28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeडॉ. बाबासाहेबांचे मूळ आडनाव आंबेडकर नव्हते; जाणून घ्या महामानवाच्या 'या' खास गोष्टी
Array

डॉ. बाबासाहेबांचे मूळ आडनाव आंबेडकर नव्हते; जाणून घ्या महामानवाच्या ‘या’ खास गोष्टी

सातार्‍याच्या शाळेत बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णाजी आंबेडकर नावाचे ब्राह्मण शिक्षक होते. आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडमिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमाला सुचविले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे भाग्यविधाते असे बिरुद मिरवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 14 एप्रिल रोजी 132 वी जयंती साजरी होणार आहे. दलित समाजासाठी बाबासाहेबांचा जन्मदिवस हा मोठा उत्सव असला तरी बाबासाहेब हे एक मोठे राष्ट्रपुरुष असल्याने दलितेतरही त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करतात. आज आम्ही तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या अशाच काही गोष्टींची माहिती देणार आहोत ज्यांच्याबद्दल आपण फार अनभिज्ञ आहोत.

01. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल 14 इ.स. 1891 साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. त्यांचे कुटूंब त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेले महारकुटुंब होते. वडील सुभेदार रामजी सकपाळ आणि आई भीमाबाई मुरबाडकर यांचे ते 14वे अपत्य होते. त्यांचे नाव भीमराव असे ठेवण्यात आले, त्यामुळे कुणी भीम, भीमा व भिवा नावानेही त्यांना हाक मारत.

02. इ.स. 1896 मध्ये अवघ्या 5 वर्षीय भीमरावांच्या आई भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी केले.

03. इ.स. 1896 मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली व ते सातारा येथे सुरुवातीला एका साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले.

04. बाबासाहेबांचे मूळ गाव कोकणातील आंबडवे व मूळ आडनाव सकपाळ होते. कणामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ असतांना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी सातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये ‘आंबडवेकर’ असे आडनाव 7 नोव्हेंबर 1900 रोजी नोंदवले.

05. सातार्‍याच्या शाळेत बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णाजी केशव आंबेडकर नावाचे ब्राह्मण शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडमिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमाला सुचविले. त्याला बाळ भीमाने लगेच होकार दिला आणि बाबासाहेबांचे आडनाव आंबडवेकराचे आंबेडकर झाले. तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून बाळ भीमाचे नाव आंबेडकर झाले.

06. कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांनाहिंदू साहित्याची ओळख करून दिली. चौथीची परिक्षा पास झाल्यावर त्यांना दादा केळूस्कर गुरूजींनी स्वत: लिहिलेले ‘भगवान बुद्धाचे चरित्र’ हे पुस्तक भेट म्हणून दिले.

07. भीमराव आंबेडकर यांनी मुंबई येथील एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकून नोव्हेंबर 1912 मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची परीक्षा दिली. जानेवारी 1913 मध्ये ते बी.ए. च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तत्पूर्वी जानेवारी 1908 पासून गुरुवर्य केळुसकर आणि निर्णय सागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांच्या प्रयत्‍नांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रु. 25/- दरमहा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची पदवी संपादन करणारा अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी होण्याचा मान आंबेडकरांना मिळाला.

08. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते आणि त्यांना ही कुशाग्र बुद्धी आणि तल्लख स्मरणशक्ती ईश्वरदत्त नव्हे तर आपल्या प्रचंड मेहनतीने मिळाली होती. इ.स. 1912 मध्ये बी.ए., इ.स. 1915 मध्ये डबल एम.ए., इ.स. 1917 मध्ये पी.एचडी., इ.स. 1921 मध्ये एम.एस्‌‍सी., इ.स.1922 मध्ये बार-अॅट-लॉ,इ.स. १९२३ मध्ये डी.एस्सी., इ.स. 1952 मध्ये एल्‌एल.डी., इ.स. 1953 मध्ये डी.लिट् आणि इतर अशा सर्व मिळून एकूण 32 पदव्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपादन केल्या होत्या.

09. कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात पंजाब केसरी म्हणून प्रसिद्ध झालेले लाला लजपतराय यांच्याशी ओळख झाली. बाबासाहेब ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत. असा विद्यार्थी कोण याची उत्सुकता लाला लजपतराय यांना होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली.

10. गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हाच बाबासाहेबांच्या विचारांचा आणि आचरणाचाही पाया होता. तत्त्वज्ञानाचा पाया पक्का असेल तर आपल्याला प्रगतीची मोठी उडी घेता येते, हे बाबासाहेबांना पक्के ठाऊक होते. त्यासाठी त्यांनी सुमारे तीस वर्षे घेतली, सर्व धर्माचा व्यवस्थित अभ्यास केला आणि मग जाणीवपूर्वक बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

डॉ. बाबासाहेबांचे मूळ आडनाव आंबेडकर नव्हते; जाणून घ्या महामानवाच्या 'या' खास गोष्टी
Photo credit- google : Dalit Buddhist movement

हे सुद्धा वाचा: 

आता गुडीपाडवा, आंबेडकर जयंतीलाही मिळणार आनंदाचा शिधा; राज्य शासनाचा निर्णय

डॉ. बाबासाहेब आणि रमाई यांच्या लग्नाचा आज जल्लोष

भायखळा हबीब मार्केटमध्ये बाबासाहेब यांचं स्मारक व्हावं; ज्येष्ठ लेखक जयराम पवार यांची मागणी

Dr. Babasaheb Ambedkar, Dr. Babasaheb Ambedkar jayanti 2023, Dr. Babasaheb original surname is not Ambedkar; Know these special things

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी