32 C
Mumbai
Thursday, February 8, 2024
Homeक्राईमबीडमध्ये जाळपोळ करणारे १८१ जण अटकेत; मराठा आंदोलन प्रकरणी कारवाई

बीडमध्ये जाळपोळ करणारे १८१ जण अटकेत; मराठा आंदोलन प्रकरणी कारवाई

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेले असताना बीडमध्ये काही नेत्यांच्या घरांवर हल्ले करून त्यांची घरे, कार्यालये जाळण्यात (Violence) आली होती. या प्रकरणात बीड पोलिसांनी १८१ आरोपींना अटक केली असून ऐन दिवाळीत त्यांच्यावर अंधाऱ्या कोठडीत राहण्याची वेळ आली आहे. या सर्व जाळपोळ प्रकरणात पोलिसांनी एकूण ४०० जणांची ओळख पटवली असून त्यांना अटक करण्याचे काम सुरू आहे. आता अटक केलेल्यांपैकी काही जण पोलीस कोठडीत तर काही जण तुरुंगात आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून ३०७ हा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईमुळे इतर आरोपींचे धाबे दणाणले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील २५ ऑक्टोबरपासून पुन्हा अंतरवाली सराटी (Anterwali Sarati) गावात बेमुदत उपोषणाला बसले होते. ते वारंवार शांततेत आंदोलन करण्याचे तसेच कुणीही आत्महत्या करू नये, असे आवाहन करत होते. तरीही ३० आणि ३१ ऑक्टोबरमध्ये बीडमध्ये जाळपोळ सुरू झाली. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजलगावचे आमदार प्रकाश सोळुंके, आमदार संदीप क्षीरसागर यांची घरे, बीआरएसचे दिलीप गोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख कंडुलिक खांडे यांची कार्यालये पेटवण्यात आली होती. या हिंसाचारामुळे जरांगे-पाटील यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. त्याचवेळी जाळपोळ करणारे वेगळे असतील, असाही दावा केला होता.

दरम्यान, पोलिसांनी या घटनांचे उपलब्ध झालेले व्हिडीओ तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून आतापर्यंत ४०० जणांची ओळख पटवली आहे. ते आरोपी असून कोणत्या समाजाचे आहेत, हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही, अशी भूमिका बीड पोलिसांनी या प्रकरणी घेतली आहे. बीड पोलिसांनी आतापर्यंत १८१ जणांना अटक केली असून उर्वरित आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हे ही वाचा

चक्क १०० गाड्या एकमेकांवर धडकल्या, २० किलोमीटपर्यंत वाहतूक कोंडी

‘गौतमी पाटीलच्या डान्सने ठाणे झाले ओव्हरस्मार्ट’

उत्साहाच्या भरात चाहत्यांनी फोडले थिएटरमध्ये फटाके

मनोज जरांगे-पाटील यांचं शांततेत चाललेल्या आंदोलनाला बीडमधील या घटनांमुळे डाग लागला होता. शिवाय या जाळपोळीत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान देखील झाले. त्यामुळे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत कसून तपास सुरू केला आहे. ज्यांनी या घटनांचे व्हिडीओ शूटिंग केले शिवाय जिथे जिथे सीसीटीव्ही होते तेथील प्रत्येक फूटेजची तपासणी करून त्यांनी जाळपोळ, दगडफेक करणाऱ्या ४०० जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. काहींनी पोलिसांपासून वाचण्यासाठी बीड जिल्ह्यातून पलायन केले. त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी