28.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमुंबईएकनाथ शिंदेंच्या नुसत्याच बेटकुळ्या, विधानसभेत तोंडावर आपटण्याची शक्यता, शरद पवारांच्या खेळीकडे लक्ष

एकनाथ शिंदेंच्या नुसत्याच बेटकुळ्या, विधानसभेत तोंडावर आपटण्याची शक्यता, शरद पवारांच्या खेळीकडे लक्ष

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी आपल्या बाजूने ५० आमदार वळविण्यात यश मिळविले आहे. त्यापैकी ४० आमदार शिवसेनेचे असल्याचा दावा केला जात आहे. वास्तवात, मात्र यातील सगळेच आमदार विधानसभेच्या सभागृहात ‘महाविकास आघाडी’ सरकारच्या विरोधात मतदान करतीलच याची शक्यता नाही. एकनाथ शिंदे सभागृहात तोंडावर आपटण्याच्या दृष्टीने ‘महाविकास आघाडी’चे नेते कामाला लागल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

‘महाविकास आघाडी’ सरकारला काहीही होणार नाही. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील. बाहेर गेलेल्या आमदारांना मुंबईत यावेच लागेल, असे सूचक विधान शरद पवार यांनी गुरूवारी केले. या विधानामागे अनेक डावपेचात्मक अर्थ दडलेले आहेत. सोबतचे आमदार फुटू नयेत. त्यांचे मन परिवर्तन होऊ नये या उद्देशाने एकनाथ शिंदे यांनी फुटीर आमदारांना गुवाहाटीला नेले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.

उद्धव ठाकरे सरकारला येत्या काही दिवसांतच विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागेल. त्यावेळी संभाव्य मतदानासाठी बाहेर गेलेल्या आमदारांना सभागृहात हजर राहावे लागेल. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार फुटलेले आहेत, शिवाय १० अपक्ष त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे मतदान विरोधात गेल्यास उद्धव ठाकरे सरकार कोसळेल असे चित्र सकृतदर्शनी दिसत आहे.
वास्तवात मात्र, शिवसेनेच्या ४० आमदारांपैकी बरेचसे आमदार उद्धव ठाकरेंच्या, म्हणजेच सरकारच्या बाजूने मतदान करतील.

गुलाबराव पाटील, सदा सरवणकर, दादा भुसे यांच्यासारखे आमदार अगोदर उद्धव ठाकरे यांना भेटले, अन् तिथून ते गुवाहाटीला गेले. यात ठाकरे यांनी केलेली गेम असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुवाहाटीला नंतर गेलेले आमदार हे उद्धव ठाकरे यांनीच पाठविले आहेत. ते ठाकरे यांचे गुप्तहेर म्हणूनच तिथे पोहचल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदेंची खेळी हाणून पाडण्याचा डाव यात आखला गेला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

एकनाथ शिंदे गटाचे आमदार ज्यावेळी मुंबईत येतील, अन् सभागृहात प्रत्यक्षात मतदान करतील. त्यावेळी त्यांचे मत व मन परिवर्तन झालेले असेल, अन् एकनाथ शिंदे तोंडावर आपटलेले दिसतील, असे सूत्रांनी सांगितले. एकनाथ शिंदेंना खिंडीत गाठण्यासाठी शिवसेनेने नियोजन केले आहेच, पण त्यांना शरद पवार हे सुद्धा डावपेचात्मक मार्गदर्शन करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकनाथ शिंदेंसह १२ आमदारांच्या निलंबनाची केलेली मागणी सुद्धा याच डावपेचांचा भाग असल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा :

महाराष्ट्रातील राजकारणाची वाटचाल गुंडगिरीच्या दिशेने

एकनाथ शिंदेंना परत आणण्यासाठी गेलेला शिवसैनिक म्हणाला, ‘मला बरंच बोलायचं आहे, पण पोलिसांचं लक्ष माझ्यावर आहे.’

‘या ‘महाभारतामागे भारतीय जनता पक्षाचाच हात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी