29 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरेंच्या मदतीला शरद पवार धावले

उद्धव ठाकरेंच्या मदतीला शरद पवार धावले

लय भारी न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून भाजपने उद्धव ठाकरे सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. विनायक सावरकर व शेतकऱ्यांना आर्थिक मदत या दोन्ही मुद्द्यांवर भाजपने गेले दोन दिवस सभागृहाचे कामकाज होऊ दिलेले नाही. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारची रणनिती ठरविण्यासाठी खुद्द शरद पवार नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. भाजपविरोधात डावपेच आखण्यासाठी शरद पवार यावेळी सत्ताधाऱ्यांना कानमंत्र दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशीही सभागृहात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय भाजपने घेतलेला आहे. पहिल्या दिवशी सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपने सभागृह गाजवले होते. काल दुसऱ्या दिवशी भाजपच्या व शिवसेनेच्या आमदारांमध्ये हाणामारी झाली. काही दिवसांपूर्वी ‘सामना’मध्ये ‘अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत मिळाली पाहीजे’ असे लिहिले होते. सामनाचे हे कात्रण घेऊन भाजपच्या आमदारांनी सरकारकडे २५ हजार रुपये प्रती हेक्टरी मदतीची मागणी केली. त्यावरून शिवसेना व भाजपच्या आमदारांमध्ये चांगलीच जुंपली होती.

आज तिसऱ्या दिवशीसुद्धा भाजपकडून आक्रमक भूमिका घेतली जाण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. खासदार संजय राऊत यांच्याशी शरद पवार यांची बैठक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसोबतही शरद पवारांनी बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबतही शरद पवार यांची चर्चा झाल्याचे समजते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी या मुद्द्यांवर भाजप आक्रमक आहे. या दोन्ही मुद्द्यांवरून जनतेमध्ये सरकारविरोधी चित्र जाऊ नये यासाठी शरद पवार यांनी मार्गदर्शन केल्याचे समजते.

आज सुद्धा भाजप आक्रमक राहणार

भाजपच्या सगळ्या आमदारांची काल रात्री ८ वाजता बैठक घेण्यात आली होती. आमदार समीर मेघे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार यांनी सगळ्या आमदारांना मार्गदर्शन केले. सुमारे अडीच ते तीन तास ही बैठक चालली होती. तिसऱ्या दिवशी सुद्धा सरकारला धारेवर धरण्याबाबत आमदारांना यावेळी सुचना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

रा. स्व. संघाच्या अभ्यासवर्गाला राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, जयकुमार गोरेंची हजेरी

मंत्रीमंडळाला अंधारात ठेवून उच्च शिक्षण विभागात भरतीचा घाट

मंत्र्यांकडे पीएस, ओएसडी पदांवर वर्णी लावण्यासाठी शेकडोजणांचे लॉबिंग

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी