28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeमहाराष्ट्रनरेंद्र मोदींनी शिक्षकांना लिहिली मराठीतून पत्रे, कारण...

नरेंद्र मोदींनी शिक्षकांना लिहिली मराठीतून पत्रे, कारण…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाअंतर्गत लाखों विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांबरोबर संवाद साधला होता. ‘परीक्षा पे चर्चा’ या वार्षिक कार्यक्रमाची सहावी आवृत्ती 27 जानेवारी 2023 रोजी दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियम येथे भरवण्यात आली होती. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांच्या अडचणी एकूण घेतल्या होत्या. तसेच, त्यांच्या समस्यांच्या निवारणासाठी काही सल्लेही दिले होते. अश्यातच, आता ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील काही शिक्षकांसोबत थेट मराठीतून पत्रव्यवहार करत पंतप्रधान मोदी यांनी त्या शिक्षकांंना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभागी झालेल्या शिक्षकांशी पत्रव्यवहार करत शिक्षकांचे आभार व्यक्त केले आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, भारताच्या स्वातंत्र्याला शताब्दीकडे नेणाऱ्या अमृत काळात म्हणजेच पुढील 25 वर्षांच्या काळात देशाला नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी ‘पंचप्राण’ या पाच तत्वांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.

आपल्या पत्रातून पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे, “‘परीक्षा पे चर्चा’ चा एक भाग म्हणून तुमची आणि तुमच्या सहकाऱ्यांची मते जाणून घेता आली, याचे समाधान वाटले. त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. देश आणि विद्यार्थ्यांचा विकास याबद्दलची तुमची मते अत्यंत महत्त्वाची आहेत.

शिक्षक हे विद्यार्थ्याच्या जीवनात दीपस्तंभासारखे मार्ग दाखवत असतात, त्यांना स्वप्न बघायला, त्या स्वप्नांचे संकल्पात रूपांतर करून त्यांची पूर्तता करायला शिकवतात. ते विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण करतात आणि त्यांना आयुष्यभर मार्गदर्शन करतात.

आजच्या बदलत्या काळानुसार तरुणांसाठी, खेळ, तंत्रज्ञान, नावीन्य आणि स्टार्टअप्ससह अनेक क्षेत्रातील पर्याय खुले झाले असून त्यामध्ये भरपूर संधीही आहेत. शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या क्षमतेचा सर्वोत्तम वापर करून, भारताच्या विकासावर परिणाम होण्याच्या दृष्टीने प्रेरित करण्यात निर्णायक भूमिका बजावेल.

2047 पर्यंतच्या, आपल्यासाठी अमृत काळ असलेल्या कालखंडात, आपल्या प्रतिभावान तरुणांना गौरवशाली आणि विकसित भारत घडवण्याची संधी मिळाली आहे. मला विश्वास आहे की पुढील 25 वर्षांमध्ये आमचे शिक्षक तरुणांना त्यांचे ध्येय देशाच्या प्रगतीशी जोडण्यासाठी प्रेरित करतील.

तुमची मते मांडल्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचा आभारी आहे. तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.”

हे ही वाचा 

‘या’ हवालदारानं सलमानविरोधात साक्ष दिली… मात्र त्यांचा अंत फारच दुर्दैवी ठरला

जातनिहाय जनगणनेच धार्मिक उन्माद संपेल – जनता दल (यू) राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांचा आशावाद

“राज्य सरकार सोडून सगळा महाराष्ट्र आजारी…” नांदेड घटनेवरून राज ठाकरे सरकारवर बरसले!

यासह, शिक्षकांना पंचप्राण तत्वांचा अंगीकार करण्याचे आवाहन करत पंतप्रधान मोदी लिहितात, “पुढील 25 वर्षांचा काळ हा स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे नेणारा अमृत काळ आहे. या काळाला आपण देशाच्या इतिहासातील निर्णायक कालखंड बनवूया. असे करण्यासाठी, आपण ‘पंच प्राण’ च्या पाच तत्त्वांचा अंगिकार करूया, ज्यामुळे भारत आणखी नवी उंची गाठेल.”

समृद्ध भारतासाठीचे पंच प्राण
  • भारताच्या विकासाचे ध्येय – विकसित भारत
  • गुलामगिरीच्या मानसिकतेचे समूळ उच्चाटन करणे
  • आपल्या वारशाचा गौरव करणे
  • एकात्मता बळकट करणे
  • कर्तव्यांवर लक्ष केंद्रित करणे

पंतप्रधान मोदी यांनी मराठीतुन केलेल्या या पत्रव्यवहारमुळे महाराष्ट्रातील शिक्षकवृंद भारावून गेले आहेत. हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील वरीष्ठ क्रीडा शिक्षक विजय अवसरमोल यांनी याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबानी पाठवलेली पत्रे हा आमच्यासाठी सुखद धक्का आहे.” तर, शिक्षिका श्रीमती दीपिका जैन यांनी, “स्वतः प्रधानमंत्री शिक्षकांना दीपस्तंभासारखे मानतात हा आम्हां शिक्षकांचा गौरव आहे,” अशी भावना व्यक्त केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी