33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
HomeसंपादकीयGanpatrao Deshmukh : विधानसभेचे विद्यापीठ !

Ganpatrao Deshmukh : विधानसभेचे विद्यापीठ !

दिवंगत गणपतराव देशमुख यांची १० जुलै ही पुण्यतिथी, तर १० ऑगस्ट रोजी जयंती आहे. आपल्या निस्पृह व निष्कलंक व्यक्तिमत्वाने गणपतराव देशमुख यांनी विधानसभेची उंची वाढविली. राजकारणात इतका सज्जन माणूस पुन्हा होणार नाही. त्या पार्श्वभूमीवर गणपतराव देशमुख यांच्या कार्याचा आढावा घेणारी लेखमाला 'लय भारी'च्या वतीने सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री. रंगनाथ चोरमूले यांनी लिहिलेला हा लेख आम्ही प्रसिद्ध करीत आहोत.

गणपतराव देशमुख यांची म्हणजेच महाराष्ट्राच्या आबासाहेबांची ती 1972 ची निवडणूक होती. काकासाहेब साळुंखे त्यांचे प्रतिस्पर्धी होते आणि सांगोला तहसिलदार कचेरीसमोर शेतकरी धाय मोकलून रडत होते. कारण एवढा मोठा दुष्काळ पडलाय आणि आबासाहेब निवडणूक हरले होते. पण हरले ते आबासाहेब कसले ? आपल्या भारदार आणि कसदार खणखणीत आवाजात आसवे गाळणार्‍या शेतकर्‍यांना म्हणाले, मी हरलो असलो तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही. उद्याच तहसिलदार कचेरीवर मोर्चा काढायचा आहे. जनावरांना चारा आणि गरीबाला धान्य मिळालेच पाहिजे.

आबासाहेब हरले होते, कारण शंकरराव मोहिते-पाटील यांनी सारी ताकद पणाला लावली होती. माळशिरस – अकलूजच्या ऊसाच्या ट्रक आणि ट्रॉली सांगोला तालुक्यात वाड्यावस्त्यांवर फिरत होत्या. सांगोला मतदारसंघाचे काही भाग वगळून पिलीव हा नवखा पण मोहिते-पाटलांना अनुकूल आणि आबासाहेबांना नवखा असलेला भाग सांगोला विधानसभा मतदार संघाला जोडला होता. मोहिते-पाटील यांचं लक्ष भोजन महाराष्ट्राने अनुभवलं असेलच, त्या मोहिते-पाटलांची ताकद सांगोल्याचा मतदार ओळखू शकला नाही. तेव्हा शंकरराव मोहिते-पाटील नुकताच फॉरेनचा दौरा करून आले होते आणि त्या देशातल्या विकासाबाबत बक्कळ भाषणे ठोकत होते. मीही काही भाषणाला हजेरी लावली होती. त्या देशातला झाडूवाला मोटारसायकलवर येतो आणि झाडू मारून झाल्यावर मोटारसायकलवर बसून आपल्या घरी जातो हे त्यांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आम्हाला खरं नाही वाटलं. कारण त्यावेळी पूर्ण सांगोला शहरात एक गणपतराव देशमुख आणि दुसरी आय.एम. शेख यांयाकडे एक मोटारसायकल आणि जीप होती. कारण आय. एम. शेख यांची टुरींग टॉकीज त्यावेळी चालत होती. सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे संस्थापक आणि मुख्याध्यापक आदरणीय बापूसाहेब झपके सर पण त्यांच्या साध्या सायकलनेच हायस्कूलवर यायचे. 1972 चा भयाण दुष्काळ सांगोलावासियांनी झेलला. लोक घरदारं सोडून जगण्यासाठी ऊसतोडीला सांगली कोल्हापूरला गेले. म्हातारी कोतारी घरात राहिली. उभी झाडं वाळून वटून गेली. जी झाडं जगली त्यांना पाला राहिला नाही. या सगळ्या भयाण परिस्थितीत सांगोला तालुक्यातील जनतेला एकच आधार होता गणपतराव देशमुख. म्हणजेच आबासाहेब ! गणपतराव देशमुख भले त्यावेळी आमदार नव्हते परंतु लोकांसाठी ते आमदारच होते. आबासाहेबांचे एक वैशिष्ठ्य होतं. ते आमदार नव्हते तेव्हाही लोक त्यांना आमदार म्हणूनच संबोधायचे !  आणि मंत्री झाले तरी लोक त्यांना आमदार साहेबच म्हणायचे. त्यांच्या दृष्टीनं हक्कानं आपलं काम सांगायचा आणि काम करून घ्यायचा एकच माणूस म्हणजे आमदार गणपतराव देशमुख !

काकासाहेब साळुंखे यांचे अकाली निधन झाले आणि काकींना हरवून गणपतराव देशमुख पुन्हा आमदार झाले. मात्र काकींविषयीचा त्यांचा आदर तसूभरही ढळला नाही. त्यांचे कौटुंबिक संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आणि आदराचे होते.

आबासाहेबांनी 1972 चा दुष्काळ पाहिला, अनुभवला आणि झेलला होता. सांगोल्याचा कायमचा दुष्काळ कसा हटवायचा याचा रात्रंदिन ध्यास घेतला होताच. कमी पाण्यावर पिकं कशी घेता येतील याचा अभ्यास केला. शेती तज्ज्ञांशी चर्चा केल्या आणि बोर, डाळिंबाचं पीक कसं घेता येईल याचे धडे शेतकर्‍यांना दिले.

हे सुद्धा वाचा

दिवंगत गणपतराव देशमुखांचे नाव घेऊन पळपुट्या आमदाराची निर्लज्जे विधाने

गणपतराव देशमुख म्हणजे साक्षात देवमाणूस !

विधान भवन परिसरात गणपतराव देशमुख यांचा पुतळा उभारण्याची मागणी

शरद पवारांनी गणपतराव देशमुखांच्या सोबतच्या जागवल्या जुन्या आठवणी

स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही घोषणा प्रचलित केली. परंतु गणपतराव देशमुख यांनी ही योजना खर्‍या अर्थाने सांगोला मतदारसंघात राबविली. जिथे ओढा, ओघळ दिसेल तिथे बांध बंधारे घातले. लोकांनीही त्यांना साथ दिली. बांध घालताना कुणी अडविले नाही. बांध घातल्याने शिवारातले पाणी मात्र शिवारातच अडवले गेले. जमिनीतच जिरवले गेले आणि कोरड्या ठाक विहिरीही पाझरायला लागल्या. पावसाचा काहीच भरवसा नसतानाही हळूहळू फळबागा वाढायला लागल्या. रोजगार हमीची कामे जिथे तिथे व्हायला लागली. हाताला काम मिळाले. कामाचा दामही मिळाला. कोरडवाहू शेतकरी आणि भूमीहीन कामगारही दोन घास सुखाने खाऊ लागले. 1972 च्या दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकर्‍यांना झाडावेलींचे महत्त्व कळले. जशा फळबागा फुलायला लागल्या तसेच नालाबंडींगच्या बांधावर लिंब, बाभळीची झाडेही डोलायला लागली. ही किमया गणपतराव देशमुख यांच्यामुळेच घडली यात शंका नाही. अमुक गावाच्या पूर्वेला ओढ्यावर बांध घातला आहे, त्या बांधाच्या खाली पूर्व बाजूला कोणाची जमीन आहे बघा ती दिली तर तिथे विहिरीला पाणी लागू शकेल आणि त्या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटू शकेल हे सांगोल्यात आपल्या घरी बसूनही आबासाहेब सांगू शकत इतका सारा मतदारसंघ त्यांच्या रोमारोमात आणि विचारात भिणला होता. हा त्यांच्या डोक्यातला गुगलमॅप म्हणजे एक आश्‍चर्यच होते.

पण एवढ्याने काही भागणारे नव्हते. सांगली, सातार्‍याचा पूर्व भाग, सोलापूरचा दक्षिण भाग हा कायम दुष्काळी भाग म्हणूनच ओळखला जायचा. तीन – तीन वर्षे पाऊस दडी मारून बसायचा. कधी पडलाच तर थुईथुई आणि पुन्हा कोरडेपण. जमिनी आणि इथल्या शेतकर्‍यांची मनेही करपलेली, भेगाळलेली. यासाठी काय करता येईल ?  इथला दुष्काळ कायमचा कसा नाहीसा करता येईल याचा विचार सतत आबासाहेबांच्या मनात घोळत असायचा.

सभा, मोर्चे काढून झाले, जलतज्ज्ञांशी चर्चा करणे आणि या दुष्काळी भागासाठी काय करता येईल याचा सततचा ध्यास. यातूनच नागजची पाणी परीषद भरविण्याचा विचार पुढे आला. ते वर्ष होतं 1974 चं. आचार विचारांची भेंडोळी तयारच होती आणि उलटी गंगा खालून वर कशी आणता येईल याचे सुतोवाच झाले. भगीरथाने कृष्णामाई खालून वर आणण्याचा विचार मांडला. त्यावेळी लोकांनी या गोष्टीला फारसे महत्व दिले नाही कारण ही अशक्यप्राय अशीच गोष्ट होती. पण गप्प बसतील ते आमदार गणपतराव देशमुख कसले ? गाठीभेटी सुरुच होत्या. ही गोष्ट वसंतदादा पाटील यांच्यासमोर मांडली. वसंतदादांचा स्वभाव हा विधायक राज्यकर्त्याचाच होता. त्यांनी नकार दिला नाही. सर्व्हे करून पाहूया. कितपत शक्य आहे ते कळेल तरी असे त्यांनी बोलून दाखविले आणि भगीरथाच्या प्रयत्नाला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. कृष्णा नदीचं पाणी घाटमाथ्यावरून उचलून सांगली, सातारा, सोलापूरच्या दुष्काळी पट्ट्यातील शेतकर्‍यांच्या शेतात कसं आणता येईल याचं स्वप्न आबासाहेबांनी पाहिलं आणि स्वप्नवत वाटणारी टेंभू योजना साकार केली.

सांगोला शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न बिकटच होता. सांगोला शहराच्या चारही बाजूला पिण्याच्या पाण्यासाठी विहीरी खोदून पाहिल्या पण पाणी लागले नाही. खेड्यापाड्यात पिण्याच्या पाण्याची स्थिती तर आणखीच बिकट होती. मग आमदार गणपतराव देशमुख यांनी चंद्रभागेलाच साकडे घातले आणि 100 कोटी रुपये खर्चाची शीरबावी प्रादेशीक पाणीपुरवठा योजना 82 खेड्यांसाठी सरकारदरबारी मंजूर करून घेतली आणि सांगोला शहरासाठीसुद्धा चंद्रभागेतूनच पाणी पुरवठा योजना सुरू केली.

शेतीसाठी कृष्णामाई आणि पिण्याच्या पाण्यासाठी चंद्रभागा सांगोल्याच्या माळरानावर अवतरल्या त्या या भगीरथाच्या प्रयत्नांमुळेच. पण हे काम मी केलं असं कधीच त्यांनी कुठं सांगितलं नाही. ही टेंभू योजना जेव्हा आकार घेत होती तेव्हा ज्यांचा जन्मही झाला नव्हता त्यांनी  टेंभू योजनेचं श्रेय आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला. पण आबासाहेबांनी त्याबद्दल कधी चकार शब्दही काढला नाही. जिथे हात लावील तिथं सोनं व्हावं अशी किमया या अवलियाच्या हातात होती.

सांगोला किंवा आजूबाजूच्या परिसरात कुठे कापसाचे बोंडही शेतात पिकत नाही त्या सांगोल्याच्या शेतकरी सहकारी सूत गिरणीची निर्मिती हे मोठं धाडसाचं पाऊल होतं, पण आबासाहेबांनी ते यशस्वी करून दाखविलं. जोपर्यंत शेतकर्‍यांनी घेतलेल्या शेअर्सची रक्कम डिव्हिडंडच्या स्वरूपात त्याला परत मिळणार नाही तोपर्यंत सूतगिरणीच्या पैशाचा चहा पण पिणार नाही. ही त्यांची प्रतिज्ञा होती आणि ती त्यांनी खरी करून दाखविली. जी मशिनरी लाकडाच्या खोक्यात पॅकिंग करून आली त्या फळ्या फेकून दिल्या नाहीत तर त्याचे फर्निचर बनविले. भर सभेत चेअरमनला सुनविले, वसंतराव, तुम्हाला माहीत आहे का चोपडीच्या शेतकर्‍याने नातवाला दूध पिण्यासाठी घेतलेली शेळी विकून आपल्या सूत गिरणीचे शेअर्स घेतले आहेत. वायफळ खर्च करून बिलकूल चालणार नाही. पण ही जाणीव आज किती जणांमध्ये आहे ? सूत गिरणी तर उभी राहिलीच. पण कित्येक वर्षे देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट सूत गिरणीचे पुरस्कार या शेतकरी सहकारी सूत गिरणीने पटकावले. सांगून कोणाला खरेही वाटणार नाही पण हे खरे आहे की, आबासाहेबांनी सांगोल्यात महिलांचा मेळावा घेवून महिला सूत गिरणी चालू करण्याचा आपला मनोदय सांगितला आणि चार-चार रांगा लावून त्याच ठिकाणी लोकांनी शेअर्सचे पैसे जमा केले. ती कॅश पोत्यात भरून जीप गाडीने बँकेत नेवून भरली. हा विश्‍वास आणि श्रद्धा सांगोलकरांनी नेहमीच आबासाहेबांच्या पायाशी वाहिली. हे सारं करताना वसंतराव पाटील, जगन्नाथराव लिगाडे, रामभाऊ वाघमोडे, जगन्नाथराव कोळेकर, बाबासाहेब देशमुख इत्यादी जीवाभावाची माणसं त्यांना लाभली. ती मध्यंतरीच्या काळात त्यांना सोडून गेली पण जगाचा निरोप घेतानाही आपल्या श्रद्धा आबासाहेबांच्या चरणावर वाहून गेली. का माहिती नाही पण महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांचा आबासाहेब यांच्यावर खूप जीव होता. त्यांनी मनापासून त्यांच्यावर प्रेम केले. 1978 साली पुलोद सरकारात आणि त्यानंतर 1990 मध्येही शरद पवार साहेब यांनी त्यांना मंत्रीपद दिले. आबासाहेबांच्या समोर खूपदा सत्तेच्या मोहाचे क्षण आणले गेले. पण त्या मोहाला ते कधीच बळी पडले नाहीत. काळानुरूप तत्वं आणि आदर्श बदलले जातात पण आबासाहेबांच्या बाबतीत तत्वं आणि आदर्श कधीच बदलले नाहीत.

आबासाहेबांची 50 वर्षांची विधानसभेतील कारकीर्द महाराष्ट्राच्या विधायक राजकारणाला नवे आयाम देवून जाणारी अशीच राहिली. शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य माणूस हाच त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. विधानसभेत बहुमताने घेतलेले आणि होयचे बहुमत, होयचे बहुमत म्हणून अध्यक्षांनी मंजुरीचे सुतोवाच केल्यानंतर गणपतराव देशमुख आपल्या आसनावरून उठून उभे राहिलेले आणि तो निर्णय बहुमताने घेतलेला असला तरी कसा चुकीचा आहे हे त्यांनी पटवून दिलेले मी प्रत्यक्षदर्शी सभागृहात पाहिलेले आहे. सभागृहाने तो निर्णय मागे घेतला हा आबासाहेबांचा सन्मानच होता. आबासाहेब हे विधानसभेचे विद्यापीठ म्हणूनच वावरले आणि यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरदचंद्रजी पवार यांच्या विधायक राजकारणाच्या परंपरेत आपला एक वेगळा ठसा उमटवूनही गेले. एकदा पाटबंधारे विभागाच्या चर्चेवेळी आबासाहेबांनी संपूर्ण सभागृहाचे वातावरणच बदलून टाकले. कारण विरोधी पक्षातल्या आमदारांप्रमाणेच आबासाहेबांना सत्ताधारी पक्षातल्या आमदारांनी संपूर्ण पाठिंबा दिला. त्यावेळचे आबासाहेबांचे भाषण ज्यांनी ऐकले ते धन्य झाले. ते  ऐकण्याचे भाग्य मला मिळाले आणि ते आठवले तर आजही कंठ दाटून येतो आणि आबासाहेब आजही असायला हवे होते हा विचार मनाला सतावत राहतो. फक्त सांगोला मतदारसंघासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आबासाहेबांची गरज होती. त्यांचा विचार संपूर्ण महाराष्ट्राच्या हिताचा असायचा. मागणी संपूर्ण राज्यातल्या शेतकरी, शेतमजुरांची असायची !

सन 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी उलटसुलट बातम्या येत होत्या की, आबासाहेब 2019 ची विधानसभेची निवडणूक लढविणार नाहीत. कार्यकर्ते नाराज होवू नयेत म्हणून त्यांनी होकार किंवा नकार दाखवला नाही. आम्ही खासगीत बोलताना त्यांना 2019 ची निवडणूक लढविण्याचा आग्रह करत होतो. कोकणातले एक शेटे नावाचे आमदार अंध होते तरी ते आमदार होते असे समजाविण्याचेही प्रयत्न आम्ही कार्यकर्त्यांनी करून पाहिले. हल्ली मला डोळ्याच्या समस्येमुळे वाचता येत नाही. त्यामुळे दुसर्‍याकडून वाचून घ्यावे लागते. मी आतापर्यंत अभ्यास करून विधानसभेत मुद्दे मांडले आहेत. आता त्यावर मर्यादा येत आहेत आणि आता आपल्या वयाचाही विचार करायला हवा असे ते समजावण्याच्या स्वरात आमची समजून काढत. पण त्यामुळे आमचे कधीच समाधान झाले नाही.

निवडणुकीच्या ऐन तोंडावर तर कार्यकर्त्यांनी त्यांच्या पायावर लोटांगण घातले. त्यांच्या अश्रूंचे बांध फुटले. पण आबासाहेब आपल्या निश्‍चयापासून तसूभरही ढळले नाहीत. पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांनी राजकारणात यायला हवं असं त्यांचं मत होतं. पक्षाच्या वतीनं आणि आबासाहेबांच्या संमतीनं उमेदवाराचे नावही जाहीर झाले. पण कार्यकर्त्यांना ते मान्य नव्हते. कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. आबासाहेब पुन्हा एकदा तुम्हालाच मतदान करायची संधी द्या हे कार्यकर्त्यांचे आर्जव आणि आक्रोश चालूच होता. एक चमत्कारीक वातावरण सांगोला मतदार संघात तयार झालं होतं. श्री. भाऊसाहेब रुपनर यांच्या नावाला कार्यकर्त्यांचा पूर्ण विरोध होता. आबासाहेबांचे थोरले चिरंजीव आण्णासाहेब देशमुख निवडणूक लढवायला तयार नव्हते. आण्णासाहेबांचे चिरंजीव डॉ. बाबासाहेब एम. डी. नंतरच्या विशेष शिक्षणासाठी कोलकात्याला होते. त्यामुळे त्यांचाही नकार मिळाला आणि आबासाहेबांचे धाकटे चिरंजीव चंद्रकांत देशमुख यांचे चिरंजीव डॉ. अनिकेत देशमुख यांना समजावून तयार केले. कार्यकर्तेही थोडे शांत झाले. मनातून आबासाहेबांविषयीची श्रद्धा त्यांना सतत सतावत होती. ज्या भाऊसाहेब रूपनर यांचे नाव आबासाहेबांनी सुचविले पण कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला ते भाऊसाहेब रूपनर विरोधी पक्षाला जावून मिळाले. आबासाहेबांनी ज्यांना राजकारणात सामावून घेतले, सांभाळून घेतले, मोठे केले तेही जातीपातीच्या नावाखाली विरोधी पक्षाला जावून मिळाले. आपला विजय 100 टक्के आहे या भ्रमात कार्यकर्ते गाफील राहिले आणि पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाचा विळा – कोयता असणारा लाल बावटा फडकवायचे आबासाहेबांचे स्वप्न धुळीला मिळाले. अगदी थोड्या मतांनी डॉ. अनिकेत देशमुख या आबासाहेबांच्या तरुण नातवाचा 2019 च्या निवडणूकीत पराभव झाला. हा पराभव आबासाहेब 94 व्या वर्षी पचवू शकले नाहीत.

ऊन, वारा, पाऊस याला न जुमानता 94 वर्षे उभे असलेले आणि कोणत्याही लोभा – मोहाला बळी न पडता जमीनीत पाय रोवून उभे असलेले हे झाड 30 जुलै 2021 रोजी पूर्णपणे कोसळले. असंख्य कार्यकर्त्यांची, शेतकरी, शेतमजुरांची हक्काची सावली अंतर्धान पावली. जनसामान्यांच्या हितासाठी झटणार्‍या, झगडणार्‍या एका ध्येयवेड्या भगिरथाचा 94 वर्षांचा प्रवास संपला.

रंगनाथ चोरमुले (लेखक निवृत्त अधिकारी असून ते गणपतराव देशमुख यांचे निकटवर्तीय सुद्धा आहेत)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी