29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeटॉप न्यूज'मला डॉक्टर सायबास्नी इलेक्शनसाठी शंभर रुपये द्यायचेत'

‘मला डॉक्टर सायबास्नी इलेक्शनसाठी शंभर रुपये द्यायचेत’

सत्तार शेख,अमोल शिर्के | लयभारी न्यूज नेटवर्क

अहमदनगर | अकोले : आपला उमेदवार गरीब हाय म्हणून मला आपल्या डाॅक्टर सायबास्नी इलेक्शनसाठी मदत करायची हाय,असे म्हणत अंगावर फाटके कापडं असणाऱ्या एका आदिवासी मतदाराने राष्ट्रवादीचे अकोले मतदारसंघातील उमेदवार डॉ.किरण लहामटे यांना आर्थिक पाठबळ म्हणून शंभर रुपयांची मदत बहाल केली. एका सामान्य माणसाने डाॅक्टरांसाठी दिलेली मदत पाहून अवघ्या दीड मिनिटात 1 लाख 21 हजार रुपयांची आर्थिक मदत मतदारांनी स्वयंस्फूर्तीने डाॅक्टरांच्या झोळीत टाकली. अचानक घडलेल्या या प्रसंगातून मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचं आपल्यावर असलेले निस्सीम प्रेम पाहून डॉ लहामटे प्रचंड भावूक झाले. मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाच्या शिदोरीचा शिधा स्विकारताना डाॅक्टरांचे डोळे आपसूकच पाणावले. अकोले मतदारसंघातील जनता यंदा परिवर्तनासाठी सज्ज झाली आहे. जनतेनेच निवडणूक हातात घेतल्याचा भावना यावेळी उपस्थितांमधून व्यक्त होत होत्या.

लोकसभेच्या काळात विद्यार्थी नेता कन्हैया कुमारासाठी जनतेने अशीच प्रेमाची शिदोरी जमवून दिली होती. आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या रणांगणात अकोले मतदारसंघ जनतेच्या वेगळ्याच मुडमुळे बहूचर्चित ठरणार आहे असेच चित्र दिसू लागले आहे.

माजी मंत्री मधुकर पिचड यांचे कट्टर विरोधक असलेले डॉ.किरण लहामटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अकोले विधानसभेची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. मनाने सच्चा असलेला हा नेता आर्थिकदृष्टया कमकुवत असल्याने अकोलेकर जनता लहामटेंच्या पाठीशी आर्थिकदृष्ट्या उभी राहिली आहे. नुकतीच डॉ.किरण लहामटे यांच्या पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली. ही बैठक सुरू असतानाच करवर नावाच्या आदिवासी शेतकऱ्याने बैठकीत उभे राहून मला आपल्या डॉक्टर सायबाला इलेक्शनच्या खर्चासाठी शंभर रुपये दयायचे आहेत असे सांगितले. अंगावर फाटके कापडं पण मनाने श्रीमंत असलेल्या या शेतकऱ्याचे उदारमतवादी कृत्य पाहून उपस्थित कार्यकर्ते अवाक् झाले. आपल्याप्रती कार्यकर्त्याची असलेली निष्ठा पाहून डॉ.लहामटे यांनी या रकमेचा मोठा आदरपूर्वक स्वीकार केला.

पिचडांचे साम्राज्य उध्वस्त करण्यासाठी जनतेच निवडणूक घेतली हातात ?

अकोले विधानसभेची निवडणूक यंदा चर्चेची ठरणार आहे. दोन प्रमुख नेत्यांमध्ये एकास एकचा सामना रंगणार आहे.ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती मध्ये असल्याची चर्चा सर्वसामान्य मतदार करत आहेत. त्यामुळे जनशक्तीच्या उमेदवाराला आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून मतदार जनता गावोगावी हातात झोळी घेऊन आर्थिक मदत गोळा करीत आहे. येथील लढत माजी मंत्री मधुकर पिचडांचे पुत्र वैभव पिचड विरुद्ध डाॅ किरण लहामटे अशी होणार आहे. पिचडांचा बालेकिल्ला असलेल्या अकोले मतदारसंघात यंदा पिचड विरोधकांची मोट बांधून पिचडांचे साम्राज्य उध्वस्त करण्याचे मनसुबे राष्ट्रवादीने आखले आहेत. याला यश येण्यासाठी सामान्य जनतेत लोकप्रिय असलेल्या डाॅ लहामटेंना पिचडांविरोधात मैदानात उतरवून येथील लढत रंगतदार करण्याचा प्रयत्न आघाडीने केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनाही लहामटेंच्या पाठीशी सर्वप्रकारची ताकद उभी करावी लागणार आहे. दरम्यान सामान्य जनतेकडून लहामटेंना आर्थिक पाठबळ देण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्यामुळे यंदा पिचडांचे साम्राज्य उध्वस्त होणार अशीच चर्चा राज्यात होऊ लागली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी