29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeटॉप न्यूजभाजप – शिवसेनेसमोर सव्वाशे बंडखोरांचे आव्हान, आजचा दिवस बंडोंबांना थंड करण्याचा

भाजप – शिवसेनेसमोर सव्वाशे बंडखोरांचे आव्हान, आजचा दिवस बंडोंबांना थंड करण्याचा

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : सत्तेच्या लोण्यावर डोळा ठेवून अनेक नेत्यांनी भाजप – शिवसेनेमध्ये उड्या मारल्या. पण तिकिट वाटप करताना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची भलतीच तारांबळ उडाली आहे. ज्याला तिकिट मिळाले नाही, अशा अनेक नेत्यांनी महायुती विरोधात बंड करत अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. असे जवळपास सव्वाशे बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणूक अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे किती बंडोबा आपले बंड थंड करतील याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी बंडोबांना शांत करण्यासाठी कालचा रविवारचा पूर्ण दिवस कामी लावला. बंडखोरांशी या नेत्यांनी मोबाईलवरून संपर्क साधला. अनेक बंडखोरांनी मोबाईल बंद ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांशी, निकटवर्तीयांशी संपर्क साधण्यात आला आहे. ज्या बंडखोरांनी गैरप्रकार केले आहेत, त्याचीही आठवण त्यांना करून दिली जात आहे. बंडखोरांनी आपली तलवार म्यान करावी यासाठी जोरदार प्रयत्न भाजप व शिवसेनेने केले आहेत.

भाजप – शिवसेनेत आयातांची मेगाभरती झाली आहे. पण सगळ्याच आयातांना तिकिटे मिळाली नाहीत. तिकिट न मिळालेल्या आयतांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. काही ठिकाणी आयातांना तिकिटे देण्यात आली. पण या आयातांसाठी विद्यमान आमदारांना तिकिटे नाकारण्यात आली आहेत. अशा विद्यमान आमदारांनी व अन्य इच्छूकांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. ज्या ठिकाणी शिवसेनेला तिकिट दिले आहे, तिथे भाजपच्या इच्छुकाने बंडखोरी केली आहे. तर ज्या ठिकाणी भाजपला तिकिट दिले आहे, अशा ठिकाणी शिवसेनेच्या इच्छुकाने बंडखोरी केली आहे. विविध कारणांमुळे भाजप – शिवसेनेला बंडखोरीची मोठी लागण झाली आहे. अशा अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधून त्यांची ‘समजूत’ काढण्यात येत आहे. काही नाराजांनी काँग्रेस – राष्ट्रवादीमध्येही प्रवेश केला आहे.

जवळपास सव्वाशे बंडोबा निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे भाजप – शिवसेनेसमोर मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारापेक्षा आपल्याच बंडखोरांमुळे पक्षाचा उमेदवार आपटी खाईल याची भीती दोन्ही पक्षांना वाटत आहे. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी कितीजण निवडणुकीतून अंग काढून घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी