30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेनेचे बेगडी हिंदुत्व आणि सत्तेसाठी लाचार झाल्याचा चंद्रकांत पाटील यांचा आरोप

शिवसेनेचे बेगडी हिंदुत्व आणि सत्तेसाठी लाचार झाल्याचा चंद्रकांत पाटील यांचा आरोप

टीम लय भारी

मुंबई : पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये हिंदू समजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानीच्या मुद्य्यावरून भाजपा आता पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्यानंतर, आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर देखील निशाणा साधल्याचे दिसून आले. “राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा दुतोंडी आणि हिंदू विरोधी चेहरा जनतेला माहित होताच, पण शरजील प्रकरणात शिवसेनेचंही बेगडी हिंदुत्व आणि सत्तेची लाचारी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे.” असं चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

याशिवाय अन्य ट्विटद्वारेही त्यांनी शरजील उस्मानीच्या मुद्य्यावरून महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, “हिंदू समाजाबद्दल विखारी वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानीच्या अटकेसाठी आज(गुरूवार) राज्यात विविध ठिकाणी भारतीय युवा मोर्चा तर्फे आंदोलन करण्यात आले. शरजीलच्या मुसक्या आवळून आणणार असे छातीठोकपणे सांगणा-या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निष्क्रियपणामुळे शरजीलला अद्याप अटक करण्यात आली नाही.”

तसेच, “शरजीलच्या अटकेसाठी प्रत्यक्षात या महाभकास आघाडी सरकारने अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले नसून शरजील उस्मानीला अटक झाल्यास त्याला त्वरित जामीन कसा मिळेल हेच या सरकाराचे प्राधान्य दिसत आहे. या लबाड सरकारने शरजील उस्मानीला तात्काळ अटक न केल्यास भविष्यात भाजपा याहूनही तीव्र आंदोलन करेल! हिंदूंचा अपमान भाजपा कधीही सहन करणार नाही !!” असा इशारा देखील चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, पुण्यातील एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठामधील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने समाजात तेढ निर्माण करणारे विधान केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी उस्मानीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून आज स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये त्याचा जबाब नोंदवण्यात आला. जवळपास तीन तास उस्मानीचा जबाब नोंदविण्याचं काम सुरु होतं, अशी माहिती स्वारगेट पोलिसा मार्फत देण्यात आली आहे. याचसंदर्भातील अहवाल न्यायालयात सादर करणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी