29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमुंबईगणेशोत्सव मंडळांना महापालिकेकडून विशेष भेट

गणेशोत्सव मंडळांना महापालिकेकडून विशेष भेट

गणेशोत्सव अगदी तोंडावर आलेला असतानाच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गणेशभक्तांना एक आनंदाची बातमी दिलेली आहे. 19 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या या उत्सवासाठी गणेशोत्सव मंडळे सज्ज झाली आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या गाणेशोत्सव मंडळांना उत्सव साजरा करण्यासाठी महानगरपालिकेकडून विशेष सूट देण्यात आली आहे. त्यामुळे, कल्याण डोंबिवलीमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या जागेवर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला या वर्षी नि:शुल्क परवानगी देण्यात येणार आहे. तसेच पालिका हद्दीतील अग्निशमन सुरक्षा रकमेतही तब्बल 50 टक्के सूट देण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या जागेवर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला दर वर्षी कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून शुल्क आकरण्यात येत होते. परंतु, आता पालिका हद्दीतील गणेशोत्सव मंडळांना जागा भाडे शुल्क पूर्णपणे माफ केले जाणार आहे. याशिवाय, अग्निशमन सुरक्षा रकमेतही 50 टक्के सूट देऊन पालिकेने गणेशोत्सवाची गोड भेट गणेशभक्तांना दिली आहे. यामुळे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

हिंदू संस्कृतीतील महत्वाचा मानला जाणारा आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा उत्सव समजला जाणाऱ्या गणेशोत्सवाला आता काहीच दिवस बाकी आहेत. सार्वजनिकरित्या साधारणतः 10 दिवस साजरा केला जाणारा हा उत्सव अगदी तोंडावर आला आहे. महागाईच्या या काळात आपले सण, उत्सव साजरे करणे हे मध्यमवर्गीयांना काहीसे कठीण जात असते. तरीही मध्यमवर्गीय खिशाला परवडेल अशा पद्धतीने वैयक्तिकरित्या प्रत्येक सण-उत्सव साजरा करत असतो.

सार्वजनिकरित्या उत्सव साजरा करणाऱ्यांमध्ये मात्र महागाईचा मोठ्या प्रमाणात प्रभाव जाणवतो. लोकवर्गनीतून जमलेल्या पैशातून उत्सवाचा सर्व खर्च सांभाळावा लागतो. हा खर्च सांभाळत असताना मंडळांच्या कार्यकर्त्यांची मात्र तारेवरची कसरत पाहायला मिळते.

हे ही वाचा 

ठाण्यातील मेट्रोचा मार्ग सीएमने क्लियर केला

BMC मध्ये सत्तेत आल्यास 100 युनिट पर्यंत वीज मोफत देणार; ‘या’ नेत्याची मोठी घोषणा

भिवंडी-कल्याणदरम्यानच्या मेट्रो ५ चे स्वप्न दृष्टीक्षेपात; एमएमआरडीएने अखेर कारशेडची जागा अंतिम केली

बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ही महापालिकेच्या अखत्यारीत असलेले रस्ते तसेच मोकळ्या जागेवर मंडप आणि कमानी उभारून गणेशोत्सव साजरा करत असतात. या मंडप आणि कमानी उभारण्यासाठी महापालिकेकडून भाडे स्वरूपात शुल्क आकारले जाते. मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेने यावर्षी गणेशोत्सव मंडळांकडून कोणतेही शुल्क आकारणार नसल्याची घोषणा केली आहे. परंतु, गणेशोत्सव मंडळांना यासाठीची रीतसर परवानगी पालिकेकडून घ्यावी लागणार आहे. याशिवाय, अग्नीशमन सुरक्षा म्हणून आकारल्या जाणाऱ्या आधीच्या एक हजार रुपये शुल्कावर 50% सूट देण्यात आली आहे. अग्नीशमन सुरक्षा म्हणून आता 500 रुपये आकारण्यात येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी