33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयसुवर्ण नायिका जयश्री गडकर!

सुवर्ण नायिका जयश्री गडकर!

जयश्री गडकर म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील सुवर्ण नायिका, रुपेरी दुनियेतील ५० सोनेरी वर्ष, सिनेरसिकांच्या हृदय सिंहासनावर राज्य करणारी अनभिषिक्त सम्राज्ञी, अनेक रौप्यमहोत्सवी आणि सुवर्णमहोत्सवी चित्रपट देणारी मराठीतील पहिली सुपरस्टार, चेहर्‍यावर सोज्वळ भाव आणि डोक्यावर पदर ठेवून सिनेमात वावरणारी सौजन्यमूर्ती. जयश्री गडकर यांची आज ८१ वी जयंती आहे. दि. २१ मार्च १९४२ रोजी जयश्रीताईंचा जन्म कारवार जिल्ह्याच्या सदाशिवगड तालुक्यातील कणसगिरी गावात झाला. त्या मुंबईला आल्या तेव्हा पाच-सहा वर्षांच्या होत्या. त्यांचे प्रारंभीचे शिक्षण खेतवाडीतील म्युनिसिपल शाळेत झाले.

पुढे त्या गिरगावच्या राममोहन हायस्कूलमध्ये दाखल झाल्या. १९६० साली त्यांनी मॅट्रीकची परीक्षा दिली. शाळेत शिकत असतानाच त्या अनपेक्षितपणे ललित कलांच्या क्षेत्रात ओढल्या गेल्या. त्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणाची आबाळ झाली. इच्छा असूनही त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घेता आला नाही. पण त्यांना गायनाचे अंग होते, ताल-सुरांचे ज्ञान होते आणि त्यांचा आवाज देखील गोड होता. त्यामुळे मास्टर नवरंग यांच्याकडे त्या सतत दहा वर्षे गाणे शिकल्या. पुढे नाटकातून काम करताना त्यांना या गाण्याचा चांगला उपयोग झाला. (actress Jayashree Gadkar Life journey)

सन १९५० ते १९५४ पर्यंतच्या चार वर्षांत त्यांनी शाळा, नृत्य आणि गायन क्लास सांभाळून हौशी रंगभूमीवर काम केले. हळूहळू त्या चित्रपटसृष्टीकडे वळल्या. नृत्यात अधिक रस घेऊ लागल्या. शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवू लागल्या. राजकमल कलामंदिरात त्यांना प्रवेश मिळाला. तेथे ‘संध्या’ या नायिकेच्या मागे समूह नृत्यात नाचताना त्या प्रथम पडद्यावर दिसल्या. पण समूह नृत्य ते मराठीतील आघाडीची नायिका हा संघर्षमय प्रवास त्यांनी स्वत:च्या गुणवत्तेवर केला. परिश्रम, चिकाटी आणि कलेवरील प्रेम यांच्या बळावर त्या मराठीतील पहिल्या सुपरस्टार नायिका बनल्या. चित्रसृष्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडून रंगभूमी आपोआपच सुटली. त्यांचा नंतर नाटकाशी संबंध राहिला तो एक प्रेक्षक म्हणून. त्यांनी नाटके का सोडली? त्यांना रंगभूमी आवडत नव्हती का? या प्रश्नाचे उत्तर जयश्रीताईंनीच ‘नक्षत्रलेणं’ या आपल्या ग्रंथात दिले आहे. त्या म्हणतात, ‘मी नाटकात काम केले नाही, याला कारणे अनेक आहेत.

पण प्रमुख कारण म्हणजे मी जर चित्रपटांबरोबरच नाटकातूनही काम करू लागले असते तर या दोन्ही कलांवर अन्याय झाला असता, असेच मला सारखे वाटत होते. एकाचवेळी नाटक-सिनेमाची कसरत आपण सुरू केली तर त्यामुळे माझी मनस्थिती द्विधा होईल आणि मग धड नाटकातूनही नीटपणे काम करता येणार नाही, की धड चित्रपटातील भूमिकेकडे लक्ष केंद्रीत होणार नाही, याची मला चांगलीच कल्पना आली होती. माझ्या कलावंत मनाला यातना देण्याची माझी इच्छा नव्हती व तयारीही नव्हती. रात्री नाटक रंगवून त्याच पेंगुळलेल्या डोळ्यांनी नि कोमजलेल्या चेहर्‍याने सकाळी कॅमेर्‍यापुढे जायचं. मग कामात नि चेहर्‍यात ताजेपणा यावा कसा? यंत्र तुमची गय करीत नाही. कॅमेरा तुम्हाला तसा मोकळा सोडत नाही. तो आपलं काम चोख बजावतो. मग त्याच्या माध्यमातून रजतपटावर जे काही दिसेल ते वेगळेच असेल.’

जयश्रीताईंनी रंगभूमी सोडली हे बरेच झाले. त्यामुळे त्या चित्रपटसृष्टीला न्याय देऊ शकल्या. अनेक रौप्यमहोत्सवी आणि सुवर्णमहोत्सवी चित्रपट त्या देऊ शकल्या. अनेक पौराणिक चित्रपटातूनही त्यांनी काम केले. त्या उत्तम नृत्यांगना तर होत्याच, पण तितक्याच चांगल्या त्या अभिनेत्री देखील होत्या. त्यांचे डोळे आणि चेहरा बोलका होता. संवादाद्वारे व्यक्त करावयाच्या भावना त्यांचे डोळे व्यक्त करीत. उदा. ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटात नायक अरुण सरनाईक त्यांना गावच्या सरपंचाकडे, म्हणजेच चित्रपटाच्या खलनायकाकडे, पाठवितो. सुरुवातीला जयश्रीबाई त्याच्याकडे जाण्यास आढेवेढे घेतात. त्यावर मी आहे तुझ्यामागे. तू घाबरू नकोस, अशा आशयाच्या संवादाने अरुण सरनाईक त्यांना धीर देतो. ठरल्याप्रमाणे जयश्रीताई पुढे आणि अरुण सरनाईक मागे असे ते सरपंचाच्या वाड्यात जातात. सरपंचाबरोबर आत जाताना जयश्रीताई घाबरलेल्या असतात. त्या सारख्या डोक्यावरील पदर सावरीत मागे वळून पाहात असतात.

अरुण सरनाईक नक्की मागे येत आहेत ना, याची खात्री पटवून घेत असतात. त्यावेळी त्यांनी केलेला अभिनय लाजवाब होता. जयश्रीताई या केवळ मराठी चित्रपटात चमकल्या नाहीत तर हिंदी चित्रपटातही त्यांनी आपल्या अदाकारीचा सुवर्ण ठसा उमटवला. तुफान में प्यार कहाँ व वीर बजरंग (१९६६), पूनम का चाँद व ये दिल किसको दूँ (१९६७), हर हर गंगे व बहारों के सपने (१९६७), बलराम श्रीकृष्ण (१९६८) इत्यादी हिंदी चित्रपटांतील जयश्रीताईंची भूमिका कोण बरे विसरेल? मराठीतील त्यांच्या यशस्वी चित्रपटांची यादी तर लांबलचक आहे. त्यापैकी ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटाचा विशेष उल्लेख करावा लागेल.

हे सुद्धा वाचा
Shah Rukh Khan Birthday : पडद्यावरच नाही तर रिअर लाईफ मध्ये सुद्धा ‘बादशहा’च!
Smita Patil : स्पॉट बॉयच्या घरासाठी पर्समधून पैसे काढून देणारी ‘स्मिता पाटील’

‘माणदेश एक्स्प्रेस’ ललिता बाबरचा संघर्ष लवकरच मोठ्या पडद्यावर; अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत

२९ एप्रिल, १९५९ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्याकाळी पुण्यातील ‘आर्यन’ चित्रपटगृहात तब्बल १३२ आठवडे चालला. या १३२ आठवड्यात चित्रपटाचे चारही खेळ सतत हाऊसफुल राहिले. त्यांचा हा अनोखा विक्रम कोणत्याही मराठी सिनेमाने अद्याप मोडलेला नाही. अशा या गुणी अभिनेत्रीचे चित्रपट पडद्यावर पाहात आणि रविवारी दुपारी आकाशवाणीवर या चित्रपटांच्या ध्वनीमुद्रिका ऐकत आम्ही लहानाचे माेठे झालो. जयश्रीताईंना आम्ही कधीच विसरू शकणार नाही. जयश्रीताईंचे पती बाळ धुरी हे देखील प्रचंड ताकदीचे लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांचे चिरंजीव आनंद धुरी बँकिंगमध्ये आहेत. या पिता-पुत्रांनी ‘जयश्री गडकर प्रतिष्ठान’ स्थापन केले आहे. या प्रतिष्ठानद्वारे ललित कलांना प्रोत्साहन देण्याचे काम ते करतात. ही एक प्रकारे जयश्रीताईंना आदरांजलीच आहे. जयश्रीताईंच्या पवित्र स्मृतीस आमचे कोटी कोटी प्रणाम!

-नरेंद्र वि.वाबळे, अध्यक्ष मुंबई मराठी पत्रकार संघ

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी