33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयनथुराम गोडसे कुणाचा हीरो? (राजदीप सरदेसाई यांचा विशेष लेख - भाग ३)

नथुराम गोडसे कुणाचा हीरो? (राजदीप सरदेसाई यांचा विशेष लेख – भाग ३)

आता हिंदुत्वाची राजकीय विचारधारा पुढे आली आहे. म्हणून ‘ते’ म्हणतात नथुराम गोडसे हीरो आहे, कारण त्यांच्याकडे दुसरे हीरो नाहीत. जगभरातील नेते येतात तेव्हा त्यांना राजघाटावर महात्मा गांधीजींच्या स्मृतिस्थळावर नेले जाते तेव्हा जगाला दाखवायला गांधी ब्रँड वापरला जातो. आणि यांचेच कार्यकर्ते गोडसेच्या वाढदिवसाला सेलिब्रेशन करतात.... ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचा विशेष लेख

महात्मा गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेला हीरो ठरवण्याचा प्रयत्न कोण करतोय? गांधीजींच्या काळात काही मंडळींची जी मानसिकता होती, तीच मानसिकता आजही आहे. पण ही लोकांची भावना. द्वेष पसरवणे खूप सोपे. मात्र प्रेम वाटणे खूप अवघड आहे. नथुराम गोडसेची मानसिकता मुळात द्वेषाची होती. त्याच्यात गांधीजींविरोधात द्वेषाची भावना होती. आता हिंदुत्वाची राजकीय विचारधारा पुढे आली आहे. म्हणून ‘ते’ म्हणतात नथुराम गोडसे हीरो आहे, कारण त्यांच्याकडे दुसरे हीरो नाहीत.

Nathuram Godse Killed Mahatma Gandhi How he Became Hero
सरदार वल्लभभाई पटेल वयोवृद्ध झाले होते. पंडित नेहरू तरूण होते. त्यामुळे महात्मा गांधी यांनी पंतप्रधानपदासाठी नेहरूंचे नाव पुढे केले, यात चुकीचे ते काय ?

गंमत पाहा, जगभरातील नेते येतात तेव्हा त्यांना राजघाटावर महात्मा गांधीजींच्या स्मृतिस्थळावर नेले जाते. तेव्हा जगाला दाखवायला गांधी ब्रँड वापरला जातो आणि यांचेच कार्यकर्ते गोडसेच्या वाढदिवसाला सेलिब्रेशन करतात. गांधीजींच्या मारेकऱ्यांचा तुम्ही सोशल मीडियावर उदोउदो करता आणि जगभरातील नेत्यांना गांधीजींच्या स्मृतिस्थळावर घेऊन जाता, हा शुद्ध ढोंगीपणा नाही का?

हे सुद्धा वाचा

महात्मा गांधी – पंडित नेहरूंना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केल्याशिवाय आपला एकही दिवस जात नाही, हे देशाचे दुर्दैव; भाग १ (राजदीप सरदेसाई यांचा विशेष लेख)

विश्वगुरू होण्यासाठी गांधी-नेहरूंची बदनामी; पूर्वार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)

गांधी – नेहरू यांच्यामुळे देशाचे भलेच झाले; उत्तरार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)

चीनबाबत नेहरूंचे धोरण किती योग्य?

चीनबाबत नेहरूंचे धोरण चुकले हे वास्तव आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर चीनने १५ वर्षांतच भारतावर हल्ला केला. त्यावेळी भारत आजच्या इतका शस्त्रसज्ज नव्हता. शिवाय चीनबाबत भारताचे तत्कालीन परराष्ट्र धोरण चुकलेच, हे मान्य करावे लागेल. नेहरूंच्या कामगिरीबाबत जेव्हा मूल्यमापन केले जाईल तेव्हा त्यांना चीनबाबतच्या धोरणाबद्दल उणे गुण दिले जातील. पण आता त्याला ६० वर्षे झाली आहेत. या ६० वर्षांत तुम्ही काय केलेत. सर्व दोष पंडित नेहरूंवर टाकून तुम्ही बाजूला होऊ शकत नाही. आणि पुढे ५० वर्षांनी मोदींच्या कार्याचेही मूल्यमापन होईल. त्यांनी काही चांगले निर्णय घेतले त्याचे कौतुक होईल आणि चुकीच्या निर्णयावर टीकादेखील होईल.

Nathuram Godse Killed Mahatma Gandhi How he Became Hero
भारत – पाकिस्तान फाळणीमुळे अनेक कुटुंबे उद्वस्त झाली. ही फाळणी रोखण्यासाठी महात्मा गांधी यांनी अटोकाट प्रयत्न केले

इंदिरा गांधींच्या काळात काय घडले?

इंदिरा गांधींनी खूप चुका केल्या. त्यांनी नेहरूंचे साम्यवाद धोरण कायम ठेवायला नको होते. त्यांनी देशाची अर्थव्यवस्था १९७० नंतर खुली करायला हवी होती जी आपण १९९१ मध्ये केली. आर्थिक धोरणांवर इंदिरा गांधी अपयशी ठरल्या. गरिबी हटवच्या नावाखाली लोक जास्त गरीब झाले. इंदिरा गांधी यांनी लायसन्स राजवर लक्ष केंद्रीय केल्यामुळे उद्योग गेले. नेहरूंच्या काळात साम्यवाद धोरणाला एक कारण होते. देश नवा होता. सार्वजनिक उद्योगांत गुंतवणुकीची, सार्वजनिक उद्योग उभारण्याची गरज होती. तर इंदिरा गांधींना अर्थधोरण सबळ करण्याची संधी होती, ती त्यांनी गमावली.

मात्र भारत-पाकिस्तान युद्ध, बांगलादेशची निर्मिती, टायगर प्रोजेक्ट, पर्यावरणात केलेले काम, ही इंदिरा गांधी यांची कामगिरी कधीही विसरता येणार नाही.

नेहरूंनी घराणेशाही आणली का?

पंडित नेहरुंनी घराणेशाही आणली हादेखील एक अपप्रचार आहे. महत्त्वाचं म्हणजे पंडित नेहरूंनी ना घराणेशाही आणली ना राबवली. पंडित नेहरूंच्या निधनानंतर १९६४ मध्ये लालबहाद्दूर शास्त्री पंतप्रधान झाले. शास्त्रीजींचे १९६६ मध्ये अचानक निधन झाले नसते तर पुढील अनेक वर्षे ते पंतप्रधानपदी राहिले असते. शास्त्रीजींनंतर काँग्रेसने इंदिरा गांधींना पंतप्रधान बनवले. इंदिरा गांधी या माझ्या वारसदार आहेत, असे जवाहरलाल नेहरूंनी कधीही, कुठेही सांगितले नव्हते किंवा तशा पद्धतीने इंदिरा गांधींना त्यांनी कधीही पुढेही आणले नाही.

Nathuram Godse Killed Mahatma Gandhi How he Became Hero
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरने महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांचा नेहमीच अपप्रचार केला आहे

आणीबाणी – तेव्हाची आणि आजची

इंदिरा गांधींच्या काळात विशेषकरून आणीबाणीच्या काळात न्यायालय आणि माध्यमे अशा दोन स्तंभांना मोठा धक्का देण्यात आला होता. पण इंदिरा गांधींनी तेव्हा जे केले तेच तुम्ही आज माध्यमांना लक्ष्य करून करणार आहात का? तेव्हा इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी अधिकृत होती, पण आज आणीबाणी नसताना माध्यमांना मोकळेपणाने काम करू दिले जाते का? की माध्यमे नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत? याचाही विचार व्हायलाच हवा.

दरवेळी गांधी-नेहरूंना दोष देण्याने काहीच होणार नाही, कारण तत्कालीन परिस्थितीनुसार त्यांनी निर्णय घेतले होते. विशेष म्हणजे निर्णय घेताना या किंवा स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेत्यांनी कधीही स्वार्थी हेतू डोळ्यासमोर ठेवला नव्हता. त्यामुळे गांधी-नेहरू यांनी देशाचे खरेच नुकसान केले का? यात कोणत्या परिस्थितीत निर्णय घेतले, त्यावेळी कोणती साधने होती, कोणते पर्याय उपलब्ध होते यांचा नक्कीच विचार करायला हवा. सरसकट कुणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे अयोग्य आहे (समाप्त).

‘गांधी – नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?’ या नावाने ‘लय भारी’ने नुकताच एक विशेषांक प्रसिद्ध केला आहे. या अंकात राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रातील ४५ पेक्षा जास्त नामवंत मान्यवरांनी लेख लिहिले आहेत. यांत शरद पवार, राजदीप सरदेसाई, भाऊ तोरसेकर, श्रीराम पवार, यशवंतराव गडाख, तुषार गांधी, राजू परूळेकर, प्रा. एन. जी. राजूरकर, कुमार सप्तर्षी, अशोक चौसाळकर, संजय आवटे, श्रीमंत माने, राजेंद्र साठे, अतुल भातखळकर, माधव भांडारी, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार, सत्यजित तांबे, चंद्रकांत दळवी, प्रभाकर देशमुख, प्रसाद काथे, बंधुराज लोणे, प्रमोद चुंचूवार, रफिक मुल्ला, प्रफुल्ल फडके, राजन वेळूकर, नाना पटोले, उल्हास पवार, , विश्वास काश्यप, राज कुलकर्णी, राजेश खरात आदींचा समावेश आहे. या अंकातील निवडक लेख आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. हा विशेषांक खरेदी करण्यासाठी संपादक श्री. तुषार खरात यांच्याशी ९८२१२८८६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

(राजदीप सरदेसाई हे राष्ट्रीय पातळीवरील आघाडीचे पत्रकार आहेत आणि इंडिया टूडे वृत्तवाहिनीचे सल्लागार संपादक आहेत.)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी