28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमुंबईउद्धव ठाकरेंचे खमके पाऊल : 'कोरोना'साठी मुंबई महापालिकेत 9 IAS अधिकाऱ्यांची फौज,...

उद्धव ठाकरेंचे खमके पाऊल : ‘कोरोना’साठी मुंबई महापालिकेत 9 IAS अधिकाऱ्यांची फौज, 3 अधिकाऱ्यांची नव नियुक्ती

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईमध्ये तर या विषाणुचा फैलाव अधिकच वाढला आहे. या संकटाच्या परिस्थितीत खमकेपणाने निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महापालिकेत मंत्रालयातून पाच IAS अधिकाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती केली आहे. महापालिकेत मुळचे चार अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे महापालिकेत एकूण नऊ अधिकाऱ्यांची फौज कार्यरत झाली आहे.

Coronavirus

मंत्रालयातून आलेल्या पाच अधिकाऱ्यांमध्ये काल नियुक्ती झालेल्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक व सचिव प्राजक्ता लवंगारे यांची काल तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. पंधरवड्यापूर्वी मनिषा म्हैसकर यांची तात्पुरती नियुक्ती झाली होती.

‘कोरोना’च्या सुरूवातीच्या टप्प्यातच आश्विनी भिडे आणि एन. रामास्वामी यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे ‘कोरोना’च्या लढाईसाठी मंत्रालयातून हे पाच IAS अधिकारी महापालिकेत तात्पुरत्या स्वरूपात आले आहेत.

अपर मुख्य सचिव दर्जाचे प्रवीण परदेशी हे महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. अतिरिक्त आयुक्त असलेले आबासाहेब जऱ्हाड, सुरेश काकाणी व जयश्री भोज हे तीन IAS अधिकारी सुद्धा महापालिकेत आहेत. असे मुळचे महापालिकेचे चार व तात्पुरत्या स्वरूपात आलेले पाच असे तब्बल नऊ आयएएस अधिकारी महापालिकेत ‘कोरोना’साठी सक्रीय झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ‘कोरोना’ नियंत्रित आणण्यासाठी मुख्यमंत्री विविध उपाययोजना करीत आहेत. मुंबईमध्ये मोठ्या संख्येने आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यामागेही उद्धव ठाकरे यांचीच रणनिती असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सौनिक, म्हैसकर, लवंगारे यांची नवनियुक्ती

नऊ IAS अधिकाऱ्यांपैकी सुजाता सौनिक, मनिषा म्हैसकर व प्राजक्ता लवंगारे अशा तिन्ही अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती झाली आहे.

मुख्य सचिव अजोय मेहता यांनी हे नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. मनिषा म्हैसकर यांच्याकडे राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव म्हणून मूळ जबाबदारी आहे. परंतु ‘कोरोना’मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांना सहाय्य करण्यासाठी म्हैसकर यांची महापालिकेत तात्पुरती नियुक्ती दिली आहे.

सुजाता सौनिक कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव आहेत. आता त्यांनाही मुंबई महानगरपालिकेत तात्पुरती नियुक्ती दिली आहे.

प्राजक्ता लवंगारे या मराठी भाषा विभागाच्या सचिव आहेत. गेल्या महिन्यात मंत्रालयामध्ये ‘कोरोना’साठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता. या कक्षामध्ये सुमारे १५ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. त्यात लवंगारे यांचाही समावेश होता. आता लवंगारे यांना महापालिकेत तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे.

सौनिक, म्हैसकर व लवंगारे या तिन्ही IAS अधिकाऱ्यांना आपल्या मूळ सचिवपदाची जबाबदारी सांभाळून महापालिकेत आयुक्तांना सहकार्य करण्याबाबत सुचना करण्यात आल्या आहेत.

मुंबईत ‘कोरोना’चे संकट वाढत असल्याने नियुक्त्या

बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये तब्बल ४२०५ ‘कोरोना’ रूग्ण आढळून आले आहेत. मुंबईचा पसाराही मोठा आहे. झोपडपट्टीच्या परिसरात ‘कोरोना’ने घुसखोरी केली आहे. ‘कोरोना’ संसर्ग नियंत्रित करण्याची तातडीची गरज आहे. त्यासाठी महापालिकेमध्ये पाच अतिरिक्त IAS अधिकाऱ्यांना पाठविले आहे.

या पाच IAS अधिकाऱ्यांकडे कोणती जबाबदारी द्यायची याचे अधिकार महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना देण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

राज्यातील चार IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या : महानंद, नागपूर, धुळे, वसई – विरारला नवे अधिकारी

Coronavirus च्या मुकाबल्यासाठी 11 आयएएस अधिकाऱ्यांची फौज

Praveen Pardeshi, BMC Commissioner on why is Mumbai struggling

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी