आपण गांधी आणि आंबेडकर यांच्यातही भांडण लावतो. त्या काळात सर्वांचे लक्ष्य देश स्वतंत्र करण्याचे होते. मात्र, त्यासाठीचे त्यांचे मार्ग वेगवेगळे होते. म्हणजेच नेत्यांच्या राजकीय विचारात भिन्नता होती. तरीही ते एकमेकांचे शत्रू नव्हते. हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. संविधान बनवताना डॉ. आंबेडकर हवेतच, अशी गांधीजींची भूमिका होती. पहिल्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी असोत किंवा डॉ. आंबेडकर, त्यांना स्थान हवेच, अशी भूमिका गांधीजींनी घेतली होती. त्या त्या काळात परिस्थितीनुसार मतभेद झाले म्हणजे संबंधित नेत्यांना आपण दोषी ठरवायचेच का? याचा आजच्या काळात सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे.

पंतप्रधान बनवताना गांधीजींनी जाणूनबुजून सरदार पटेलांना डावलले, असाही एक अपप्रचार केला जातो. तत्कालीन परिस्थिती पाहिली तर तेव्हा नेहरू तरुण होते. त्यांचा आवाका मोठा होता. नेहरू सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते होते. सरदार वल्लभभाई पटेलदेखील मोठे नेते होते, परंतु त्यांची प्रकृती बरी नसायची. अशावेळी एका नव्या देशाची धुरा एका धडाडीच्या युवा नेत्याकडे द्यायचा गांधीजींचा निर्णय चुकीचा कसा म्हणता येईल? बरे गांधीजींच्या या निर्णयाला सरदार पटेल यांनी संमती दिली.
हे सुद्धा वाचा
विश्वगुरू होण्यासाठी गांधी-नेहरूंची बदनामी; पूर्वार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)
गांधी – नेहरू यांच्यामुळे देशाचे भलेच झाले ; उत्तरार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)
तेव्हा वाद नव्हता. पण आपण आता नवीन वादाला जन्म देऊ लागलो आहोत. सरदार पटेल यांनीही गृहमंत्री म्हणून कधी मुत्सद्देगिरी आणि काही प्रसंगी कठोर होत संस्थाने भारतात कशी विलीन केली, हेही आपण जाणतोच. मग गांधी विरुद्ध पटेल, नेहरू विरुद्ध पटेल, गांधी विरुद्ध आंबेडकर, नेहरू विरुद्ध बोस हे सगळे आपण का करत आहोत, असा प्रश्न आपणच आपल्याला विचारायला हवा.

नेहरू विरुद्ध नेताजी सुभाषचंद्र बोस असा वाद निर्माण करणाऱ्या किती जणांना माहीत आहे की, आझाद हिंद फौजेत नेताजी बोस यांनी नेहरूंच्या नावाची एक बटालियन निर्माण केली होती. हे सगळे जाणून न घेता आपण काय करतो दोन मोठ्या नेत्यांना एकमेकांविरुद्ध उभे करतो. त्यांची एकमेकांत तुलना करतो. नेहरू आणि बोस यांच्यात राजकीय मतभिन्नता होती, मात्र दोघांचे ध्येय एकच आहे, याची जाणीवदेखील त्यांना होती. नेमकी हीच बाब आपण लक्षात घेत नाही. वास्तविक स्वातंत्र्यलढ्याचे श्रेय कुणा एका नेत्याला नाही तर सर्वांना द्यायला हवे. पण काँग्रेसने देशावर ५० वर्षे राज्य केले. त्या काळात त्यांनी इतर नेत्यांना फारसे महत्त्व दिले नाही, हे वास्तवदेखील स्वीकारावे लागेल.
अखंड भारताच्या स्वप्नाचे काय?
अखंड भारत म्हणणे सोपे आहे. ज्यावेळी फाळणी झाली तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आजच्या स्थितीत भारतातील मुस्लिमांना सांभाळणे तुम्हाला कठीण होत आहे, तर अखंड भारतातील मुस्लिमांना कसे सांभाळले असते? इथे मुसलमानांच्या विरोधात द्वेष पसरवला जातो. अखंड भारत असता तर दुप्पट लोकसंख्येच्या मुस्लिमांविरोधात कसा व्यवहार केला असता? अखंड भारत ही फक्त घोषणा आहे. मणिपूरमधील स्थिती पाच महिन्यांनंतरही सुधारू शकत नाही, मग उगाचच अखंड भारताच्या गप्पा का करता? भारत-पाकिस्तान फाळणीशी कुणीही सहमत होणार नाही, पण इतिहासात डोकावले तर ते गरजेचे होते, हे लक्षात येते.
(राजदीप सरदेसाई हे राष्ट्रीय पातळीवरील आघाडीचे पत्रकार आहेत आणि इंडिया टूडे वृत्तवाहिनीचे सल्लागार संपादक आहेत.)