28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयसुप्रिया सुळेंनी मतदारसंघासाठी आणले १२ कोटी

सुप्रिया सुळेंनी मतदारसंघासाठी आणले १२ कोटी

टीम लय भारी

बारामती:  बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. सुप्रिया यांनी आपल्यामतदारसंघासाठी १२ कोटी रुपयांची निधी आणला आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील मुळशी, वेल्हे आणि हवेली या तीन तालुक्यांतील एकूण २४ गावांलगतच्या वाड्या-वस्त्यांवर वीज पुरवठा करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सततच्या प्रयत्नांतून हा निधी मंजूर करण्यात आला असून त्यासाठी सुळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष आभार मानले आहेत.

मुळशी आणि वेल्हे तालुक्यांतील विशेषतः डोंगराळ आणि दुर्गम गावांत विजेचे प्रश्न असून ते सोडवण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यानुसार मंजूर करण्यात आलेल्या बारा कोटी निधीमधून मुळशी तालुक्यातील वेगरे, कोंदूर, मोसे-दादवली, अडमाळ-पासलकर वस्ती, वांजळे-रामवाडी, जताडे-कुडलेवस्ती, पोमगाव-कातर वस्ती या सात ठिकाणी तसेच वेल्हे तालुक्यातील धिसर-ढेबेवस्ती, धानेप-धनगरवस्ती, घावर-घावरवाडीवस्ती, भागीनघर-वाडीवस्ती, भट्टी-वाघदरा-ढेबेवस्ती, सुरवड-वाडीवस्ती, माणगाव-कुंभतलवस्ती, रुळे-काळूबाईचा वाडा, शिरकोली-घरकूलवस्ती, कुरण-मोरेवस्ती, खामगाव-तळजाईवस्ती, वरोती-जननीमाता मंदिर, कोंढवली-स्मशानभूमी, केतकावणे-स्मशानभूमी, दादवडी-वस्ती, वरघड-बिरोबावाडी या सोळा ठिकाणी विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे.या विद्युत पुरवठ्यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

या दोन तालुक्यांबरोबरच हवेली तालुक्यातील आगळंबे यथे असलेल्या ठाकरवाडी-धनगरवाडा या ठिकाणीही विजेची आवश्यकता आहे. येथेही लवकरच वीजपुरवठा करण्यात येईल असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. वरील सर्व २४ गावांलागतच्या वाड्या वस्त्या तसेच मंदिर आणि स्मशानभूमीला वीजपुरवठा करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याबाबत सुळे या अनेक वेळा पत्राद्वारे आणि प्रत्यक्ष भेटी घेऊन लक्षात आणून देत होत्या. त्यासाठी निधीची मागणी करत होत्या. त्यानुसार त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी