‘महाशक्ति’ने पुण्याचा अक्षरक्ष: बिहार केला. कसबा पेठेतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना विजयापासून रोखण्यासाठी पोलिस-सरकारी यंत्रणेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला गेल्याचे आरोप होत आहेत. तशा चर्चा पेठांसह शहरात सर्वत्र रंगल्या असून बरेच किस्सेही सांगितले जात आहे. (Mahashakti makes Pune to Bihar) पुण्यातील मीडियाने मात्र अपवाद वगळता अळीमिळी-गुपचिळी करत हाताची घडी घालून नि’म्यु’टपणे जणू तोंडावर बोट ठेवले. माध्यमांना पाकिटे दिली गेल्याची तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियासंबंधीतही अनेक चर्चा रंगल्या आहेत. काही वरीष्ठांनाही पाकिटे दिली गेल्याचे किस्से सांगितले जात आहेत.
पुण्यातील निवडणुकीत अपवाद वगळता माध्यमांची ‘पेड न्यूज’ची दुकानदारीही जोरातच राहिली. मात्र, त्यावर नियंत्रण राखणारी समिती कुठेही दिसली नाही. शिवाय, निवडणूक आयोगानेही ‘पेड न्यूज’ रोखण्यासाठी काही प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही. ‘महाशक्ति’-‘धनशक्ति’चा अक्षरक्ष: नंगानाच दिसून आला. उभ्या हयातीत अशी निवडणूक पाहिली नसल्याचे पेठांमधील अनेक आजोबांनी सांगितले. पुण्यातील यावेळच्या निवडणुकीत पैशांचा अक्षरश: महापूर वाहत होता.
मतदानासाठी पैसे वाटप झाल्याच्या चर्चा तर आहेतच; पण मतदानाला येऊ नये म्हणून दुपटीने पैसे वाटप झाल्याचे सांगितले जात आहे. विशेषत: कोंढवा परिसर आणि धंगेकर यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या भागातील अनेक मतदारांना साम-दाम-दंड-भेद अशा सर्व पद्धतीने मतदान केंद्रांवर येण्यापासून रोखल्या गेल्याच्या अनेक तक्रारी होत आहेत. 2-2, 3-3 किलो चांदीचे वाटप झाल्याचे आणि पत्रकारांना 25 हजारांपासून 2 लाखांपर्यंतच्या रकमा दिल्या गेल्याचेही सांगितले जात आहे. याशिवाय, काही अपवाद वगळता बहुतांश माध्यमांशी ‘पॅकेजेस’ करार झाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे टिळक-अंगरकरांच्या अन् नानासाहेब परुळेकरांच्या पुण्यातील माध्यमे डोळ्यावर झापडे ओढून पाकिस्तानातील लोकशाही धोक्यात आल्याबाबत चिंतन राग आवळत राहिले.
‘महाशक्ति’-‘धनशक्ति’ने क्रिकेटपटू उतरत असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलातील 16 वा संपूर्ण मजला पंधरा दिवस ताब्यात ठेवल्याचेही सांगितले जात आहे. या हॉटेलात एका सूटचा एका रात्रीचा दर 20 हजारांहून अधिक आहे. तिथे नोटबंदी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हद्दपार केलेला काळा पैसा वारेमाप दिसून आल्याचेही किस्से सांगितले जात आहेत. दोन-दोन हजारांची बंडलेच्या बंडले मोजली जात असताना पाहिल्याचे किस्से हॉटेलचे अनेक कर्मचारी चवीने चघळत आहेत. एकूणच आम्ही निवडणुका हरुच शकत नाही, हे ‘महाशक्ति’ला दाखवून द्यायचे आहे.
‘महाशक्ति’ने धंगेकरांचे 15 ते 16 हजार हक्काचे मतदान होऊ दिले नाही, अशीही चर्चा आहे. आदल्या रात्रीच मतदारांना पैसे वाटले गेले आणि त्यांना मतदान करायला मिळू नये म्हणून त्यांच्या हाताच्या बोटांवर निवडणूक आयोगाच्या शाईसारखीच शाई लावली गेली, असेही आरोप होत आहेत. दोन दिवसापूर्वीच राज्यातील सत्तास्थानच्या काही आघाडीच्या नेत्यांनीच खुद्द काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना बोलावून घेवून कोणत्याही प्रकरणात अडकवण्याचा दम दिला, असेही सांगितले जात आहे. ऐनकेन प्रकारे आघाडीच्या मंडळींना प्रचारापासून तसेच धंगेकर यांना मदत करण्यापासून रोखले गेले. बिहार-उत्तरप्रदेशातील निवडणूक राड्याची तसेच पोलिस व सरकारी यंत्रणेच्या गैरवापराची चित्रपटात दाखविली जाणारी दृश्ये अक्षरक्ष: फिकी पडावीत, असे चित्र पुण्यात दिसून आल्याचे नागरिकही सांगत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र धंगेकर यांच्या बाजूने सुरुवातीपासून वातावरण अतिशय चांगले होते. ते 20-25 हजारांच्या मताधिक्क्याने निवडून येतील, असे चित्र होते. मात्र, शेवटच्या 3-4 दिवसांत पोलिस यंत्रणेचा मोठ्या प्रमाणावर सक्रीय सहभाग दिसून आला. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: शेवटच्या आठवडाभर पुण्यात कोंढवा मुक्कामी होते. कोल्हापूर व काही बाहेरचे कार्यक्रम करून ते पुण्यातच परतत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करून घेतली होती. ते 2 आठवडे पुण्यात तळ ठोकून होते. मात्र, गृहमंत्री शहरात असताना पोलिस यंत्रणेचा गैरवापर होण्याच्या घटना चिंताजनक म्हणायला हव्यात. त्याचप्रमाणे राज्याचे प्रमुख शहरात असताना शासकीय यंत्रणेचा चुकीचा वापर झाल्याचेही आरोप होत आहेत. पोलिसांनी तर शेवटच्या 2 दिवसांत कमालीचा अतिरेक केल्याचे सांगितले जाते. धंगेकर यांचे समर्थक, कार्यकर्ते यांना उचलून नेणे, रात्र-रात्रभर पोलिस स्टेशनला बसवून ठेवणे, असे प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
सुरुवातीला ब्राह्मण समाजाची भाजपाविरोधात नाराजी असल्याचे चित्र होते. त्याचा फटका भाजप उमेदवाराला बसण्याची चिन्हे दिसत होती. आनंद दवे यांना ब्राह्मण म्हणून पेठातील कट्टर अशी पाचेक हजार मते मिळतील असे वाटत होते. मात्र, संघाच्या कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र एक करून पक्षाला बांधील प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्या विणवण्या केल्या, समजूत काढली. मोतीबागेतही बैठका होऊन तिथूनही मनधरणीची सूत्रे हलविली गेली. त्यामुळे आता दवे हजाराच्या आत राहतील, अशी अटकळ आहे. भाजपाविरोधातील नाराजी म्हणून ‘नोटा’चे मतदान 4-5 हजारपर्यंत राहील, असा अंदाज होता. तेही आता हजाराच्या आत राहील, असे म्हटले जात आहे. ते तीन हजारापर्यंत गेले तरी भाजपच्या उमेदवाराच्या अडचणी वाढू शकतात. ब्राह्मण मतदारांची भाजपविरोधी भूमिका कायम राहून आनंद दवे जितकी अधिक मते खातील आणि ‘नोटा’चे मतदान जितके जास्त राहील, तितका भाजपला फटका बसू शकतो. याशिवाय, गेल्यावेळी युती असूनही शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराने भाजपची 14 हजार मते खाल्ली होती. ती शिवसेनेची हक्काची मते शिंदेसेनेकडे जाण्याची शक्यता कमीच आहे. त्याचप्रमाणे मनसेचीही हक्काची 8 हजार मते आहेत. कार्यकर्ते आजही धंगेकर यांच्याच पाठीशी होते. मूळ शिवसेना आणि मनसेची मते किती प्रमाणात धंगेकर यांच्या पारड्यात पडतात, यावरही त्यांच्या विजयाचे गणित ठरू शकेल. बापट आणि टिळक परिवाराने पडद्यामागे काय भूमिका घेतल्या आहेत, हेही महत्त्वाचे ठरू शकेल.
पुण्यातील बहुतांश सर्व प्रिंट माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ‘पेड’गाव दौऱ्यावर असताना दैनिक ‘पुण्यनगरी’ने ‘‘पैसे वाटण्याच्या व्हायरल व्हिडीओतील पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीमुळे संताप; गंज पेठेत मतदान सुरू असतानाही गैरप्रकार’’ असे बोल्ड वृत्त प्रसिद्ध करण्याची हिंमत दाखविली. या वृत्तानुसार, कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या वेळी पैसे वाटप करण्याच्या व्हिडीओतील पोलीस अधिकाऱ्याची तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटण्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून केल्या जात होत्या. प्रचार संपल्याच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी (दि. 25) काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी या मुद्द्यावरून लाक्षणिक उपोषण केले. त्यानंतर रास्ता पेठेत व सोमवार पेठेत खुलेआम पैसे वाटले जात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच त्या स्वरूपाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका क्लिपमध्ये माजी सभागृह नेत्याची छबी स्पष्टपणे दिसते आहे. तसेच, त्याच क्लिपमध्ये एक पोलीस अधिकारीही स्पष्टपणे दिसत असून, काही नागरिकांनी या प्रकाराला आक्षेप घेत त्याला सुनावले असल्याचेही दृश स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरून वेगाने सर्वत्र पसरला. संध्याकाळनंतर हा व्हिडीओ फॉरवर्ड करण्यास मनाई केली जात असल्याचा मेसेज व्हॉट्सअॅपवर झळकत होता. या दृशात दिसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या समोरच एका सुज्ञ नागरिकाने चित्रीकरण केले. त्यात या पोलीस अधिकाऱ्याच्यासमोर तेथील रक्कम नेली जात असल्याचे दिसत आहे.
हे सुद्धा वाचा :
वरळीतून नाही, तर कोपरी-पाचपाखाडीतून निवडणूक लढवतो ; आदित्य ठाकरेंचे शिंदेंना आव्हान
या व्हिडीओबरोबरच अन्य दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी एका व्हिडीओ गंज पेठेतील असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये एका खोलीत पैशाचे वाटप सुरू असल्याचे दिसत आहे. तसेच, पैसे वाटप करणाऱ्याला नागरिकांनी पकडून ठेवले असल्याचे दृश्य आहे. तत्पूर्वी, रविवार पेठ परिसरातील एका इमारतीमध्ये पैसे दिले जात असल्याचा व्हिडीओ शनिवारी (दि. 25) व्हायरल झाला. मूळच्या मोमीनपुरा परिसरातील, परंतु सध्या कोंढव्यात राहणाऱ्या एका कार्यकर्त्याला शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसाने संशयावरून ताब्यात घेतले. त्याला तेथून हद्दीबाहेरील समर्थ पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आल्याच्या घटनेबाबतही आक्षेप नोंदवण्यात आल आहे. या स्वरूपाचे सर्व व्हिडीओ व अन्य नोंदी निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आले आहेत.