31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeमुंबईCongress : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी भाई जगताप, शेट्टी, चव्हाण यांची नावे चर्चेत

Congress : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी भाई जगताप, शेट्टी, चव्हाण यांची नावे चर्चेत

टीम लय भारी

मुंबई : मुंबई विभागीय काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे आ. भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी आ. मधु चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, आ. अमीन पटेल, चरणसिंह सप्रा अशी नावे चर्चेत असल्याचे समजते. (The names of Bhai Jagtap, Shetty and Chavan are being discussed for the post of Mumbai Congress president) काँग्रेस पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्यातील तसेच मुंबईतील पक्ष संघटनेत बदल करण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदासाठी इच्छूकांच्या समर्थकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून राज्य सरकारमधील सत्तेचा वापर पक्ष संघटना वाढीसाठी करण्याची गरज असल्याचे काँग्रेस पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्यातील तसेच मुंबईतील पक्ष संघटनेत बदल करण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठी इच्छुक आहेत. गेल्या काही वर्षांतील मुंबई काँग्रेसच्या गटबाजीच्या राजकारणाला मुठमाती देऊन मुंबईतील पक्ष संघटना वाढविण्याचा भाग म्हणून पक्षाचे मुंबई नेतृत्व बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षसंघटना वाढीवर भर दिला आहे. मुंबईत काँग्रेसला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असला, तरी त्यांच्यापर्यंत संघटनेच्या माध्यमातून जाणे आणि आगामी महापालिका निवडणुकांसाठी पक्षाची तयारी करणे यासाठी विद्यमान अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या जागी नवीन व्यक्तीची नेमणूक व्हावी, असा काहींचा आग्रह आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मुंबईसह कोकणात दारूण पराभव झाला. मुंबईतील पक्षाची कामगिरी बरी न झाल्यामुळे माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. मात्र ते मुंबई काँग्रेसच्या गटबाजीच्या राजकारणाला मुठमाती देण्यास असमर्थ ठरले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी