29 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeटॉप न्यूजखरे व्हिलन कोण ? खडसे की, फडणवीस ??

खरे व्हिलन कोण ? खडसे की, फडणवीस ??

तुषार खरात ( संपादक, LayBhari.in )

अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकलाच ( Eknath Khadse resign BJP ). खरेतर, त्यांनी यापूर्वीच हा निर्णय घ्यायला हवा होता. परंतु ज्या पक्षासाठी रक्ताचे पाणी करून कष्ट उपसले तो पक्ष त्यांना सोडवत नसावा. त्यामुळे तब्बल पाच वर्षे ते पक्षात सडले ( Eknath Khadse nowhere in BJP for 5 years ).

तळागाळातील एखाद्या कार्यकर्त्याला जी किंमत असते तेवढीही किंमत खडसे यांना गेल्या पाच वर्षात स्वतःच्याच पक्षात राहिली नव्हती. त्यांचा गुन्हा एवढाच होता की, ते मातब्बर नेते होते. देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा हुशार होते ( Eknath Khadse was brilliant leader more than Devendra Fadnavis ). त्यांच्याकडे अनुभव दांडगा होता. राजकारणात मुरलेले होते. लोकप्रिय होते.

विधीमंडळाच्या सभागृहात ते बोलायला उभे राहायचे तेव्हा त्यांचे भाषण ऐकतच राहावेसे वाटायचे. आपल्या अभ्यासू भाषणांनी ते सत्ताधारी पक्षाला घायाळ करायचे. सत्तेत असो वा विरोधात, खडसे यांचा प्रशासनावर वचक होता. खडसे यांचे नेमके हेच गुण फडणवीस यांना खटकत होते.

भाजपला महाराष्ट्रात हिंग लावूनही कुणी विचारत नव्हते. इतकी दयनीय स्थिती तीसेक वर्षांपूर्वी होती. महाराष्ट्रात कसाबसा एखादा – दुसराच आमदार निवडून यायचा. त्या काळात खडसे यांनी पक्षासाठी अहोरात्र वाहून घेतले. त्यावेळी प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे भाजपचे प्रमुख नेते होते. या दोन्ही नेत्यांनंतर नितीन गडकरी, एकनाथराव खडसे, सुधीर मुनगंटीवार यांची नावे घेतली जायची. नितीन गडकरी हे महाजन – मुंडे विरोधी गटातले. खडसे मात्र मुंडे यांचे निकटचे ( Eknath Khadse was followers of Gopinath Munde ).

नंतर फार उशिरा देवेंद्र फडणवीस हे भाजपात आले ( Devendra Fadnavis junior leader in BJP ). नागपूरचे असूनही त्यांचे नितीन गडकरींशी पटायचे नाही. त्यामुळे त्यांनी गडकरीविरोधी गोपीनाथ मुंडे यांच्या गोटात शिरकाव केला.

गोपीनाथराव मुंडे यांचे निधन होईपर्यंत फडणवीस हे त्यांच्याच छत्रछायेखाली आपला राजकीय प्रवास करीत होते. मुंडे यांच्या वरदहस्तामुळेच देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले होते. फडणवीस या पदावर असतानाच योगायोगाने सन २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्या होत्या.

नरेंद्र – देवेंद्र मेथकूट

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्तरावर अवतरले. त्यांचे त्यावेळचे पक्षातील स्पर्धक नितीन गडकरी हे होते. गडकरी यांचे विरोधक म्हणून गोपीनाथ मुंडे व देवेंद्र फडणवीस होते. पण नरेंद्र मोदींना त्यावेळी गोपीनाथ मुंडेंपेक्षा फडणवीस सोईचे वाटत होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने फडणवीस व मोदी यांचे सूत जुळू लागले. लोकसभा निवडणुकीनंतर दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले.

महाराष्ट्रात त्यावेळी भाजपचे चार – पाच मातब्बर नेते होते. नितीन गडकरी, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस. गोपीनाथ मुंडे यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे त्यावेळी महाराष्ट्रातील जनतेत पंकजा मुंडे यांच्याविषयी सहानुभूतीची लाट होती. आजही फडणवीस यांच्यापेक्षा पंकजा मुंडे बहुजनांमध्ये लोकप्रिय नेत्या आहेत ( Pankaja Munde is popular leader in Maharashtra ). नितीन गडकरी हे स्पर्धक असल्याने मोदी यांनी गडकरींना केंद्रात मंत्रीपद देवून महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांचा पत्ता कट केला.

Eknath Khadse resign BJP
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांचे पद्धतशीर पंख कापले

अनुभव, क्षमता व कर्तृत्व या तिन्ही बाबी लक्षात घेता महाराष्ट्र भाजपची धुरा एकनाथ खडसे यांच्या खांद्यावर यायला हवी होती. किमान सुधीर मुनगंटीवार यांना तरी ही संधी मिळायला हवी होती. पण तसे झाले नाही. कारण खडसे व मुनगंटीवार हे मुरलेले नेते होते. मोदी यांना ते सोयीचे वाटत नव्हते. ते मोदींच्या ओंजळीने पाणी पितील याची खात्री नव्हती.

सन २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने फडणवीस यांचे मोदींसोबत चांगलेच सूत जुळले होते ( Devendra Fadnavis become close to Narendra Modi in Loksabha 2014 election ). त्यामुळे फडणवीस हेच आपले उत्तम लांगूलचालन करू शकतील, याची खात्री मोदींना पटली, आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तिसऱ्या फळीत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची एकदम पहिल्या स्थानावर एंट्री झाली. त्यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली ( Devendra Fadnavis became Chief Minister of Maharashtra due to Narendra Modi).

एकनाथ खडसेंचा पत्ता कापला

खरेतर, सन २०१४ मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर एकनाथ खडसे यांनाच मुख्यमंत्रीपद मिळायला हवे होते ( Eknath Khadse was main claimer for Chief Minister in 2014 ). पण ते मिळाले नाही. पण दुसऱ्या स्थानावरील महसूल खात्याचे मंत्रीपद त्यांना देण्यात आले. सोबत कृषी खातेही दिले.

खडसे यांना मुख्यमंत्रीपद दिले गेले नाही. किमान उपमुख्यमंत्रीपद तरी मिळेल, अशी त्यावेळी जनभावना होती. परंतु फडणवीस एवढे चाणाक्ष की, त्यांनी उपमुख्यमंत्रीपदच ठेवले नाही. वास्तवात, उत्तर प्रदेश सरकारमध्ये भाजपने मुख्यमंत्र्यांबरोबरच उपमुख्यमंत्री हे पद सुद्धा ठेवले आहे. मग हा न्याय महाराष्ट्राला सुद्धा द्यायला हवा होता. पण फडणवीस यांना खडसे डोईजड होऊ नयेत म्हणून हे पदच ठेवले नाही.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावर आले खरे, पण त्यांना खडसेंचा अडसर ठरू लागला. मंत्रीमंडळामध्ये खडसे व मुनगंटीवार हे अनुभवी मंत्री होते. त्यांना मनोहर जोशी यांच्या सत्ताकाळातील मंत्रीपदाचा अनुभव होता. देवेंद्र फडणवीस यांनी एकदाही मंत्रीपद हाताळलेले नव्हते.

थेट मुख्यमंत्रीपदाची लॉटरी फडणवीस यांना लागली होती. त्यामुळे फडणवीस यांचे अज्ञान अनेकदा उघडे पडायचे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत उघडपणे खडसे हे फडणवीस यांच्या चुका दाखवायचे.

Eknath Khadse resign BJP
देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे, विनोद तावडे, प्रकाश महेता, चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्यांवरही अन्याय केला

एका बाजूला खडसे यांचा आक्रमकपणा, दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे यांची लोकप्रियता. तिसऱ्या बाजूला सुधीर मुनगंटीवारांचा अनुभव. हे कमी म्हणून की काय, विनोद तावडे हे फडणवीस विरोधक सुद्धा त्यावेळी फॉर्मात होते.

फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून सगळा कारभार स्वतःच्या मुठीत ठेवायचा होता. पण पाचेक सहकारी मंत्र्यामुळे त्यांना हे जमत नव्हते. त्यामुळे कुणाचा तरी काटा काढणे गरजेचे होते.

अशातच खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पुण्यातील जमीन ( Eknath Khadse’s land scam in Pune ), दाऊदशी संभाषण ( Eknath Khadse’s conversation with Dawood ) आणि त्यांच्या अधिकाऱ्याने पैसे मागितल्याची तक्रार. अशी तीन प्रकरणे चर्चेत आली.

खरेतर, मंत्रीपदावरील जवळपास प्रत्येक व्यक्तीच्याच बाबतीत असे आरोप होत असतात. बऱ्याचदा त्या आरोपात तथ्य असतेच असे नाही. मात्र, तथ्य असूनही पक्षश्रेष्ठी आपल्या मंत्र्यांना पाठीशी घालत असतात.

खडसे यांच्या बाबतीत मात्र पाठीशी घालण्याचा सवालच नव्हता. कारण खडसे हे देवेंद्र फडणवीस यांच्या पायात रूतलेला काटा होता. त्यामुळे फडणवीस यांनी खडसे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेतला. त्यावेळी जनभावनाही काहीशी खडसे यांच्या विरोधातच होती. त्यामुळे फडणवीस यांनी केलेली कारवाई योग्यच आहे, असे वाटले होते. ही कारवाई दिल्लीतून पक्षश्रेष्ठींनी केल्याचे चित्रही त्यावेळी फडणवीस यांनी रंगविले.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजप सोडल्याचे सांगताना खडसेंच्या डोळ्यात दाटले अश्रू

Uddhav Thackeray : पायाखालचे दगड का निसटत आहेत याकडे लक्ष्य द्या : उद्धव ठाकरे

नाथाभाऊ गेल्याने पक्षाचे नुकसान होणार : चंद्रकांत पाटील

Goodbye : खडसेंचा भाजपला रामराम! उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

खडसे गेल्यानंतर एककेंद्री सत्ता

खडसे यांचा काटा काढल्यानंतर मंत्रीमंडळातील दुसऱ्या सहकारी पंकजा मुंडे यांच्याकडील जलसंधारण खातेही फडणवीस यांनी काढून घेतले. हे खाते काढण्यात आले तेव्हा पंकजा मुंडे परदेशात होत्या. खाते काढून घेतल्याचे त्यांना बातम्यांमधूनच कळाले. म्हणजे, पंकजा मुंडेंना विश्वासात न घेताच फडणवीस यांनी हे खाते काढून घेतले होते.

त्यानंतर त्यांनी विनोद तावडे यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांची उचलबांगडी केली. पुढे तर त्यांनी तावडे यांच्याकडील शालेय शिक्षण खातेही काढून घेतले.

सुधीर मुनगंटीवार हे मंत्रीमंडळातील ज्येष्ठ व अनुभवी नेते होते. फडणवीस यांचे रंग पाहिल्यानंतर मुनगंटीवार यांनी त्यांच्याशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली. परंतु वरिष्ठ असूनही मुनगंटीवारांना दूर ठेवण्याची किमया फडणवीस यांनी साधली. सध्या मुनगंटीवार भाजपची जोरदार भूमिका मांडताना मीडियामध्ये दिसत असतात. पण फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मुनगंटीवार यांचा आवाज पूर्ण दाबला होता. चंद्रकांत पाटील व गिरीष महाजन हे त्यावेळी कानामागून येऊन तिकट झाले होते.

खडसे, मुंडे, तावडे व मुनगंटीवार यांना वेगवेगळ्या मार्गाने खिंडीत गाठल्यानंतर फडणवीस यांना आपला मार्ग मोकळा झाला, अन् ते मोकाट सुटले.

फडणवीस यांना आता पक्षात कोणी स्पर्धकच उरला नाही. तोंड उघडले तर आपले पंख छाटले जातील याचीच भिती सगळ्यांना वाटायची. मुख्यमंत्रीपदावर आल्यानंतर पहिल्या वर्षभरातच फडणवीस यांनी आपला असा दरारा तयार केला होता.

यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शरद पवार, मनोहर जोशी, विलासराव देशमुख, आणि आताचे उद्धव ठाकरे असे अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले. पण या सगळ्यांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे, मंत्रीमंडळातील सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करायचे. मतभेदाच्या ठिकाणी मतभेद. मंत्रीमंडळाचा प्रमुख या नात्याने आपल्याच मंत्र्यांना नामोहरण करण्याचे षडयंत्री उपद्व्याप यापूर्वी कोणत्याच मुख्यमंत्र्याने केले नाहीत. मुख्यमंत्र्यांची एखाद्या – दुसऱ्या मंत्र्यावरील नाराजी समजू शकते. पण संबंध सगळ्याच मंत्र्यांचे अधिकार स्वतःच्याच मुठीत ठेवायचे असे प्रकार पहिल्यांदाच फडणवीस यांच्या काळात पाहायला मिळाले.

Eknath Khadse resign BJP
मागील सरकार भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांचे होते. पण फडणवीस शिवसेनेलाही कोलत होते

शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांना इतर मंत्री घाबरायचे. पण ही भिती आदरयुक्त होती. पवार यांनी कधी आपल्या पदाचा उपयोग मंत्र्यांसाठी धाकदपटशा म्हणून केला नाही.

फडणवीस हे एकमेव असे मुख्यमंत्री होते की, त्यांनी आपल्याच सहकारी मंत्र्यांचे पंख कापण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना ते सहकारी मंत्र्यांना सतत सुचना करायचे. मंत्रालयात नियमित येत जा. जनतेच्या तक्रारी ऐकून घ्या.

फडणवीस यांची पद्धत मात्र वेगळीच होती. ते सहकारी मंत्र्यांना दम द्यायचे. मंत्रालयात येऊ नका. तुमच्या जिल्ह्यातच थांबा. ग्रामपंचायत, पंचायत समिती, बाजार समित्या, जिल्हा परिषदा, नगर पंचायती, नगर परिषदा… अशा स्थानिक निवडणुका सतत होत असतात. या निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचा पराभव झाला पाहिजे हे मंत्र्यांचे काम आहे. मंत्र्यांनी आपल्या भागातील निवडणुका जिंकण्यावर लक्ष द्या, अशा फडणवीस यांच्या सुचना असायच्या.

मंत्रालयात मंत्र्यांनी केवळ मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठीच आले पाहीजे, असा अलिखीत नियम फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांच्या काळात सगळ्या खात्यांचे निर्णय ते स्वतःच घ्यायचे. फडणवीस यांनी घेतलेले निर्णय अनेकदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांनाही माहित नसायचे. खात्याच्या मंत्र्यांपेक्षा ते त्या खात्याच्या सचिवांसोबतीने काम करायचे. त्यामुळे सचिव मंडळी आपल्या खात्याच्या मंत्र्यांनाही जुमानत नसायचे. फडणवीसांनी आपल्याच मंत्र्यांची अवस्था नख्या काढलेल्या वाघांसारखी करून ठेवली होती.

मागील सरकारमध्ये भाजपसोबत शिवसेनाही सत्तेत होती. परंतु शिवसेना सत्तेत असूनही विरोधी पक्षाप्रमाणे काम करीत होती. याचे कारण फडणवीस मित्र पक्षाला कसलेही जुमानत नव्हते. शिवसेनेच्या मंत्र्यांना त्यांनी कसलेच अधिकार ठेवलेले नव्हते. एवढेच कशाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुचनांनाही ते केराची टोपली दाखवायचे. आरे कारशेडला शिवसेनेने उघड विरोध केला होता. पण तरीही फडणवीस यांनी हा मोठा निर्णय शिवसेनेला न जुमानता घेतला होता. असे कितीतरी उदाहरणे आहेत की, त्यावेळी शिवसेनेला फडणवीस यांनी अपमानास्पद वागणूक दिली होती.

त्यावेळी शिवसेनेने अपमान सहन केला. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने सव्याज हा अपमान परत करीत फडणवीसांना सत्तेबाहेर ठेवले आहे.

खडसेंना संपविण्याचेच कारस्थान

एकनाथ खडसे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला तेव्हा तुम्हाला लवकरच परत मंत्रीमंडळात घेतले जाईल, असे आश्वासन दिले होते. पण तसे झाले नाही. उलट खडसे यांचे अधिकाधिक खच्चीकरण करण्यात आले.

पक्षाच्या कोअर कमिटीत असलेले स्थानही नंतर काढून टाकण्यात आले. महत्वाच्या निर्णयात त्यांना विश्वासात घेतले जात नव्हते. गिरीष महाजन या अतिशय ज्युनिअर असलेल्या नेत्याला हाताशी धरून फडणवीसांनी खडसे यांना त्रास सुरू केला. जळगाव हा खडसे यांचा बालेकिल्ला. पण सत्तेचा वापर करून फडणवीस यांनी गिरीष महाजन यांचे जळगावात महत्व वाढविले. गिरीष महाजन यांनीही खडसे यांच्या विरोधात कारस्थाने केली.

धक्कादायक म्हणजे, सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांना तिकीटच देण्यात आले नाही ( Devendra Fadnavis . मागणी केलेली नसतानाही त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना तिकीट दिले गेले. पण रोहिणी खडसे यांचा पराभव कसा होईल यासाठी स्वतः फडणवीस यांनी प्रयत्न केले, त्याची अंमलबजावणी गिरीष महाजन यांनी केली.

खडसे यांच्याप्रमाणेच विनोद तावडे, प्रकाश महेता, चंद्रशेखर बावनकुळे यांचेही तिकीट फडणवीस यांनी कापले. धनगर समाजाचे नेते महादेव जानकर, विनायक मेटे व सदाभाऊ खोत यांच्या पक्षाला एक सुद्धा तिकीट दिले नाही. उलट मित्रपक्ष असूनही महादेव जानकर यांच्या राहूल कुल या आमदाराला फोडून भाजपचे तिकीट दिले.

पंकजा मुंडे व राम शिंदे या दोन्ही मातब्बर मंत्र्यांचा विधानसभेत पराभव झाला. या दोघांच्या समोर अनुक्रमे धनंजय मुंडे व रोहित पवार हे मातब्बर उमेदवार होते. त्यासाठी पक्षाने मुंडे व शिंदे यांना मोठी ताकद द्यायला हवी होती. परंतु फडणवीस यांनी जाणीवपूर्वक ती ताकद दिली नाही.

Eknath Khadse resign BJP
देवेंदर् फडणवीस यांनी मित्रपक्षांचे नेत्यांच्याही बाबतीत विश्वासघात केला

काही महिन्यांपूर्वीच ‘कोरोना’ काळात विधानपरिषदेवर काही आमदारांच्या नियुक्त्या झाल्या. त्यात भाजपच्या वाट्याला चार जागा आल्या होत्या. या चार जागांवर पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, राम शिंदे, विनोद तावडे अशा नेत्यांची नावे चर्चेत होती. पण कुणाच्या स्वप्नात नसलेल्या भलत्याच चार लोकांना या पदांवर संधी दिली गेली.

त्यानंतर भाजपच्या राज्य कार्यकारिणीची निवड झाली. त्यात राम शिंदे यांना संधी दिली गेली. पंकजा मुंडेंना डावलले. मागणी नसतानाही राज्याच्या कार्यकारिणीमध्ये प्रीतम मुंडे यांना घेण्यात आले. नंतर पंकजा यांना केंद्राच्या कार्यकारिणीत घेण्यात आले.

खरेतर, पंकजा या राज्यातील नेत्या आहेत. प्रीतम या केंद्रात असतात. पण कार्यकारिणीमध्ये स्थान देताना प्रीतम यांना राज्यात, तर पंकजा यांना केंद्रात स्थान दिले गेले. खडसे यांच्या नशिबी मात्र तेवढीही संधी मिळाली नाही.

पक्ष सोडण्याशिवाय गत्यंतर नव्हते

एकनाथ खडसे हे भाजपचे फायरब्रॅंड नेते होते. त्यांचा शब्द पक्षात प्रमाण मानला जायचा. पण गेल्या पाच वर्षात फडणवीस यांनी खडसे यांची केविलवाणी अवस्था करून टाकली. खडसे हे एक थट्टेचा विषय बनून गेला होता.

राष्ट्रीय स्तरावर नरेंद्र मोदींनी लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, जसवंत सिंग, शत्रुघ्न सिन्हा, नवज्योतसिंग सिद्धू यांना जसे खड्यासारखे बाजूला काढले, अगदी तसेच राज्यात फडणवीस यांनी खडसेंच्या बाबतीत केले.

आडवाणी, जोशी, सिन्हा यांना बाजूला सारताना वयाचा निकष लावला होता. पण खडसे यांच्या बाबतीत हा निकषही नव्हता. खडसे यांनी अद्याप पंच्याहत्तरी पार केलेली नाही.

Mahavikas Aghadi

खडसे हे स्पर्धक आहेत. त्यामुळे काहीही करून त्यांची विल्हेवाट लावायचीच असाच चंग फडणवीस यांना बांधला होता. त्यानुसार गेली ५ वर्षे खडसे यांच्यावर फडणविसांनी अमाप अन्याय केला. महाराष्ट्राच्या राजकारणात इतका अन्याय झेललेला अन्य दुसरा कुणी नेता नसेल.

फडणवीस हे मुद्दामहून आपल्यावर अन्याय करीत आहेत, असे स्पष्ट दिसत असूनही एकनाथ खडसे यांनी मोठी सहनशक्ती दाखविली. ऐन उमेदीतील ५ वर्ष विजनवासात घालवली. सत्तेत नसताना पक्ष वाढवायचे काम खडसे यांनी केले होते. पण पक्ष सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांना अडगळीत टाकण्यात आले.

फडणवीस यांची कुटील कारस्थाने लक्षात घेऊन खडसे यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळीच पक्ष सोडायला हवा होता. खडसे यांना त्यावेळी तिकीट नाकारले होते. त्यामुळे पक्ष सोडण्यासाठी सबळ कारण हाती होते. जनतेची सहानुभूतीही खडसेंकडे होती. पण तरीही ज्या पक्षात ४० वर्षे घालविली, त्या पक्षाला असे लगेच सोडणे त्यांना उचित वाटले नसावे.

त्यामुळे त्यांनी वाट पाहण्याची भूमिका घेतली. अखेर पाच वर्षांच्या अन्यायानंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकला. अपेक्षेप्रमाणे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच पक्ष सोडत असल्याचे सांगितले ( Eknath Khadse attacks on Devendra Fadnavis ).

खडसे यांनी पक्ष सोडायला नको होता. त्यांनी मला खलनायक बनविले, अशी सारवासारव देवेंद्र फडणवीस यांनी केली. परंतु गेल्या सहा वर्षांतील भाजपचा महाराष्ट्रातील इतिहास बघता, फडणवीस हेच मोठे खलनायक आहेत हे सांगण्याची कुणा ज्योतिषाची गरज नाही.

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

जनहिताच्या कामापेक्षा फडणवीस यांनी आपल्याच सहकारी मंत्र्यांना उद्ध्वस्थ करण्यासाठी सगळी शक्ती वापरली. त्यामुळे भाजप मजबूत असतानाही सध्या राज्यात सत्तेबाहेर राहिला आहे. गेल्या पाच वर्षात राज्याची धुरा एकनाथ खडसे किंवा सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे असती तर हे चित्र निश्चितच दिसले नसते. त्यामुळे खरा ‘व्हिलन’ कोण आहे हे सुज्ञास सांगण्याची गरज नाही ( Who is real villain, Eknath Khadse or Devendra Fadnavis ) .

खरे व्हिलन कोण ? खडसे की, फडणवीस ??

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी