33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबईपीडब्ल्यूडीने केला ‘अंगापेक्षा भोंगा मोठा,’ तब्बल ५०० कोटींचा चुराडा !

पीडब्ल्यूडीने केला ‘अंगापेक्षा भोंगा मोठा,’ तब्बल ५०० कोटींचा चुराडा !

‘पैसा हा झाडाला लागतो. त्यामुळे तो कसाही ओरबाडला तरी चालतो, सरकारची तिजोरी म्हणजे आपल्या बापाची जहागिरदारी. कशीही उधळपट्टी केली तरी चालते.’ हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे (PWD) ब्रीदवाक्य आहे. या ब्रिदवाक्याला जागून पीडब्ल्यूडीचे अधिकारी ‘होऊ दे खर्च’ अशी भूमिका निभावत असतात. ‘लय भारी’च्या हाती असेच एक ताजे प्रकरण आले आहे. यात थोडा थोडका नव्हे तर तब्बल ४७१.४८ कोटी रुपयांचा (स्पील ) चुराडा करण्यात आला आहे. हा चुराडा मुंबई विभागाचे अधिक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा घोटाळा केवळ हिमनदाचे टोक आहे, असे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

राज्य सरकारने मंजुरी दिलेली नसतानाही मार्च २०२२ पर्यंत बनगोसावी यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांनी तब्बल ४७१.४८ कोटी रुपयांचा चुराडा केलेला आहे. मंजुरी नसतानाही तातडीची कामे करायची असल्याचे दाखवून सरकारी तिजोरी रिती करण्याचा कार्यक्रम बनगोसावी यांनी पार पाडला आहे.बांधकाम खात्याची, अर्थ खात्याची मंजुरी असल्याशिवाय खर्च करणे नियमबाह्य आहे. परंतु सगळे कायदे व नियम धाब्यावर बसवून बनगोसावी यांनी ४७१.४८ कोटी रुपयांची (स्पील) उधळपट्टी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

स्वतः बनगोसावी यांनीच दिलेल्या या पत्रात ४७१.४८ कोटी रूपयांचा आकडा नमूद केला आहे. परंतु हा घोटाळा प्रत्यक्षात ७०० कोटीचा असू शकेल अशी माहिती सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे, तातडीची कामे करावयाची आहेत, अशी कारणे पीडब्ल्यूडीकडून दिली जातात. वास्तवात मात्र पीडब्ल्यूडीचा बहुतांश निधी हा भ्रष्टाचारावर खर्च होत असतो. अधिकारी व कंत्राटदार मिळून बोगस कामे करतात. म्हणजे कागदावर काम पूर्ण झाले आहे असे दाखवायचे, पण प्रत्यक्षात मात्र कुठलेच काम करायचे नाही असे प्रकार अधिकारी करीत असतात. बोगस कामातून अधिकारी जवळपास ४० ते ५० टक्के रक्कम स्वतःच्या खिशात घालतात, व उर्वरीत रक्कम कंत्राटदारांच्या खिशात घालतात. कंत्राटदार व अधिकारी यांची मिलीभगत आहे. सरकारी रक्कम हडपण्यासाठीच कंत्राटदार व अधिकारी एकत्रितपणे काम करीत असतात, असेही सूत्रांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम मुंबई विभागाअंतर्गत अतिमहत्वाच्या व्यक्तींची कार्यालये व निवासस्थाने येतात. मंत्री, न्यायाधीश, आयएएस – आयपीएस अधिकारी, मंत्रालय, न्यायालये, पोलीस मुख्यालय, विधानभवन, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, राज्यपाल अशा अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या कार्यालयातील अथवा निवासस्थानावरील कामे करायची आहेत. त्यासाठी पैसा कमी पडतो, असे रडगाणे पीडब्ल्यूडीकडून सतत गायले जाते. अशा अतिमहत्वाच्या व्यक्तींचे नावे पुढे करून पीडब्ल्यूडीचे अधिकारी सरकारकडून निधी पदरात पाडून घेतात. दोन रूपयांचे काम केले असेल तर तिथे २०० रूपयांचा खर्च दाखवून पैशाची उधळपट्टी केली जाते. बनगोसावी यांनी मंजुरी पेक्षाही ४७१.४८ कोटी रूपयांची जास्त कामे केली हा पीडब्ल्यूडीतील पारंपरिक रॅकेटचाच प्रकार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

याबाबत प्रमोद बनगोसावी यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की, बिले मंजुरीच्या प्रक्रियेत असतात. गेल्या १०-२० वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आहे. मी यात नव्याने काहीही केलेले नाही. काहीजणांना माझ्याविषयी आसूया असू शकते, अशी भावना बनगोसावी यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा :

PWD : पीडब्ल्यूडीतील ‘बदली’ घोटाळ्याला रवींद्र चव्हाण यांचा चाप !

गृहमंत्री वळसे पाटलांनी PWD अधिकाऱ्यांचे कान उपटले !

VIDEO : PWD च्या अधिकाऱ्यांनी रस्ता टाकला गिळून !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी