29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeटॉप न्यूजबेरोजगारांना दरमहा 5 हजार रुपये, शेतकऱ्यांना चार महिन्यांत कर्जमाफी : काँग्रेस –...

बेरोजगारांना दरमहा 5 हजार रुपये, शेतकऱ्यांना चार महिन्यांत कर्जमाफी : काँग्रेस – राष्ट्रवादीचा शपथनामा जाहीर

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करणे, पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते पदव्युत्तर शिक्षण पूर्ण माफ करणे, बेरोजगारांना प्रतीमहा 5 हजार रुपये भत्ता, झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणाला सामोरे जाण्यासाठी स्वतंत्र नागरी प्राधिकरण स्थापन करणे, 500 फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करणे, मराठी विद्यापीठाची स्थापना करणे, कामगारांचे किमान वेतन 21 हजार करणे इत्यादी महत्वपूर्ण आश्वासने असलेला शपथनामा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षांच्या संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या वतीने आज जाहीर करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत, डॉ. सुरेश माने आदी मान्यवर उपस्थित होते.

शपथनाम्यात ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरण, क्लायमेंट चेंज यांचाही समावेश करण्यात आला आहे. अतिशय महत्वाच्या या प्रश्नांना आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने निवडणुक जाहीरनाम्यात स्थान दिलेले नव्हते. पण आम्ही ते स्थान दिले असल्याचे शपथनामा समितीच्या प्रमुख खासदार वंदना चव्हाण यांनी यावेळी सांगितले. शेती, उद्योग, वेगवेगळे घटक मागास, अल्पसंख्याक शिक्षण, आरोग्य जलसंधारण, ऊर्जा, युवा, ज्येष्ठ नागरिक, महिला, पर्यटन विकास, क्रीडा, साहित्य, कला, विधी व न्याय इत्यादी प्रश्नांवर शपथनाम्यात आश्वासने देण्यात आली आहेत. उच्च शिक्षणासाठी शून्य व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे, खासगी नोकरीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना 80 टक्के प्राधान्य देणे, मानवी विकास निर्देशांक वाढविणे, जात पडताळणीची प्रक्रिया सुटसुटित करणे, महिला बचत गटांना व्यवसायासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद करणे, छेडछाडमुक्त महाराष्ट्र निर्माण करणे, न्या. सच्चर समितीच्या तरतुदींची अंमलबजावणी करणे, आशा व अंगणवाडी सेविकांसाठी सरकारी दर्जा देणे इत्यादी महत्वपूर्ण आश्वासनांचाही शपथनाम्यात समावेश आहे.

हा शपथनामा तयार करण्यासाठी खासदार वंदना चव्हाण यांनी परीश्रम घेतले होते. त्यांना पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुणगेकर यांनी मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 14 व्या वर्षी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यातून आम्ही प्रेरणा घेऊन शपथनामा बनविला असल्याचे खासदार वंदना चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

हा शपथनामा आम्ही अत्यंत काळजीपूर्वक बनविला असून त्यातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास आमदार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केला. आमदार जयंत पाटील म्हणाले की, भाजप सरकारने राज्याची सर्व पातळ्यांवर अधोगती करून ठेवली आहे. 16000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. 32 हजार नोकऱ्यांसाठी 32 लाख अर्ज येत आहेत. राज्याचा विकासदर 13 टक्क्यांवरून 10 टक्क्यावर घसरला आहे. पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश अशी राज्ये महाराष्ट्राच्याही पुढे गेली आहेत. आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्याच्या विकासाची गाडी रूळावर आणली जाईल, असे जयंत पाटील म्हणाले. आम्ही दुष्काळी भागातील जलसंधारण व पाणलोटांच्या योजना सक्षम करणार आहोत. सिंचनाचे काम ठप्प झालं आहे. जलसिंचनाचा जो अनुशेष आहे तो भरून काढू. विदर्भात व मराठवाड्यात भाजप सरकारने कमी निधी दिला. आम्ही 8 ते 10 हजार कोटी रूपये दरवर्षी द्यायचो. या सरकारने 5 – 6 हजार कोटी पेक्षा जास्त निधी दिला नाही. नवी मुंबईच्या विमानतळाची जागा ग्राऊंड लेव्हलिंग करण्यापलिकडे काहीच झालेले नाही. मेट्रोच्या लाईन्स, मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन अशा नुसत्याच घोषणा केल्या जात आहेत. पण त्यासाठी पैशाची तरतूद केली जात नाही. अनुसूचित जमाती व जातींसाठी अर्थसंकल्पाच्या 9 व 11 टक्के निधी दिला जात नाही. ओबीसींची शिष्यवृत्ती अजूनही लोकांपर्यंत पोचलेली नाही. आदिवासी व मागासवर्गीयांच्या योजना राबविल्या जात नाहीत. आमचे सरकार आल्यानंतर शपथनाम्यातील सगळ्या योजना राबविल्या जातील आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास घडविला जाईल, असे जयंत पाटील म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी