कार्याध्यक्ष) पदावर एकमताने निवड करण्यात आली.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संस्थेची सातारा येथे सन 1919 मध्ये स्थापना केली. संस्थेने नुकताच शताब्दी महोत्सव साजरा केला. रयत शिक्षण संस्था ही देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, कनिष्ठ आणि उच्च महाविद्यालयीन शिक्षणच्या 740 शाखा महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एकूण 15 जिल्ह्यांत कार्यरत आहेत. संस्थेत 10000 शिक्षक व प्राध्यापक वर्ग, 2500 शिक्षकेतर सेवक कार्यरत असून संस्थेत 4.50 लाख विध्यार्थी प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.

रयत शिक्षण संस्थेचे “कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ” सातारा येथे एक वर्षांपूर्वी स्थापन झाले असून चंद्रकांत दळवी यांची या विद्यापीठाचे “कुलाधिकारी “म्हणून महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल महोदय यांनी नुकतीच नेमणूक केली आहे.

दळवी मुळचे निढळ (जि. सातारा) येथील रहिवासी असून राज्य शासनाच्या तसेच भारतीय प्रशासकीय सेवेतील त्यांनी 35 वर्षे निरनिराळ्या पदांवर काम केले. पुण्याचे माजी विभागीय आयुक्त, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे सचिव, नगर जिल्हा परिषदेचे सीईओ, पुण्याचे जिल्हाधिकारी, राज्याचे जमावबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक, राज्याचे सहकार आयुक्त आदींचा समावेश आहे.

दळवी यांनी हागणदारीमुक्त गाव योजना, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना संकल्पित करुन राबवल्या. ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ ही त्यांनी संकल्पित केलेली योजना प्रशासनातील मैलाचा दगड ठरली.

हे सुद्धा वाचा
IAS Chandrakant Dalvi: चंद्रकांत दळवी यांची महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड

माजी IAS चंद्रकांत दळवी यांची पुणे महापालिकेच्या हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती

IAS चंद्रकात दळवी म्हणतात; अर्थसंकल्पात कृषीला न्याय, ग्रामविकासाकडे दुर्लक्ष

नोकरीच्या पहिल्या दिवसापासून निवृत्तीपर्यंत व त्यानंतर आजपर्यंत अशी 40 वर्षे ते आपल्या निढळ ग्रामविकासाचे काम करीत आहेत. हे गाव आदर्श गाव म्हणून नावलौकिकास आले. निवृत्तीनंतर दळवी यांनी स्ट्रॅटेजिक अलायन्स फाॅर ट्रानसफाॅर्मिंग व्हिलेजेस (सत्व) फाउंडेशनची स्थापना केली. नाशिकच्या सह्याद्री फार्म्स क्लस्टर मधील 16 व सोलापूर जिल्ह्यातील 5 गावांमध्ये सत्व फाउंडेशन च्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकासाची कामे सुरू आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी