30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रआधुनिक उपकरणांची निर्मिती न्यारी, आयटीआय विद्यार्थ्यांचे कौशल्य लय भारी..!

आधुनिक उपकरणांची निर्मिती न्यारी, आयटीआय विद्यार्थ्यांचे कौशल्य लय भारी..!

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे, “आयटीआय” मध्ये शिकणारे विद्यार्थीं त्यांच्या कौशल्य प्रशिक्षणाला कृतीची जोड देऊन समाजाला उपयोगी ठरतील अशी, उपकरणे तयार करू लागली आहेत. विद्यार्थ्यांच्या या नाविन्यपूर्ण कर्तृत्वामुळे राज्यसरकारचा कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचा उद्देश सफल होत असल्याचे दिसून आले आहे. नाशिकमधील सातपूर आयटीआयच्या ३० विद्यार्थ्यांनी उद्यानात व्यायामासाठी लागणारी ओपन जिमची आधुनिक उपकरणे तयार केली आहेत. ही उपकरणे लवकरच राज्यातील सुमारे ५०० आयटीआय संस्थांच्या परिसरात उभारली जाणार असून बाजारभावापेक्षा अतिशय कमी दरात उपलब्ध होणाऱ्या या उपकरणांना आता महापालिकांकडून देखील मागणी वाढू लागली आहे.

सातपूर आयटीआयमध्ये शिकणाऱ्या वेल्डर, फिटर, टर्नर, शीट मेटल या ट्रेडमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन ओपन जिमसाठी लागणारी दहा वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे मोठ्या कष्टाने विकसित केली आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कौशल्य गुणांचा वापर करून या उपकरणांचे आकर्षक डिझाईन करण्यापासून त्यांची प्रत्यक्ष निर्मिती केली आहे. दिसायला आणि वापरायला अतिशय उत्कृष्ट असलेली ही उपकरणे येत्या वर्षभरात सर्वच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये बसविली जाणार असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास संचालक दिगंबर दळवी यांनी खास “लय भारी”शी बोलताना दिली.

ते म्हणाले, आयटीआयमध्ये शिकणारे विद्यार्थी त्यांच्या कौशल्याचा प्रभावीपणे वापर करीत आहेत. ओपन जिमची उपकरणे बाजारपेठेत सुमारे साडेसात ते आठ लाख रुपये प्रती नग विकली जातात. ही उपकरणे सार्वजनिक उद्यानांमध्ये बसविण्यासाठी महापालिका, नगरपालिकांकडून मोठ्याप्रमाणात खर्च केला जातो. मात्र, आमच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेली उपकरणे केवळ अडीच ते तीन लाखांमध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे बाजारभावापेक्षा निम्म्या किंमतीत उपलब्ध होऊ शकणाऱ्या या उपकरणांना महापालिकांकडून मागणी येऊ लागली असल्याचे दळवी यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

“सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती”त अनेक किचकट, तांत्रिक अटींचा महापूर
केरळ ट्रेनला आग लावणाऱ्या माथेफिरुला एटीएसने केली अटक
राज्यात नवे सुधारित रेती धोरण लागू!

महापालिकांकडून मागणी

सातपूर शासकीय आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी ओपन जिमसाठी लागणारी अत्याधुनिक पद्धतीची वेगवेगळी १० उपकरणे तयार केली असून ही उत्कृष्ट उपकरणे बघितल्यानंतर नाशिकमधील काही नगरसेवक आणि आमदार सीमाताई हिरे यांनी सार्वजनिक उद्यानासाठी ही उपकरणे मागविण्याचा विचार केला असल्याची माहिती या आयटीआयचे उपप्राचार्य मोहन तेलंगी यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी