27 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeआरोग्यTruth : सायन हॉस्पिटलच्या 'त्या' व्हिडिओ मागची सत्यता!

Truth : सायन हॉस्पिटलच्या ‘त्या’ व्हिडिओ मागची सत्यता!

  • सुरेश नंदिरे

काही दिवसांपूर्वी सायन हॉस्पिटल (Sion Hospital Mumbai) मधील कोरोना (Coronavirus) रुग्णाशेजारी मृतदेह ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला होता. त्यानंतर तेथील कर्मचारी सीमा कांबळे (Seema Kamble) यांचा लेख वाचण्यात आला. या सर्व प्रकाराची एक पत्रकार म्हणून माहिती घेतल्यावर अनेक गोष्टींचा खुलासा झाला. तो मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.

आशिया खंडात ज्या काही चांगल्या रुग्णालयांना गृहित धरले जाते त्यापैकी सायन रुग्णालय हे एक आहे. त्याचे पूर्ण नाव लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय असे आहे. अनेक जण शिव रुग्णालय या नावाने ही ओळखतात. या हॉस्पिटलच्या हद्दीत काही पोलीस ठाणे येतात. सायन, माटूंगा, धारावी, अंटोप हिल इ. या परिसरातील बेवारस मृतदेह, अपघातातील जखमींना या ठिकाणी आणले जाते. तर आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील हजारो रुग्ण या ठिकाणी दररोज उपचार घेण्यासाठी येत असतात. या शिवाय कुर्ला, चेंबूर, सायन, शाहूनगर, लेबर कॅम्प, अँटॉप हिल या स्लम भागातील लोकांचाही त्यात भरणा असतो. याशिवाय रायगड, रत्नागिरी, खोपोली या भागात झालेल्या अपघातातील जखमींना उपचारासाठी याच ठिकाणी आणले जाते. त्याचे मुख्य कारण म्हणजे हे रुग्णालय राष्ट्रीय महामार्गाला लागून आहे. त्यामुळे या रुग्णालयावर आणि येथील कर्मचा-यांवर प्रचंड ताण असतो. ओपीडीत दररोज हजारो रुग्णांना तपासले जाते. लहान – सहान शस्त्रक्रिया करून दररोज हजारो रुग्णांना त्यांच्या घरी पाठवण्यात येते. सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत ओपीडी मध्ये हजारो रुग्णांची संख्या असते. छोटे मोठे आजार घेऊन या ठिकाणी रुग्ण येत असतात. यात अनेक गरीब मजूर रोजंदारीवर काम करणारे असतात. पैशा अभावी ते या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे खासगी रुग्णालयात जाण्याइतपत त्यांच्याकडे पैसे नसतात. बाहेर सिटी स्कॅन करायला गेले तर तीन हजार आणि MRI ला पाच हजार रुपये लागतात. मात्र याठिकाणी सिटी स्कॅनला बाराशे तर MRI ला अडीच हजार रुपये घेतात. इतर सर्व रक्त तपासण्या या ठिकाणी मोफत केल्या जातात. बाहेर मात्र हजारो रुपये आणि गरज नसताना खाजगी डॉक्टर विविध तपासण्या करून घेतात, मात्र या ठिकाणी गरज तेवढ्याच तपासण्या केल्या जातात. टुडी इको केवळ पाचशे रुपयात केली जाते. तर एक्सरे नाममात्र पैसे घेऊन काढला जातो. बाहेर एक्सरे, ईसीजी काढण्यासाठी दोनशे रुपये द्यावे लागतात. अशा प्रकारे रुग्णांना सायन रुग्णालयात सेवा दिली जाते आणि ती सेवा घेण्यासाठी या ठिकाणी नेहमी गर्दी असते. ओपीडी मध्ये तपासणी केल्यानंतर गरज वाटल्यास रुग्णांना अॅडमिट करून उपचार केले जातात. मात्र सध्या रुग्णालयात कर्मचा-यांची संख्या खूपच कमी आणि त्यातच कर्मचा-यांची भरती नसल्याने इतर कर्मचा-यांवर त्याचा ताण पडतो. उदाहरण द्यायचे झाले तर रुग्णालयात ज्या भागावर शस्रक्रिया करायची आहे त्या जागेवरील केस कापले जातात. ही कामे करण्यासाठी रुग्णालयात पूर्वी 28 कर्मचारी होते, आता मात्र ते काम 13 कर्मचा-यांकडून केले जाते. अशी परिस्थिती सर्व विभागात आहे. रुग्ण जास्त, त्या मानाने रुग्णालयात खाट कमी असतात. मात्र रुग्णांचे नातेवाईक डॉक्‍टरांसमोर गयावया करून रुग्णांवर उपचार करण्यासाठी विनंती करीत असतात. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने जागा नसताना या रुग्णांना जमिनीवर किंवा एका खाटेवर दोन रुग्ण ठेवून त्यांच्यावर उपचार केले जातात. त्यात डॉक्टरांचे काय चुकले.

सायन हॉस्पिटलच्या बाबतीत सांगायचे झाल्यास हिंदुजा, जसलोक पेक्षाही चांगला येथील क्रोमा सेंटर असल्याचे डॉक्टर सांगतात. या ठिकाणी प्लास्टिक सर्जरी करणारे डॉक्टर अनुभवी तसेच हा विभाग सर्व सुविधांनी सुसज्ज आहे. येथील स्किन विभाग देखील चांगली सेवा देतो. आर्थोपेडिक विभाग देखील चांगले आहेत. आपत्कालीन विभागात सर्व विभागाचे डॉक्टर रात्रंदिवस सेवा देत असतात. अर्थोपेडीक डॉक्टर खंडेलवाल यांनी भिवंडीतील अपघातात एका व्यक्तीचा तुटलेला पाय जोडून या रुग्णाला नवीन जीवदान दिले होते तर 2007 साली माहीम या ठिकाणी रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोटात एका अतिरेक्याचा जळालेला अर्धवट मृतदेह सापडला होता. तेव्हा डॉक्टर राजेश डेरे हे फॉरेन्सिक एक्सपर्ट असून त्यांनी या अतिरेक्यांचा चेहरा प्लास्टिक सर्जरीने बनवला होता. जेणे करून पोलिसांना तपास कामात खूप मदत झाली होती. अशी अनेक उदाहरण देता येतील. या ठिकाणी अनेक शस्रक्रिया होतात. अनेकांना जीवदान दिले जाते. मृत्युच्या दाढेतून रुग्णांना परत आणण्याचे काम सर्वच डॉक्टर करीत असतात. मात्र त्यांची प्रसिद्धी कुठेच केली जात नाही. कारण मनपाचे डॉक्टर स्वतःच्या कामाचे मार्केटिंग करत नाहीत. त्यांना राजकारण करता येत नाही, म्हणून चांगले काम करीत असतानाही ते नावारूपाला येत नाही.

आता वळूयात मुख्य मुद्द्याकडे, ज्यामुळे हा लेख लिहिण्याची गरज पडली, काही दिवसांपूर्वी मृतदेहा शेजारी काही रुग्णांवर उपचार करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अगदी बरोबर ते खरे आहे. मात्र त्या मागची सत्यता कोणीही जाणून घेतली नाही हे दुर्दैवं.

ज्या विभागाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता तो सायन हॉस्पिटल मधील तीन नंबरचा वार्ड, पूर्वी या ठिकाणी कान, नाक आणि घसा या संबंधित रुग्णांवर उपचार केले जात होते. मात्र Covid-19 चे रुग्ण वाढू लागल्याने येथे सात वार्ड Covid-19 साठी तयार करण्यात आले. व्हायरल झालेल्या व्हिडिओत जे मृतदेह दिसत आहेत त्यांच्यावर याच ठिकाणी उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू नंतर संबंधित व्यक्ती ज्या ठिकाणी राहतो त्या भागातील पोलिसांना आणि नातेवाईकांना कळविण्यात येते. पोलीस येईपर्यंत दोन ते तीन तास निघून जातात. ते आल्यावर डॉक्टर मृत्यूचे कारण आणि डेट सर्टिफिकेट बनवितात, पंचनामा होतो आणि नंतर तो मृतदेह नातेवाईकांच्या उपस्थितीत शवविच्छेदनासाठी नेला जातो. Covid-19 बाबतीत हाच नियम लागू होतो. या ठिकाणी मात्र नातेवाईकांना कळविण्यात आल्यानंतर नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी लवकर आले नव्हते. दोन तासानंतर मृतदेह बांधण्यात आले तर पोलीस आणि डॉक्टरांची कागदपत्रे बनविण्यात काही वेळ गेला. त्यानंतर हे मृतदेह नातेवाईकांच्या उपस्थितीत रुग्णालय कर्मचारी स्मशानभूमीत घेऊन जातात. मात्र Covid-19 च्या मृतदेहांना नेण्यासाठी एकच रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना थेट स्मशानभूमीत नेण्यासाठी आणि ती परत येण्यासाठी वेळ लागत होता. शिवाय नातेवाईक वेळेवर येत नसल्याने मृतदेह त्या ठिकाणी पडून होते. Covid-19 च्या मृतदेहाला बेवारस किंवा इतर आजारांनी मृत्युमुखी पडलेल्या मृतदेहांमध्ये ठेवता येत नाही. सायन मध्ये अगोदरच अनेक बेवारस मृतदेहांनी कॉरोनर खच्चून भरलेला असतो. मग दररोज येणारे Covid-19 चे मृतदेह ठेवणार कुठे, हा एक प्रश्न असतो. त्यांना थेट वार्ड मधून स्मशानभूमीत नेण्यासाठी जो वेळ लागत होता, त्याचे नेमके हेच कारण होते. त्यामुळे मृतदेह वार्ड मध्ये ठेवलेले दिसून येत होते आणि याच वेळी हा व्हिडिओ काढण्यात आला असावा.

Covid-19 चे मृतदेह इकडे तिकडे नेण्याऐवजी एकाच ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्याचे कारण म्हणजे या मृतदेहांमुळे इतरांना त्याची बाधा होऊ नये, याची काळजी घेतली जात होती. आता Covid-19 चे रुग्ण उपचार घेत होते. त्यांना इतरत्र ही हलविता येत नव्हते. कारण Covid-19 साठी सात वार्ड स्पेशल तयार करण्यात आले होते. ते भरून गेले होते. मग यांना ठेवणार कुठे. त्यासाठी मृतदेहाशेजारी इतर रुग्ण उपचार घेताना दिसत होते. वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिले तर कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर किमान दोन तास मृतदेह त्याच ठिकाणी ठेवला जातो, कारण काही मृत व्यक्तींमध्ये परत जीव येण्याची शक्यता असते आणि असे काहींच्या बाबतीत घडले ही आहे. दोन तासांपर्यंत असे काही घडले नाही तर डॉक्टर त्याला मृत घोषित करतात. त्यानंतर रूग्णालयातील पोलीस विभाग तो व्यक्ती राहत असलेल्या संबंधित पोलीस ठाण्याला कळवितो. त्यानंतर नातेवाईक, पोलीस येतात सर्व सोपस्कार आटोपून मृतदेह घेऊन जातात. हा सर्व सोपस्कार करायला वेळ जातो. मात्र आता तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह अर्ध्या तासात बांधून घेऊन जात आहेत. अशातच एखाद्याचा जीव परत आला तर त्याला कोण जबाबदार?

दोनच दिवसांपूर्वी, दीड महिन्याच्या बाळाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे बाळ कोव्हिड पॉझिटिव्ह होते. फुफ्फुसांना सूज आली हाती. रात्री निदान झालं, की बाळाच्या जीवाला धोका आहे. मेंदूमध्ये रक्तस्त्राव सुद्धा होत आहे. रात्री २ वाजता डॉक्टरांची एक टीम तयार झाली. शस्रक्रियेला सुरवात झाली. बाळाच्या मेंदूवर येणारा रक्ताचा दाब कमी करण्यासाठी भूल देणा-या डॉक्टरांच्या लक्षात आले की त्यांच्या चेह-याला लावलेल्या मास्क आणि फेस शिल्डमुळे बाळाच्या जवळ जाऊन त्याच्या तोंडावाटे नळी सरकवता येत नाही. अवघ्या अडीच किलो वजनाचे ते बाळ कोरोनाशी झुंज देत होते. भूलतज्ञांनी क्षणात निर्णय घेतला आणि मास्क, फेस सिल्ड काढून टाकले.
COVID19 चा संसर्ग माहिती असतानाही, त्या बाळाच्या तोंडाजवळ जाऊन नळी तोंडावाटे आत घालण्याची प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली. ऑपरेशन करून भूलतज्ञ डॉक्टर १४ दिवसांसाठी स्वतःहून क्वारंटाईन झाले. हे आहे सायन हॉस्पिटल मधील डॉक्टर, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांनी ऑपरेशन केले. माणुसकी जीवंत असल्याचे हे एक उदाहरण आहे.

या हॉस्पिटलवर आधीच इतर रुग्णांचा प्रचंड ताण आणि जागा कमी असताना सात वार्ड Covid-19 साठी रुग्णालयाने उपलब्ध करून दिले ते माणुसकी म्हणून. मात्र असे व्हिडिओ व्हायरल करून सायन हॉस्पिटल किंवा मनपाची बदनामी कोणी करत असेल तर ते चुकीचे आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालयातून लाखो डॉक्टर शिक्षण घेऊन आज बाहेर रुग्णांना सेवा देत आहेत. लाखो रुग्ण येथे उपचार घेऊन उत्तर प्रदेश, बिहार आणि राज्यातील इतर भागात जातात. सायन हॉस्पिटल आणि येथील डॉक्टर त्यांच्यासाठी देवच आहेत. त्यासाठी अशा व्हिडिओना ते थारा देणार नाही. ज्यांना आपली पोळी भाजायची असेल त्यांना खुशाल ती भाजू द्या. लाखो लोकांना माहीत आहे येथील डॉक्टर कसे काम करतात. त्यामुळे अशा व्हिडिओ वर कोणी विश्वास ठेवणार नाही. कोरोनाच्या वाईट परिस्थितीही डॉक्टर, नर्स, पोलीस सर्व मनपा कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र काही विकृत लोक असले घाणेरडे कृत्य करीत असतात. आपत्कालीन परिस्थिती मध्ये काम करणा-या कर्मचा-यांना साथ द्यायची सोडून त्यांच्यावर ताण पडेल असे कृत्य करणे हे माणुसकीला शोभत नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी