31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्रमहात्मा गांधी - पंडित नेहरूंना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केल्याशिवाय आपला एकही दिवस...

महात्मा गांधी – पंडित नेहरूंना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केल्याशिवाय आपला एकही दिवस जात नाही, हे देशाचे दुर्दैव – भाग १ (राजदीप सरदेसाई यांचा विशेष लेख)

'गांधी - नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?' या नावाने 'लय भारी'ने नुकताच एक विशेषांक प्रसिद्ध केला आहे. या अंकात राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रातील ४५ पेक्षा जास्त नामवंत मान्यवरांनी लेख लिहिले आहेत. यांत शरद पवार, राजदीप सरदेसाई, भाऊ तोरसेकर, श्रीराम पवार, यशवंतराव गडाख, तुषार गांधी, राजू परूळेकर, प्रा. एन. जी. राजूरकर, कुमार सप्तर्षी, अशोक चौसाळकर, संजय आवटे, श्रीमंत माने, राजेंद्र साठे, अतुल भातखळकर, माधव भांडारी, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार, सत्यजित तांबे, चंद्रकांत दळवी, प्रभाकर देशमुख, प्रसाद काथे, बंधुराज लोणे, प्रमोद चुंचूवार, रफिक मुल्ला, प्रफुल्ल फडके, राजन वेळूकर, नाना पटोले, उल्हास पवार, , विश्वास काश्यप, राज कुलकर्णी, राजेश खरात आदींचा समावेश आहे. या अंकातील निवडक लेख आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. हा विशेषांक खरेदी करण्यासाठी संपादक श्री. तुषार खरात यांच्याशी ९८२१२८८६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

महात्मा गांधी बॅरिस्टर होते आणि पंडित जवाहरलाल नेहरूदेखील श्रीमंत घरात जन्माला आले होते. ठरवले असते तर या दोन्ही नेत्यांनी सुखात आयुष्य घालवले असते. मात्र, तसे न करता दोघांनीही स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली, दोघांनीही अनेकदा तुरुंगवास भोगला, इंग्रजांचा लाठीहल्ला सहन केला. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान बनले तर स्वातंत्र्यानंतर अवघ्या चार महिन्यांत म्हणजे ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे या अतिरेकी वृत्तीच्या माथेफिरूने हत्या केली. पण या हत्येला वध म्हणणारी मंडळीही या देशात आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत, तरी काही मंडळींचा गांधी-नेहरूंना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केल्याशिवाय एकही दिवस जात नाही, यापेक्षा दुर्दैव ते कोणते?

Mahatma Gandhi Pandit Jawaharlal Nehru article by Rajdeep Sardesai
या विशेषांकात देशभरातील मान्यवरांनी लेख लिहिले आहेत

हल्ली सरसकट महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना दोष देण्याचे फॅड सुरू झाले आहे. कुणीही येतो आणि गांधी-नेहरूंवर चिखलफेक करतो. देश स्वतंत्र होऊन आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशाच्या स्वातंत्र्यांच्या या अमृतमहोत्सवी वर्षात जर आपण आजही गांधी-नेहरूंना दोष देत असू तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच. कारण एक गोष्ट आपण विसरू शकत नाही ती म्हणजे स्वातंत्र्यलढ्यात या मंडळींनी स्वत:ला कुटुंबासहीत झोकून दिले होते. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या मंडळींनी स्वत:साठी काही घेतलेही नाही. मग ते गांधी असोत, नेहरू असोत, टिळक असोत, नेताजी सुभाषबाबू असोत किंवा सरदार पटेल असोत. अशा हजारो स्वातंत्र्यसैनिकांची नावे आपण घेऊ शकतो ज्यांनी आपले आयुष्य देशासाठी वेचले आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांनी सांगितले, गांधी; नेहरू यांचे महात्म्य

विश्वगुरू होण्यासाठी गांधी-नेहरूंची बदनामी; पूर्वार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)

गांधी- नेहरू यांच्यामुळे देशाचे भलेच झाले; उत्तरार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)

स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली आहेत. आज आपल्या देशाकडे सर्व काही आहे. मात्र त्याचा पाया कुणी रचला, कोणत्या परिस्थितीत रचला हे सर्वांनी ध्यानात घ्यायला हवे. देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताची नव्याने बांधणी करण्याचे मोठे आव्हान तत्कालीन नेत्यांसमोर होते. मग त्यात गांधी होते. नेहरू होते. सरदार पटेल होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते, मौलाना आझाद होते आणि त्यांच्यासारख्या अनेक नेत्यांची नावे घेता येतील. या आधी राजेशाही, संस्थाने यांच्यातच रमलेला आपला भारत देश स्वातंत्र्यलढ्याच्या निमित्ताने एकवटला होता. त्यामुळे देशउभारणीसाठी भक्कम पाया बांधण्याचे आव्हान तत्कालीन नेत्यांसमोर होते. इंग्रजांच्या गुलामगिरीतून सुटलो पण पुढे कुणाच्याही गुलामगिरीत राहण्याची वेळ येऊ नये, ही काळजी नेत्यांना घ्यावी लागणार होती. देशात लोकशाही रुजवण्याची पहिली आणि मोठी जबाबदारी या नेत्यांवर होतीच. शिवाय

Mahatma Gandhi Pandit Jawaharlal Nehru article by Rajdeep Sardesai
महात्मा गांधी यांच्या थोर कार्यामुळे संयुक्त राष्ट्र संघात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे

संरक्षणावर लक्ष देणे, देशाच्या विकासासाठी धरणे बांधणे, रस्तेनिर्मिती करणे ही आव्हानेही त्यांच्या समोर होती. मुख्य म्हणजे शिक्षण तळागाळात पोहोचविण्याचे आव्हान होते. त्यावेळी निरक्षरता अफाट होती. स्वत:ची मजबूत अर्थव्यवस्था निर्माण करणे हेसुद्धा मोठे आव्हान होते. अशी शेकडो आव्हाने देशासमोर होती. त्यामुळे त्या परिस्थितीत निर्णय घेतले गेले. काही निर्णय योग्य होते. काही निर्णय घेताना चूक झाली. पण याचा अर्थ त्या नेत्यांनी देशाला नुकसानीच्या खाईत लोटले, देश बरबाद केला असा मुळीच होत नाही.

Mahatma Gandhi Pandit Jawaharlal Nehru article by Rajdeep Sardesai

गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्यात देशवासीयांना एकत्र आणले. गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील भूमिकेमुळे आंदोलनात महिलांचा सहभाग प्रचंड वाढला. स्वातंत्र्याची लढाई तळागाळापर्यंत पोहोचविण्यात गांधीजींचा वाटा खूप मोठा होता. नेहरूंनी स्वातंत्र्याच्या लढ्यात आयुष्य झोकून दिले, अनेकदा तुरुंगात गेले. तुरुंगातच त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’सारख्या पुस्तकाचे लेखन केले. टिळकांनी त्यांच्या तुरुंगवासात ‘गीतारहस्य’ नावाचा ग्रंथ लिहिला. गांधी आणि नेहरूंनी ठरवले असते तर ते सुखाचे आयुष्य जगू शकले असते, मात्र त्यांनी तसे केले नाही.

Mahatma Gandhi Pandit Jawaharlal Nehru article by Rajdeep Sardesai
महात्मा गांधी यांचा अमेरिकेतही पुतळा उभारण्यात आला आहे

पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंची कामगिरी उजवीच म्हणावी लागेल. आज आपण २१व्या शतकात आहोत. इंटरनेटमुळे आपला प्रवास ‘ग्लोबल टू लोकल’ असा होत आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर म्हणजेच सोशल मीडियाच्या माध्यमातून क्षणार्धात कुठूनही पाठवलेला मेसेज कुठेही पोहोचवू शकतो. हातातील मोबाईलने क्रांती घडवली आहे. पण स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात शेजारच्या गावातील माणसाशीही संपर्क साधणे अवघड होते. अशा काळात स्वातंत्र्याची ठिणगी संपूर्ण देशात पेटवणे किती अवघड होते, याची नुसती कल्पना करा. नेते देशात आंदोलने करायचे, सत्याग्रह करायचे, इंग्रजांच्या गोळ्या झेलायचे आणि लाठीहल्ला सहन करायचे. याचे फळ म्हणून आपण काय करतो तर स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर एका झटक्यात त्या नेत्यांनी नुकसान केले, असे म्हणून मोकळे होतो. हे खरेच योग्य आहे का, याचा विचार भारतीयांनी करायची वेळ आहे.

(राजदीप सरदेसाई हे राष्ट्रीय पातळीवरील आघाडीचे पत्रकार आहेत आणि इंडिया टूडे वृत्तवाहिनीचे सल्लागार संपादक आहेत.)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी