33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयसरकार अस्थिर, बदल्यांसाठी ‘किंमत’ मोजलेले अधिकारी हवालदिल

सरकार अस्थिर, बदल्यांसाठी ‘किंमत’ मोजलेले अधिकारी हवालदिल

टीम लय भारी

मुंबई : मलईदार पदावर बदली करून मिळावी यासाठी अधिकारी नाना खटपटी करीत असतात. यंदा मे महिन्यामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार होत्या. आपल्याला हव्या त्या पदावर बदली मिळावी म्हणून अनेक अधिकाऱ्यांनी जबराट किंमत मोजली होती. परंतु सरकार अल्पमतात आल्याने अधिकाऱ्यांच्या बदल्यांनाही कोलदांडा बसला आहे.

‘सांगता येईना, अन् सहनही होईना’ अशी अवस्था या अधिकाऱ्यांची झाली आहे. गृह, महसूल, कृषी, पीडब्ल्यूडी, सहकार, शिक्षण, उच्च शिक्षण, सामान्य प्रशासन, आरोग्य अशा विविध खात्यांतील अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकांनी एप्रिल – मे महिन्यांत मंत्रालयात चकरा मारल्या होत्या.

मतदारसंघातील आमदारांची शिफारस पत्रे, ज्या मतदारसंघात बदली हवी आहे, तेथील आमदारांची शिफारस पत्रे घेऊन या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांकडे आर्जवे केली होती. त्यासाठी मोठी ‘किंमत’ही मोजली होती. मुंबईसारख्या ठिकाणच्या बदलीसाठी तर करोडमोलाची किंमत मोजली गेल्याचे सूत्रांनी सांगितले. मोजलेली किंमत तर परत मिळणार नाहीच, पण पदावरही नियुक्ती होणार नाही. त्यामुळे ‘तेल गेले तूप गेले. हाती धुपाटणे राहीले’ अशी केविलवाणी अवस्था या अधिकाऱ्यांची झाली आहे.

विधानपरिषद निवडणुकांमुळे बदल्या पुढे ढकलल्या होत्या. मे महिनाअखेर बदल्या होणार होत्या. परंतु जूनमध्ये विधानपरिषदेच्या खासदार व आमदार पदासाठी निवडणुका होणार होत्या. तत्पुर्वी अनेक आमदारांनी बदल्यांची शिफारस पत्रे विविध मंत्र्यांकडे दिली होती. सगळ्याच आमदारांच्या मागण्या पूर्ण होणार नव्हत्या. परिणामी सांगितलेल्या बदल्या केल्या नाहीत, म्हणून आमदार नाराज झाले असते. त्यामुळे या बदल्या महिनाभर पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

त्यानुसार जून अखेर बदल्या होणे अपेक्षित होते. परंतु त्याअगोदरच सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे अल्पमतात आलेल्या सरकारला बदल्यांचा निर्णय घेणे कठीण होणार आहे. त्याचा सर्वाधिक फटका ज्या अधिकाऱ्याने बदलीसाठी किंमत मोजली आहे, त्याला बसणार असल्याचे बोलले जात आहे.

हे सुध्दा वाचा:

लवकरच ‘शिंदे‘ मुंबईत येण्याची शक्यता

भाजपचा शिवसेना फोडण्याचा पहिला डाव यशस्वी : माजी आमदार अनिल गोटे

राज्यपालांनी सरकारला बजावली नोटीस

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी