28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeसंपादकीयमहात्मा गांधी आणि केशव हेडगेवार यांच्यातील नातेसंबंध (प्रफुल्ल फडके यांचा लेख -...

महात्मा गांधी आणि केशव हेडगेवार यांच्यातील नातेसंबंध (प्रफुल्ल फडके यांचा लेख – भाग २)

डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार यांनी काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच संपूर्ण स्वातंत्र्य हे ध्येय ठरवण्याचा प्रस्ताव मांडला, पण तो मंजूर झाला नाही. १९२१ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या असहकार आंदोलनादरम्यान सत्याग्रह केला आणि त्यांना अटक करून एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. तोपर्यंत ते इतके लोकप्रिय झाले होते की, त्यांच्या सुटकेवर त्यांचे स्वागत करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेला पंडित मोतीलाल नेहरू आणि हकीम अजमल खा यांसारख्या दिग्गजांनी संबोधित केले होते... ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल फडके यांचा विशेष लेख

आता महात्मा गांधींचे विचार आणि त्यावर असणारे आक्षेप याकडे जरा नजर मारू या. पण हे लक्षात घेताना गांधी विचारांच्या बाजूने ब्राह्मणेतर आहेत आणि आक्षेप घेणारे ब्राह्मण आहेत असा अविचार कोणी करू नये, कारण लोकशाहीच्या, भारतीय राजकारणात गांधीयुगानंतर काँग्रेस, समाजवादी विचारसरणीत अनेक ब्राह्मण नेते होऊन गेले आहेत. ज्यांनी महात्मा गांधींचा विचार कायम जपला. वानगीदाखल नावे सांगायची तर काकासाहेब गाडगीळ, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, जयंतराव टिळक, ना. ग. गोरे, जगन्नाथराव जोशी, एस. एम. जोशी अशा अनेकांची देता येतील. म्हणून यामध्ये फक्त विचार आणि आक्षेप याबाबत बघायला पाहिजे, जातीचा चष्मा लावून बघायला नको. गांधी हत्येनंतर त्यांचा चष्मा हरवला होता असे काही जण सांगतात. कमल हासनने २४ वर्षापूर्वी एक चित्रपट काढला होता, ‘हे राम’ नावाचा. त्यातही हा कथाभाग घेतला होता. पण कदाचित गांधीजींचा तो चष्मा हरवला आणि नंतर कोणीतरी त्या जागी जातीयतेचा चष्मा ठेवला असावा, त्याचे परिणाम आज दिसत आहेत.

Mahatma Gandhi And Keshav Hedgewar relation
‘गांधी – नेहरू यांनी देशांचं खरंच नुकसान केलं का ?’ हा विशेषांक खरेदी करण्यासाठी संपादक श्री. तुषार खरात यांच्याशी ९८२१२८८६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा

महात्मा गांधींनी आयुष्यभर अहिंसेचा प्रसार आणि प्रचार केला. हा विचार रुजवला. पण त्यांचीच हिंसा व्हावी, हत्या व्हावी हा सगळ्यात मोठा त्यांच्या विचारांचा पराभव होता. त्यामुळे ही हत्या महात्मा गांधींची नव्हती तर विचाराची हत्या करण्याचा प्रयोग होता. पण विचार कधीच मरत नसतात, हे गांधी विरोधकांनी लक्षात घेतले पाहिजे.

थोडेसे पूर्वार्धात डोकावावे लागेल. १८८५ला काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर सर्वच भारतीयांनी काँग्रेसला जवळ केले होते. कारण ब्रिटिशांची सत्ता तहहयात भारतात राहाणार हे गृहीत धरून ब्रिटिश लोकशाहीत ज्याप्रमाणे हुजूर मजूर असे दोन पक्ष आहेत. त्याप्रमाणे भारतीय संसदेतही प्रबळ विरोधी पक्ष असला पाहिजे या हेतूने ब्रिटिशांच्या मदतीने काँग्रेसची स्थापना झाली हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे स्वातंत्र्यासाठी काँग्रेसची स्थापना नाही, तर ब्रिटिशांविरोधात विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्यासाठी, आपली बाजू मांडण्यासाठी लोकशाही मार्गाने काँग्रेस स्थापन झालेली होती. म्हणूनच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा ब्रिटिश सत्तेविरोधातील पक्ष असल्याने तो विसर्जित करावा असे महात्मा गांधींनी सांगितले होते. पण पंडित नेहरूंनी ते ऐकले नाही आणि तीच काँग्रेस पुढे चालवली आणि विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्ष म्हणून काँग्रेस शिल्लक ठेवली. याचा अर्थ काँग्रेसच्या दृष्टीने ते स्वातंत्र्य नसावे तर ते सत्तांतर होते. पण ब्रिटिशांचा सर्वात पहिला विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस स्थापन झालेली होती हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे.

हे सुद्धा वाचा

महात्मा गांधीच्या विरोधात खरंच ब्राह्मण समाज आहे का? (प्रफुल्ल फडके यांचा विशेष लेख – भाग १)

महात्मा गांधी; पंडित नेहरूंना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केल्याशिवाय आपला एकही दिवस जात नाही, हे देशाचे दुर्दैव; भाग १ (राजदीप सरदेसाई यांचा विशेष लेख)

विश्वगुरू होण्यासाठी गांधी-नेहरूंची बदनामी; पूर्वार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)

गांधी – नेहरू यांच्यामुळे देशाचे भलेच झाले; उत्तरार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)

त्यानंतर या देशात जे काही पक्ष तयार झाले, संघटना तयार झाल्या त्या सगळ्या काँग्रेसमधून फुटून किंवा गोडीने बाहेर पडून तयार झालेल्या संघटना आणि पक्ष आहेत. या सर्व पक्षांची नाळ ही काँग्रेसशीच जोडलेली आहे. यात पहिल्या दोन विचारधारा तयार झाल्या त्या काँग्रेसमधील जहाल आणि मवाळ मतवाद्यांचा गट. पण यामध्ये जहालमध्ये सर्वाधिक ब्राह्मण असले तरीही मवाळांमध्येही आगरकर, गोखले, न्या. रानडे यांच्यासारखे प्रभावी ब्राह्मण होते. त्यामुळे या काळातही ब्राह्मण कधीच काँग्रेस किंवा गांधींविरोधातील नव्हते, तर ते दोन विचार होते.

यानंतर अनेक पक्ष तयार झाले जे मूळचे काँग्रेस प्रवाहातील होते. यात मुस्लीम लीग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शेतकरी कामगार संघ नंतर याचे नाव शेकाप झाले. पण हे काँग्रेसमधून बाहेर पडलेले पक्ष आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बीजेही काँग्रेसशी जोडलेली आहेत. डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक होते. त्यांच्यात बालपणापासूनच क्रांतिकारी प्रवृत्ती होती आणि ते ब्रिटिश राज्यकर्त्यांचा द्वेष करत होते. शाळेत शिकत असताना, जेव्हा ब्रिटिश इन्स्पेक्टर शाळेची पाहणी करण्यासाठी आला तेव्हा केशवराव आणि त्यांच्या काही वर्गमित्रांनी ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देऊन त्यांचे स्वागत केले, ज्यामुळे ते नाराज झाले आणि त्यांच्या आदेशानुसार केशवरावांना शाळेतून काढून टाकण्यात आले. १९१० मध्ये, ते कलकत्ता येथे वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी गेले, तेव्हा ते देशातील प्रसिद्ध क्रांतिकारी संघटना अनुशीलन समितीमध्ये सामील झाले. १९१५ मध्ये नागपुरात परतल्यावर ते काँग्रेसमध्ये सक्रिय झाले आणि काही काळानंतर ते विदर्भ प्रांतीय काँग्रेसचे सचिव झाले. म्हणजे ज्या सुमारास महात्मा गांधी काँग्रेसमध्ये आले तेव्हाच हेडगेवार आले होते. १९२० मध्ये नागपुरात काँग्रेसचे देशस्तरीय अधिवेशन झाले तेव्हा डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार यांनी काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच संपूर्ण स्वातंत्र्य हे ध्येय ठरवण्याचा प्रस्ताव मांडला, पण तो मंजूर झाला नाही. १९२१ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या असहकार आंदोलनादरम्यान सत्याग्रह केला आणि त्यांना अटक करून एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. तोपर्यंत ते इतके लोकप्रिय झाले होते की, त्यांच्या सुटकेवर त्यांचे स्वागत करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेला पंडित मोतीलाल नेहरू आणि हकीम अजमल खा यांसारख्या दिग्गजांनी संबोधित केले होते. हा इतिहास जर उद्धव ठाकरे यांनी वाचला तर ते पुन्हा कोणत्याही सभेत संघाचा स्वातंत्र्याशी संबंध काय, असा पोरकट प्रश्न विचारणार नाहीत.

काँग्रेसमधील हेडगेवार यांचा पूर्ण सहभाग आणि कारागृहात त्यांना आलेले अनुभव यामुळे समाजात जी एकात्मता आणि देशप्रेमाची भावना पुसट होत चालली होती, ज्याच्यामुळे आपण परावलंबी झालो आहोत, ती जागृत आणि पुनरुज्जीवित होऊ शकेल, असा विचार त्यांच्या मनात निर्माण झाला. काँग्रेसचे जनआंदोलन होऊ शकत नाही. लोकांच्या व्यवस्थेच्या अधीनतेविरुद्ध बंडाची भावना जागृत करण्याचे कार्य नि:संशयपणे चालू राहिले पाहिजे. परंतु राष्ट्रीय जीवनात खोलवर रुजलेली विघटनशील प्रवृत्ती दूर करण्यासाठी काही वेगळ्या उपाययोजनांची आवश्यकता आहे. डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार यांच्या या चिंतनाचा आणि विचारमंथनाचा परिणाम म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या संस्कारशाळेच्या रूपाने शाखा प्रणालीची स्थापना. जी दिसायला साधी होती पण निकालात चमत्कारिक ठरली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा दिला. यामुळेच डिसेंबर १९३० मध्ये महात्मा गांधींनी मीठ कायदा विरोधी चळवळ सुरू केली. तेव्हा त्यांनी संघप्रमुख (सरसंघचालक)ची जबाबदारी डॉ. पराजपे यांच्याकडे सोपवली आणि त्यांच्या डझनभर सहकाऱ्यांसह वैयक्तिकरीत्या सहभागी झाले, ज्यात त्यांनी तुरुंगवास भोगला. त्याचप्रमाणे १९२९ साली लाहोर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात जेव्हा पूर्व स्वराज्याचा ठराव मंजूर करण्यात आला आणि २६ जानेवारी १९३० रोजी देशभर तिरंगा फडकावण्याची हाक देण्यात आली. तेव्हा डॉ. हेडगेवार यांच्या सूचनेनुसार संपूर्ण देशभर ३० जानेवारीला संघाच्या सर्व शाखांमध्ये तिरंगा फडकावून स्वराज्य प्राप्त झाले. यावरून संघ आणि काँग्रेस यांचे नाते समजून घेतले पाहिजे. त्यामुळे मूळच्या काँग्रेसमधून बाहेर पडलेले अनेक विचार म्हणजे विविध पक्ष आहेत.

‘गांधी – नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?’ या नावाने ‘लय भारी’ने नुकताच एक विशेषांक प्रसिद्ध केला आहे. या अंकात राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रातील ४५ पेक्षा जास्त नामवंत मान्यवरांनी लेख लिहिले आहेत. यांत शरद पवार, राजदीप सरदेसाई, भाऊ तोरसेकर, श्रीराम पवार, यशवंतराव गडाख, तुषार गांधी, राजू परूळेकर, प्रा. एन. जी. राजूरकर, कुमार सप्तर्षी, अशोक चौसाळकर, संजय आवटे, श्रीमंत माने, राजेंद्र साठे, अतुल भातखळकर, माधव भांडारी, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार, सत्यजित तांबे, चंद्रकांत दळवी, प्रभाकर देशमुख, प्रसाद काथे, बंधुराज लोणे, प्रमोद चुंचूवार, रफिक मुल्ला, प्रफुल्ल फडके, राजन वेळूकर, नाना पटोले, उल्हास पवार, , विश्वास काश्यप, राज कुलकर्णी, राजेश खरात आदींचा समावेश आहे. या अंकातील निवडक लेख आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. हा विशेषांक खरेदी करण्यासाठी संपादक श्री. तुषार खरात यांच्याशी ९८२१२८८६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी