30 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeराजकीयसुप्रिया सुळे कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार? पवारांना 'तो' म्हणणारा कोण?

सुप्रिया सुळे कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार? पवारांना ‘तो’ म्हणणारा कोण?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे खूप संतप्त झाल्या आहेत. कुणीतरी शरद पवारांचा उल्लेख तो शरद पवार केल्यामुळे सुप्रिया सुळे यांचा पारा चढला आहे. आणि त्यांनी या रागाच्या भरातच त्याचा करेक्ट कार्यक्रम करण्याची धमकी दिली आहे. याला निमित्त ठरले ते शरद पवारांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर लावलेली उपस्थिती. पक्षाच्या चिन्ह आणि नावासाठी सुरू असलेल्या वादावर एका वकिलाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा उल्लेख एकेरी म्हणजे ‘तो शरद पवार’ असा केला. यावरून सुप्रिया सुळे चांगल्याच भडकल्या असून त्यांनी त्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करण्याची धमकी दिली आहे.

वास्तविक खासदार सुप्रिया सुळे खूप संयमी आहेत. त्या चिडल्या तर चेहऱ्यावरील हास्य ढळू देत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही त्यांनी अजित पवार गटावर पहिला हल्ला कधीही चढवला नाही. विरोधकांवर टीका करतानाही त्यांची आक्रमक असली तरी संयमी असते. असे असताना सुप्रिया सुळे त्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिल्यामुळे सुप्रिया सुळे को गुस्सा क्यो आता है, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

शरद पवार हे ८३ वर्षांचे ज्येष्ठ नेते आहेत. सर्व राज्यांतील राजकीय नेते त्यांचा आदर करतात. विरोधक असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पवार यांचेही व्यक्तिगत संबंध उत्तम आहेत. असे असताना शरद पवारांचा एकेरी आणि अपमानास्पद उल्लेख केल्यामुळे सुप्रिया सुळे भडकल्या आहेत. म्हणूनच सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात ‘तो शरद पवार… कोण तो म्हणणारा तो शरद पवार. आता वकिली कर, तुझा नाय करेक्ट कार्यक्रम आज ना उद्या केला तर ना, तर शरद पवारांची पोरगी म्हणून नाव लावणार नाय!’ अशी थेट धमकी दिली आहे.

शरद पवारांचा कुणी कामा-मामा राजकारणात नव्हता. त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर पक्ष काढला. त्यात सगळ्यांचे योगदान आहे. तरीही त्या पक्षाला विश्वासार्हता देणारा चेहरा कोण असेल तर तो तो शरद पवार, हे कुणीही नाकारू शकत नाही, असे यावेळी सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस खरी शरद पवारांची हे सांगताना केंद्रीय निवडणूक आयोगात त्यांनी लावलेल्या उपस्थितीचे उदाहरण दिले. ८३ वर्षांचा माणूस, ज्या बाळाला जन्म दिला त्या पक्षासाठी इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये जाऊन बसले. त्यावेळी ज्यांना पक्ष हवाय, त्यांचा कुणी आला होता इलेक्शन कमिशनच्या कार्यालयात? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

दरम्यान, यावेळी सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांवर वारंवार टीका करणाऱ्यांनाही इशारा दिलाय. एकदा, दोनदा, तीनदा टीका सहन करू. त्यानंतर त्या टीकेला करारा उत्तर दिले जाईल, अशा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

सुप्रिया सुळे यांच्या या इशाऱ्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष आणखी चिघळेल, अशी सध्यातरी चिन्हे आहेत.

हे ही वाचा

अजित पवारांच्या पत्राला शरद पवारांचे उत्तर

‘शरद पवार जिथे सभा घेतील तिथे…’ अजित पवारांचं स्पष्ट वक्तव्य

नवीन शिक्षण धोरणासंदर्भात सरकार आक्रमक, अन्यथा विद्यापीठांवर कारवाईचा इशारा

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी