29 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeमंत्रालयAmid Covid-19 Threat : पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट

Amid Covid-19 Threat : पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट

टीम लय भारी

मुंबई : राज्यावर कोरोनाचे संकट असताना (Amid Covid-19 Threat) राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना यासंबंधी माहिती दिली. तसेच हे अधिवेशन फक्त ४ दिवस चालेल असे सांगण्यात येत आहे. मुंबईत होणा-या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट आहे.

परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर २२ तारखेला अधिवेशन घेणं शक्य नाही असे लक्षात आले आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर ३ ऑगस्टला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरवण्या मागण्यांसाठी एक दिवसाचं अधिवेशन घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

कोरोनाची साथ सुरू झाल्याने आठवडाभर आधीच राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्यात आले होतं. कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पावसाळी अधिवेशनावर अनिश्चिततेचे सावट होतं. हे अधिवेशन ठरल्याप्रमाणे घ्यायचे की पुढे ढकलायचे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठकही पार पडली होती.

याआधी पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होईल असे जाहीर करण्यात आले होते. पण ३० जूनपर्यंत सर्व रेल्वे आरक्षण रद्द झाल्याने राज्याच्या कानाकोप-यातून आमदार व त्यांचे कर्मचारी मुंबईत कसे येणार, कोरोनाच्या काळात ही गर्दी करायची का असे प्रश्नही समोर होते. त्यामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याबाबत विचार सुरू होते. दरम्यान ३ ऑगस्टपासून राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र हे अधिवेशन फक्त चार दिवस चालणार असल्याचं सांगितले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन लवकरात लवकर संपवले जाणार असल्याची माहिती आहे.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २० मार्चपर्यंत चालणार होते. पण कोरोनाच्या साथीला तोंड देण्यासाठी विधिमंडळाच्या कामकाजातून प्रशासनाला मुक्त करण्यासाठी १४ मार्चला अधिवेशन गुंडाळण्यात आले होते. पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होईल, असे जाहीर झाले होते. मात्र, राज्यात कोरोनाची साथ कायम असल्याने सर्व यंत्रणा कोरोनानियंत्रण व इतर अनुषंगिक गोष्टींमध्ये गुंतल्या आहेत. त्यामुळे अधिवेशन नेमके कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला होता.

अधिवेशन पुढे ढकलण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा : फडणवीस

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला असून, भारतालाही त्याला मोठा फटका बसला आहे. देशातल्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा ठाकरे सरकारचा प्रस्ताव आहे. त्याला विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा पाठिंबा दर्शवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रस्ताव होता, त्याला विरोधी पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा दिला, शिवाय पुरवणी मागण्यांसाठी जर एखाद दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवण्याचे सरकारचे नियोजन असेल, तर त्यालाही पाठिंबा आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत. कोकणात मोठे नुकसान झालेय, सरकारची मदत तोकडी आहे, महापुरावेळी निकष बाजूला ठेवून मदत केली, यावेळीही सरकारने तसेच करावे, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी