31 C
Mumbai
Saturday, February 24, 2024
HomeमुंबईMSRTC: लालपरीचे लालडब्यात रूपांतर होण्यापूर्वी महामंडळाचा महत्वपूर्ण निर्णय; वाचा सविस्तर

MSRTC: लालपरीचे लालडब्यात रूपांतर होण्यापूर्वी महामंडळाचा महत्वपूर्ण निर्णय; वाचा सविस्तर

येत्या वर्षभरात साडे तीन हजार नविन एसटी दाखल होणार असल्याचे वृत्त आहे. मात्र राज्याचे कारभारी व त्यांचे शिलेदार एसटीला पुन्हा ऊर्जितावस्था आणण्याचे साधन म्हणून पाहतात, की स्वविकासाचे साधन म्हणून पाहतात, यावर एसटीची पुढील वाटचाल कशी होते ते पाहण्यासारखे ठरेल.

एसटी महामंडळाच्या (MSRTC) ताफ्यात येत्या वर्षभरात साडे तीन हजार नविन एसटी दाखल होणार असल्याचे वृत्त आहे. एसटी प्रवाशांना नेहमी खडखडाट झालेल्या, मोडकळीस आलेल्या एसटीतून प्रवाशांना प्रवास करावा लागतो. परिणामी, प्रवासी एसटीकडे वळत नाहीत. या अनुषंगाने प्रवासी संख्या वाढविण्यासाठी महामंडळाने आता नवीन एसटी ताफ्यात समाविष्ट करण्याची योजना आखली आहे. दरम्यान राज्यभरात एसटी महामंडळाच्या ताब्यात असलेल्या भूखंडांकडे राज्याचे कारभारी व त्यांचे शिलेदार एसटीला पुन्हा ऊर्जितावस्था आणण्याचे साधन म्हणून पाहतात, की स्वविकासाचे साधन म्हणून पाहतात, यावर एसटीची पुढील वाटचाल कशी होते ते पाहण्यासारखे ठरेल.

महामंडळाच्या ताफ्यातील १५ हजार पैकी सात हजार एसटी भंगारात जाणार आहेत. त्यातच वर्ष २०१६ ते २०१९मध्ये नवीन गाड्या न घेता केवळ वापरातील नुतनीकरण करण्यावर महामंडळाने भर दिला. यात प्रामुख्याने स्लीपर (शयनयान) निमआराम, रातराणी, इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. यामुळे राज्यातील नागरिकांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे. महामंडळ प्रथम ५०० बसची बांधणी करणार आहे. या बसमध्ये ३३ पुशबॅक आसने आहेत. दोन आसनांतील अंतर इतर बसच्या तुलनेत जास्त असल्याने प्रवाशांना आरामात बसता येणार आहे. त्याचप्रमाणे महामंडळाने स्लीपर प्रकारातील ५० बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविली असून बससाठी लागणारा सांगाडा टाटा कंपनीकडून घेउन महामंडळ त्याची बांधणी करणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

विशेषतः प्रवाशांच्या सेवेत मार्च २०२३ पर्यंत २०० नविन हिरकणी बस येणार आहेत. या बसमध्ये प्रवाशांमध्ये पुश बॅक आसन व्यवस्थाही असणार आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात ४०० हिरकणी बस आहेत. त्यापैकी २०० बसचे आयुर्मान संपल्याने या बसचे रुपांतर साध्या बसमध्ये करण्यात येणार आहे. परिणामी फक्त २०० हिरकणी बस महामंडळाच्या ताफ्यात राहणार आहेत. त्यामुळे महामंडळाने नविन हिरकणी बस ताफ्यात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचप्रमाणे, फेब्रुवारी अखेर ८० बस वेगवेगळ्या आगाराला देण्यात येणार आहेत. तसेच ५० शयनयान बस व २०० निम आराम बस बांधण्याचे काम बाह्य संस्थेला दिले आहे. पर्यावरण पूरक बीएस-६ डिझेल इंजिनवर चालणाऱ्या साध्या दोन हजार बस तयार करण्यासाठी चेसिस खरेदी प्रक्रिया सुरू केली असून त्या बस लवकरच महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट होतील. याव्यतिरिक्त ५०० साध्या नवीन बस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या असून त्या कोल्हापूर, सांगली, पुणे, लातूर, रायगड, रत्नागिरी विभागात वितरित केल्या आहेत. तसेच १०० इलेक्ट्रक बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होत आहेत.

बसस्थानकांमधील स्वच्छता, कँटिनमधील पदार्थांचा दर्जा आणि एसटी स्थानकांवर मनोरंजनाची, संपर्काची आधुनिक साधने उपलब्ध झाली, तर प्रवाशांचा एकटीकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलेल हे मात्र नक्की. खासगी वाहतूक आता पूर्ण बंद होणे शक्य नाही; मात्र लांबच्या मार्गावर त्याच तोडीची, थोडी स्वस्त आणि विश्वासार्ह सेवा दिली गेली. तर प्रवासी नक्कीच एसटीला पसंती देतील, असा विश्वास जनसमान्यांतून व्यक्त केला जात आहे. मध्यंतरी एसटीच्या हजाराहून अधिक बस भंगारात निघाल्या आणि ज्या आहेत त्यांची अवस्था लाल परीचे लाल डब्यात रूपांतर झाल्याचे सिद्ध करणारी ठरत आहे. त्यामुळे महामंडळाने घेतलेला हा निर्णय किती लाभदायी ठरेल हे येणारा काळचं ठरवेल.

हे सुद्धा वाचा :

एसटी संप काळात मृत्यू झालेल्या १२४ कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार नोकरी

PHOTO: मुंबईच्या रस्त्यांवर धावली देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बस

आता बेस्ट डेपोमध्येही आपली वाहने करा ई-रिचार्ज

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी