27 C
Mumbai
Saturday, February 24, 2024
Homeमहाराष्ट्र'कृषि’तुल्य शरद पवार! (निवृत्त IAS अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा विशेष लेख)

‘कृषि’तुल्य शरद पवार! (निवृत्त IAS अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा विशेष लेख)

लय भारी'च्या दिवाळी विशेषांकामध्ये निवृत्त IAS अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. हा लेख जसाच्या तसा प्रसिद्ध करीत आहोत.

भारतातील ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून असून, अन्न पौष्टिकता व रोजगार सुरक्षेच्या दृष्टीने आर्थिक प्रगतीइतकीच कृषी क्षेत्राची प्रगतीही फार महत्त्वाची आहे. अन्नसुरक्षा ही देशाच्या संरक्षणाइतकीच महत्त्वाची ठरली आहे. ही बाब विचारात घेऊन २००४ मध्ये आदरणीय पवारसाहेबांनी एनडीए सरकारमध्ये कृषी खाते मागून घेतले. कृषी हा विषय केवळ साहेबांसाठी जिव्हाळ्याचा नाही, तर तो त्यांच्या रक्तात भिनलेला आहे, त्याची प्रचिती साहेबांनी कृषी विभागासाठी घेतलेल्या निर्णयांतून येते.

प्रथमतः कृषी संशोधनातून अद्ययावत तंत्रज्ञान, नवीन वाणांची निर्मिती, कृषी संशोधन यासाठी असलेली २,१३३ रुपये कोटींची तरतूद दुपटीपेक्षा अधिक केली. संपूर्ण देशात ६३७ कृषी विज्ञान केंद्रांचे जाळे निर्माण केले. त्यामागे कृषी, तसेच दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व मत्स्यपालन इत्यादी संलग्न व्यवसायांतून शेतकऱ्यांना त्यांचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्याचा मुख्य उद्देश होता. आज या केंद्रांनी पाणी व खत व्यवस्थापन, अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या जाती यामध्ये दिशादर्शक काम उभे केले आहे.
हे सुद्धा वाचा
Lay Bhari : ‘लय भारी’च्या संपादकपदी विक्रांत पाटील यांची नियुक्ती !
Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन
‘लय भारी’चे विषय सामान्यांना आपले वाटतात : धनंजय मुंडे
साहेबांचा दूरदृष्टीपणा, विचारांची स्पष्टता, कष्ट करण्याची प्रचंड क्षमता, वक्तशीरपणा व निर्णयक्षमता अचंबित करणारी आहे. देशाच्या अन्नसुरक्षेसाठी ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा मिशन’ त्यांच्या पुढाकाराने सुरू झाले. यातून देशात अन्नधान्याचे उत्पादन २६० दशलक्ष टनांपेक्षा जास्त होण्यात यश आले. भारत स्वतःची गरज भागवून १६ देशांना अन्नपुरवठा करणारा देश ठरला. पाच वर्षांत ८० हजार कोटी रुपयांची निर्यात २.३२ लाख कोटी रुपये करून दाखविली. पवारसाहेबांच्या या धोरणामुळे निर्यात तिपटीपेक्षा अधिक वाढली. फूड सिक्युरिटी कायदा करून देशातील ८२ कोटी लोकांसाठी अन्नसुरक्षा सुरू करण्यात आली.
सन २००९-१० मध्ये संपूर्ण देशात दुष्काळ होता. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी अन्नधान्य उत्पादन २०-२५ टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. भारतासाठी ही चिंतेची बाब होती. शरद पवारसाहेबांनी देशातील सर्व राज्यांचे कृषिमंत्री, सचिव, कृषी आयुक्त, विद्यापीठे यांच्यासोबत दोन दिवसांचे चर्चासत्र ठेवले. मी या कृषी चर्चासत्रात कृषी आयुक्त म्हणून हजर होतो. दुसऱ्या दिवशी राज्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या, त्या साहेबांनी मान्य केल्या. त्यांनी तातडीने महत्वाचे पूरक निर्णय घेतले. अन्न उत्पादनाचा आराखडा आणि काटेकोर नियोजन केले. दुष्काळी परिस्थिती असताना तज्ज्ञांचा अंदाज खोटा ठरवीत त्या वर्षीही सरासरीइतके अन्नधान्याचे उत्पादन झाले. हे केवळ साहेबांमुळे शक्य झाले.
Retired IAS officer Prabhakar Deshmukh write On Artical Sharad pawar
सन २००९-१० मध्ये देशातील ज्या राज्यांनी व संस्थांनी कृषी उत्पादनवाढीसाठी उत्कृष्ट काम केले होते. त्याबद्दल तत्कालीन परराष्ट्रमंत्री व माजी राष्ट्रपती कै. प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्या वर्षी महाराष्ट्राचा पश्चिम विभागात सर्वांत जास्त कृषी उत्पादन केल्याबद्दल गौरव करण्यात आला. त्यावेळी मी कृषी आयुक्त म्हणून हजर होतो. त्यावेळी आदरणीय प्रणव मुखर्जी म्हणाले होते, “कृषी क्षेत्रात माझे मित्र व सहकारी शरदराव पवार यांचे काम अद्वितीय आहे. त्यांचा मोठा अनुभव, कामाचे नियोजन व कार्यक्षमता यामुळे आम्हाला देशाच्या अन्नसुरक्षेची काळजी वाटत नाही.” साहेबांबद्दल व्यक्त करण्यात आलेल्या या भावना कृषी क्षेत्रातील त्यांचे मोठे योगदान अधोरेखित करतात.
सांगोल्यात आदल्या दिवशी अतिवृष्टी झाली. साहेब दुसऱ्या दिवशी सकाळी हेलिकॉप्टरने सांगोल्यात शेतकऱ्यांच्या शेतावर गेले आणि त्यांना मदत उपलब्ध करून दिली. कष्टकरी शेतकऱ्यांबद्दल एवढी तत्परता व संवेदनशीलता क्वचितच पाहायला मिळते.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना साहेबांनी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड योजना सुरू केली. त्यासाठी काही क्लस्टर निवडले. सरकारने मोठ्या प्रमाणात मोफत फळबाग लागवड करून दिली. मी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असताना वेंगुर्ल्याजवळ उभा दांडा गावात स्वच्छता अभियानांतर्गत तपासणीसाठी गेलो होतो. गावातील सुंदर व भव्य मंदिराचे बांधकाम पाहून आश्चर्य वाटले. लोकांकडे याबाबत विचारणा केली. त्यांनी सांगितले, “रोजगार हमी योजनेतून मोठ्या प्रमाणात आंबा व काजूची लागवड करण्यात आली. फळा़च्या प्रत्येक पेटीमागे तीन रुपयांप्रमाणे आकारणी केली आणि त्यातून मिळालेल्या पैशातून गावाने हे मंदिर बांधले आहे.

दरवर्षी गावाला आंबा व काजू उत्पादनातून पाच ते सहा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. मुंबईत गेलेले लोक पुन्हा गावाकडे येऊ लागले असून, ‘उलट स्थलांतर’ सुरू झाले आहे.” ही किमया केवळ पवारसाहेबांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाली. माण-खटावच्या दुष्काळी भागात ‘पाणी फाऊंडेशन’च्या माध्यमातून जलसंधारणाचे काम खूप चांगल्या रीतीने सुरू होते. ‘पाणी फाऊंडेशन’च्या स्पर्धेत महाराष्ट्रातल्या माण-खटाव तालुक्यातील गावांनी सतत तीन वर्षे प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावला होता.
पवारसाहेब हे काम पाहण्यासाठी माण-खटावच्या दौऱ्यावर आले होते. साहेबांनी पाहिले की, गावागावांत लहानथोर सर्व लोक झपाटल्यासारखे श्रमदान करीत आहेत. लोकांचा उत्साह पाहून साहेब भारावून गेले. मी साहेबांना सांगितले की, माणमधील अधिकारी व उद्योजक मदत करत आहेत; तथापि अधिक आर्थिक मदतीची गरज आहे. त्यानंतर पुढील दोन तासांत विविध संस्था व सीएसआरमधून ६.५ कोटी रुपये गावांतील कामासाठी साहेबांनी उपलब्ध करून दिले. त्यामुळे जलसंधारणाचे खूप मोठे काम उभे राहिले. साहेबांनी दुष्काळी भागाला प्राधान्य देऊन केलेली मदत आमच्यासाठी लाखमोलाची ठरली.
दुग्धव्यवसाय, कुकुटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी दिलेल्या सवलती, प्रक्रिया उद्योग व कोल्ड चेन उभारणी, फूड पार्कची निर्मिती, धान्य साठवणुकीसाठी केलेली गोदाम व्यवस्था व कर्ज हमी देण्याची योजना, क्रेडिट कार्ड योजना, कृषी निर्यात सवलती व शेतमालाला वाढीव भाव देण्याची योजना, साखळी बंधारे, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून थेट राज्याच्या शेतीसंबंधी प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिलेला मोठा निधी, शेतकऱ्यांसाठी ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती योजना, आत्महत्या रोखण्यासाठी केलेला कृती कार्यक्रम अशा अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी साहेबांनी केली.

काळ्या आईची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या व देशाच्या भुकेचे प्रश्न सोडविणाऱ्या शेतकऱ्याला सन्मानाने उभे राहता यावे यासाठी कृतज्ञतेच्या भावनेतून साहेबांनी घेतलेले निर्णय इतरांपेक्षा वेगळे व कृषी क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरलेले आहेत. अशा उत्तुंग व थोर नेतृत्वाला मी मनपूर्वक अभिवादन करतो. साहेबांना चांगले आरोग्य व आयुष्य लाभावे हीच प्रार्थना परमेश्वरचरणी करतो.

(लेखक राज्याचे माजी कृषी आयुक्त, तसेच माजी जलसंधारण सचिव आहेत.)

‘लय भारी’चा दिवाळी अंक महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी पुढील वितरकांकडे संपर्क साधावा : मुंबई :बागवे एजन्सी (७५०६०००८६९), पुणे : वीर एजन्सी (९४२२०३४१७६), नाशिक : पाठक ब्रदर्स (९९२२४६३०४०), कोल्हापूर : प्रशांत चुयेकर (९७६५०२४४४३), औरंगाबाद : केतन शहा (९५४५५१९४४०)

Video : ‘लय भारी’ची बातमीदारी तळागाळात पोहचेल : बाळासाहेब थोरात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी