29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeसंपादकीयमहात्मा गांधीच्या विरोधात खरंच ब्राह्मण समाज आहे का? (प्रफुल्ल फडके यांचा विशेष...

महात्मा गांधीच्या विरोधात खरंच ब्राह्मण समाज आहे का? (प्रफुल्ल फडके यांचा विशेष लेख – भाग १)

नथुराममुळे आपली ही अवस्था झाली म्हणून नथुरामचा तिरस्कार गांधीवादी नेते, काँग्रेस जेवढी करत नाही तेवढा तिरस्कार ब्राह्मणांकडून केला जातो. जे नथुरामचे समर्थन करतात त्यांना ना गांधी कळाले ना नथुराम. म्हणूनच महात्मा गांधींचे विचार काय होते आणि त्यावर कोणाचे काय आक्षेप होते याचाही थोडा विचार करावा लागेल.... ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल फडके यांचा विशेष लेख.

विषय तसा नाजूकच आहे. पण गेल्या कित्येक दशकांपासून असे भासवले जाते की, ब्राह्मण समाज हा महात्मा गांधींच्या विरोधात आहे, होता. पण वस्तुस्थिती अगदी वेगळी आहे, त्यासाठी बरेच खोलात जावे लागेल. कोणा एका नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली आणि त्यानंतर दंगली उसळल्या आणि नथुराम गोडसे ब्राह्मण समाजातील होता म्हणून समस्त ब्राह्मणांना दोषी मानून जाळपोळ करून त्यांना देशोधडीला लावले गेले हा झाला इतिहास. अर्थात त्यामुळे असा अर्थ होत नाही की ब्राह्मण समाज नथुरामप्रेमी झाला आणि गांधीद्वेषी झाला. उलट नथुराममुळे आपली ही अवस्था झाली म्हणून नथुरामचा तिरस्कार गांधीवादी नेते, काँग्रेस जेवढी करत नाही तेवढा तिरस्कार ब्राह्मणांकडून केला जातो. जे नथुरामचे समर्थन करतात त्यांना ना गांधी कळाले ना नथुराम. म्हणूनच महात्मा गांधींचे विचार काय होते आणि त्यावर कोणाचे काय आक्षेप होते याचाही थोडा विचार करावा लागेल. पण कोणताही हल्लेखोर, दहशतावादी, अतिरेकी याला ना धर्म असतो ना जात असते. त्याची ओळख ही दहशतवादी, मारेकरी, खुनी अशीच असते.

Mahatma Gandhi and Brahmins not against due to Nathuram Godse
ब्राह्मण समाज नथूराम गोडसेचा तिरस्कार करतो

गांधी हत्येनंतर सहा वर्षांनी एक हिंदी चित्रपट आला होता. ‘जागृती’ हे त्या चित्रपटाचे नाव. हेमंतकुमार यांनी संगीत दिलेल्या या चित्रपटात अभी भट्टाचार्य यांच्यासह अनेक बंगाली कलाकार होते. पण या प्रचंड गाजलेल्या चित्रपटातील एक गीत दरवर्षी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि राष्ट्रीय सणांना लावले जाते. ते गाणे म्हणजे, ‘दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल.’

हे सुद्धा वाचा

महात्मा गांधी; पंडित नेहरूंना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केल्याशिवाय आपला एकही दिवस जात नाही, हे देशाचे दुर्दैव; भाग १ (राजदीप सरदेसाई यांचा विशेष लेख)

सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते सरदार पटेल,महात्मा गांधी यांच्या पत्रव्यवहारावरील ग्रंथ प्रकाशित

विश्वगुरू होण्यासाठी गांधी-नेहरूंची बदनामी – पूर्वार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)

गांधी; नेहरू यांच्यामुळे देशाचे भलेच झाले; उत्तरार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)

हे गाणे वरकरणी देशभक्ती गीत वाटत असले तरी ते प्रत्यक्षात दुही माजवणारे आहे. इथे गांधीविरोधात माथी भडकवणारी पार्श्वभूमी तयार झाली. बिना खड्ग, बिना ढाल हे स्वातंत्र्य मिळाले? फक्त महात्मा गांधींमुळे मिळाले? उपोषण, सत्याग्रह करून मिळाले? मग देशासाठी रक्त सांडणारे, हसत हसत फासावर जाणारे ते लोक कोणासाठी लढले? स्वातंत्र्यासाठी त्यांचे योगदान नाही का? ब्रिटिशांच्या गोळ्या छातीवर झेलून मरणारे, रक्त सांडणारे कोण होते? जालियनवाला बागेत मृत्युमुखी पडणारे कोण होते? हे सर्व जण स्वातंत्र्यासाठीच लढले ना? मग खड्ग बिना ढाल स्वातंत्र्य मिळाले हे कसे काय आपण म्हणू शकतो? या हजारो लोकांनी सांडलेल्या रक्ताला काहीच किंमत नव्हती का ? यात फासावर जाणारे कित्येक जण कोवळे तरुण होते.

Mahatma Gandhi and Brahmins not against due to Nathuram Godse
साने गुरूजी हे महात्मा गांधी यांचे अनुयायी होते

नीट पाहा- लाला लजपतराय, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू, उधमसिंग यांच्यापासून ते उमाजी नाईक यांच्यापर्यंत फासावर गेलेले नेते देशासाठी गेले होते. ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्यासाठीच त्यांनी बलिदान दिले होते. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सोसलेले हाल हे कसे विसरता येतील ? त्यांचे योगदान कसे विसरून चालेल? १८५७चा उठाव कसा विसरून चालेल? त्यामुळे हजारो, लाखो लोकांनी रक्त सांडले त्याकडे दुर्लक्ष करायचे आणि महात्मा गांधींच्या उपोषणाने, सत्याग्रहाने रक्त न सांडता, हातात शस्त्र न घेता ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिले हा खोटा इतिहास लादणे आणि त्यासाठी एका प्रभावी माध्यमाचा वापर करणे हा खरा आक्षेप आहे. इथून समाजात दुही माजवण्याचे काम सुरू झाले.

ब्राह्मण समाज हा महात्मा गांधींविरोधात, त्यांच्या विचारांविरोधात असूच शकत नाही. कारण महात्मा गांधी भारतात आले त्यावेळी त्यांचे वय ४५ इतके होते. त्यांना भारत काय आहे हे तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष गोपाळ कृष्ण गोखले यांनी सांगितले होते. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरू होते. त्यांना मार्ग दाखवणारे हे गोखले होते. महात्मा गांधींचे वारसदार म्हटले तर आचार्य विनोबा भावे होते. त्यांच्याप्रमाणेच साने गुरुजी होते. हे सगळे गांधी विचार सर्वत्र रुजवत होते. हे सगळे ब्राह्मणच होते. त्यामुळे गांधींना दिशा दाखवण्यापासून त्यांचा विचार पुढे नेणाऱ्यांमध्ये ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणात असताना ब्राह्मणांना गांधीविरोधी कसे ठरवले गेले? त्यामुळे जात आणि धर्म सोडून हा एक विचारा विचारातील फरक होता, लढा होता असे म्हणावे लागेल किंवा विचारा अविचारातील लढा म्हणावे लागेल.

‘गांधी – नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?’ या नावाने ‘लय भारी’ने नुकताच एक विशेषांक प्रसिद्ध केला आहे. या अंकात राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रातील ४५ पेक्षा जास्त नामवंत मान्यवरांनी लेख लिहिले आहेत. यांत शरद पवार, राजदीप सरदेसाई, भाऊ तोरसेकर, श्रीराम पवार, यशवंतराव गडाख, तुषार गांधी, राजू परूळेकर, प्रा. एन. जी. राजूरकर, कुमार सप्तर्षी, अशोक चौसाळकर, संजय आवटे, श्रीमंत माने, राजेंद्र साठे, अतुल भातखळकर, माधव भांडारी, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार, सत्यजित तांबे, चंद्रकांत दळवी, प्रभाकर देशमुख, प्रसाद काथे, बंधुराज लोणे, प्रमोद चुंचूवार, रफिक मुल्ला, प्रफुल्ल फडके, राजन वेळूकर, नाना पटोले, उल्हास पवार, प्रफुल्ल फडकेत, विश्वास काश्यप, राज कुलकर्णी, राजेश खरात आदींचा समावेश आहे. या अंकातील निवडक लेख आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. हा विशेषांक खरेदी करण्यासाठी संपादक श्री. तुषार खरात यांच्याशी ९८२१२८८६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

(प्रफुल्ल फडके हे ज्येष्ठ पत्रकार असून सध्या ते मुंबई चौफेर या दैनिकाचे संपादक आहेत)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी