मुंबई ते उरण, पनवेल, अलिबाग प्रवास वर्षअखेर सुसाट होणार आहे. नोव्हेंबरपासून शिवडी ते न्हावाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड खुला होणार आहे. (Sewri Nhava Sheva Mumbai Trans Harbour Link Express Way) या महामार्गामुळे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत मुंबई ते अलिबाग अंतर पार करणे शक्य होणार आहे. (Mumbai Alibaug Travel in 20 Minutes) या महामार्गावर टोल भरण्यासाठी थांबण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारचा देशातील हा पहिला ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला मार्ग ठरेल. सध्या या प्रकल्पाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाल्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा दावा आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) म्हणजेच मुंबई पारबंदर प्रकल्प हा शिवडी ते न्हावाशेवा असा समुद्रातून जाणारा मार्ग आहे. अरबी समुद्राच्या ठाणे खाडीवर हा 22 किलोमीटर लांबीचा सागरी महामार्ग आहे. त्यामुळे भारतातील सर्वात मोठ्या पुलाद्वारे दक्षिण मुंबईमधील शिवडी भाग हा नवी मुंबईसोबत; तसेच पनवेल, उरण शहरांशी जोडला जाईल. हा मार्ग मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गासोबत देखील जोडला जाणार आहे. त्यामुळे पुण्याहून दक्षिण मुंबईकडे वाहतूक सुलभ होईल. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील या मार्गाने दक्षिण मुंबईहून कमी अंतरात गाठता येईल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएमार्फत या मार्गाचे काम केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या पॅकेज 2 मधील ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेकची (ओएसडी स्पॅन) उभारणी करण्यात आली. सुमारे 2,300 मेट्रिक टन वजनाचा आणि सुमारे 180 मीटर लांब असलेला हा देशातील पहिला सर्वात जास्त लांबीचा ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेक आहे.

मुंबईला रायगड जिल्ह्यासोबत जोडणाऱ्या या सागरी मार्गाची संकल्पना सर्वप्रथम 1963 साली रचली गेली. महाराष्ट्र शासनाने ह्या प्रकल्पामध्ये सुरुवातीस फारसे स्वारस्य न दाखवल्यामुळे व राजकीय रस्सीखेचीमुळे हा प्रकल्प बासनातच राहिला. 2012 साली केंद्रीय पर्वावरण मंत्रालयाने या प्रकल्पास मंजूरी दिली. या पुलामुळे येथील नैसर्गिक खारफुटी नष्ट होण्याची भीती व्यक्त केल्याने प्रकल्प लांबट राहिला. बराच काळ कोणत्याही प्रमुख खाजगी कंपनीने या प्रकल्पामध्ये रस दाखवला नव्हता. त्यामुळे सुमारे 11,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाचा खर्च सध्या कित्येक पटींनी वाढला आहे. मात्र, या सागरी महामार्गामुळे अनेक भाग जोडले जाऊन वाहतूक जलद होणार आहे. या नव्या मार्गामुळे पनवेल-सायन मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यासाही मदत होणार आहे.
या प्रकल्पामुळे मुंबई ते रायगड जिल्ह्यातील चिर्ले हा तीन तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटात पूर्ण करता येणार आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पकल्पाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले असून देशातील सर्वात लांबीचा हा सागरी मार्ग येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. pic.twitter.com/m84LD4FaeD
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 11, 2023
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पांतर्गत संपूर्ण समुद्रात 70 स्टील डेक उभारले जाणार आहेत. त्यापैकी 36 स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे. पॅकेज 2 मधील एकूण 32 ओएसडी स्पॅनपैकी 15 ओएसडी स्पॅन आधीच उभारले गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज पॅकेज 2 मधील सर्वात लांब 180 मीटरचा ओएसडी स्पॅन स्थापित करण्यात आला. सागरी क्षेत्रातील नॅव्हिगेशन भागातील हा स्टील डेक आहे. तांत्रिकदृष्ट्या त्याला ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (OSD) असे म्हटले जाते. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पातील ते एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. समुद्रातील जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मोठ्या लांबीचे हे स्पॅन समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून सुमारे 25 मीटर उंच बांधण्यात येत आहेत. त्यामुळे हा स्पॅन नेव्हिगेशनल स्पॅन म्हणून ओळखला जातो.

हे सुद्धा वाचा :
Eknath Shinde : शिवडी-न्हावाशेवा सागरी मार्ग लवकर मार्गस्थ होणार, एकनाथ शिंदेंची घोषणा
पुण्याला जिजाऊ नगर, शिवडी न्हावा शेवा मार्गाला ‘अंतुलेंचे‘ नाव देण्याची काॅंग्रेसची मागणी
Good News : नवी मुंबई मेट्रोचे 19 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन !
VIDEO: मेट्रोच्या ॲक्वा लाईन 3 च्या बोगद्यातील चाचणी प्रवास
शिवडी व न्हावा गांवदरम्यान असलेल्या या 22 किमी लांबीचा महामार्ग सहा पदरी आहे. त्यापैकी सुमारे 16.5 किमी पूल समुद्रात आहे, तर सुमारे 5.5 किमी इतकी जमिनीवरील पुलाची एकूण लांबी आहे. मुख्य पुलाची रचना ही 60 मीटर लांबीच्या स्पॅनची असून मुख्यतः ते सेगमेंटल बॉक्स गर्डर व कॉक्रिट डेक आहेत. जागतिक दर्जाचे बांधकाम तंत्रज्ञान वापरुन उभारलेला हा सागरी महामार्ग पर्यावरणपूरक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ओएसडी स्पॅन उभारणीच्या वेळी सांगितले. यावेळी खासदार राहुल शेवाळे, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस व्ही आर श्रीनिवास, मंत्री दादाजी भुसे, संजय राठोड, अतिरिक्त आयुक्त गोविंदराज आदी उपस्थित होते.