27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeसंपादकीयतिबेटची हत्या होत असताना पंडित नेहरूंचा चीनसोबत दोस्ताना ! (माधव भांडारी यांचा...

तिबेटची हत्या होत असताना पंडित नेहरूंचा चीनसोबत दोस्ताना ! (माधव भांडारी यांचा लेख – भाग ५)

आपल्या डोळ्यांसमोर झालेली तिबेटची हत्या ताजी असतानाच पं. नेहरूंनी चीनबरोबर २९ एप्रिल १९५४ रोजी ‘पंचशील करार’ केला. पण चीनबरोबर हा करार करत असताना व केल्यानंतरही आपल्या आसपास घडत असलेल्या अनेक महत्त्वाच्या घटनांकडे, चीनने चालवलेल्या आक्रमक व खोडसाळ कारवायांकडे आपले सरकार पूर्ण दुर्लक्ष करत होते. पं. नेहरूंच्या ह्या भूमिकेमागचे कारण काय होते?... माधव भांडारी यांचा विशेष लेख.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनी आपल्या भाषणात चीनच्या विस्तारवादी भूमिकेची तपशिलाने चर्चा केली व ‘आसाम, लेह, लडाखसह ईशान्य भारतातील भूप्रदेश आपलाच असल्याचा दावा चीन करीत आहे’ ह्या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. ‘चीनमधील सध्याच्या कम्युनिस्ट सरकारला संयुक्त राष्ट्रसंघात मान्यता मिळवून देण्या साठी भारताने काय कामगिरी बजावली त्याचे सविस्तर वर्णन पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केले. माझा प्रश्न हा आहे की, आपल्या सरकारने केलेल्या ह्या मदतीची परतफेड चीनने कोणत्या पद्धतीने केली?’ असा थेट प्रश्न डॉ. मुखर्जी यांनी विचारला होता. त्याचबरोबर ‘चीनबाबत आपण इतकी नरमाईची भूमिका का घेत आहोत?’ हा सर्वात कळीचा प्रश्नही डॉ. मुखर्जींनी विचारला होता. डॉ. मुखर्जी यांनी त्याच भाषणात आपल्या सीमांचा मुद्दादेखील उपस्थित केला. ते म्हणाले होते, ‘These are the matters which affect not only the people of Tibet but also the security of India. It is a fact that the boundary between India and Tibet is yet to be definitely defined. The Prime Minister said the other day that we stand by McMahon line but the maps of Chine which are in circulation even now include portions of Assam, Ladakh, Leh and territories in which India is vitally interested.’ ह्या सीमांच्या बाबतीत आपली काय भूमिका आहे, हा प्रश्नही डॉ. मुखर्जींनी विचारला होता. पण, प्रा. रंगा व डॉ. मुखर्जी यांच्या कोणत्याही प्रश्नाला आपल्या भाषणातून उत्तर देण्याचे कष्ट पं. नेहरूंनी घेतले नाहीत.

Pandit Nehru ignored to tibet made friendship with China
आचार्य कृपलानींनी सुद्धा हे सर्व प्रश्न उपस्थित केले. चीनला संयुक्त राष्ट्र संघात प्रवेश मिळवून देण्यासाठी भारताने जे प्रयत्न केले त्याचे अत्यंत विस्तृत वर्णन पं. नेहरूंनी आपल्या भाषणात केले होते. त्याचा संदर्भ देत आचार्य कृपलानींनी सुद्धा ‘संयुक्त राष्ट्र संघात चीनला मदत करून आपण अपरिपक्व राजकारण केले आहे’ असा थेट आक्षेप नोंदवला होता. ‘तिबेट व नेपाळ हे एकमेकांशी जोडलेले मुद्दे आहेत. आज जे तिबेटमध्ये घडत आहे ते उद्या नेपाळमध्ये सुद्धा होण्याचा धोका आहे, तिथेही चीनची पिपल्स लिबरेशन आर्मी घुसलेली दिसेल’ हेही आचार्य कृपलानींनी स्पष्ट केले होते. त्यांच्या ह्या मुद्द्यांना देखील पं. नेहरूंनी कोणतेही उत्तर दिले नाही.
त्याच वर्षी ९ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे बोलताना तेव्हाचे उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल तिबेटवरील चीनच्या आक्रमणाचा संदर्भ देऊन म्हणाले होते, “परंपरेने शातंताप्रिय असलेल्या तिबेटी जनतेवर शस्त्रांचा वापर करणे कोणत्याच अर्थाने समर्थनीय ठरत नाही. तिबेटइतके शांतताप्रिय राष्ट्र जगात दुसरे कोणतेही नसेल. त्यांच्याशी चर्चा करून चीन सरकारने, शांततेने हा प्रश्न सोडवावा, हा भारताचा सल्ला चीनने मानला नाही. त्यांनी त्यांचे सैन्य तिबेटमध्ये घुसवले आणि त्या ठिकाणी परकीय शक्ती चीनविरुद्ध कारवाया करीत आहेत असे सांगून आपल्या कृत्याचे समर्थन केले. त्यांच्या ह्या दाव्याला काहीही आधार नव्हता.”

हे सुद्धा वाचा

महात्मा गांधी यांनी देशातील पहिली राज्यघटना लिहिली होती (वरिष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांचा विशेष लेख)

महात्मा गांधी यांच्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली होती (भाग -२ )

सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते सरदार पटेल,महात्मा गांधी यांच्या पत्रव्यवहारावरील ग्रंथ प्रकाशित

गांधी – नेहरू यांच्यामुळे देशाचे भलेच झाले – उत्तरार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)
संसदेतील ह्या चर्चेपूर्वी १४ नोव्हें. १९५० रोजी, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेसमोर बोलताना राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद म्हणाले होते, “आपल्या शेजारी असलेले महान राष्ट्र चीनसोबत माझे सरकार कायम मैत्रीचे धोरण बाळगून आहे. पण, शांती व अहिंसेचा मार्ग स्वीकारून जगणाऱ्या तिबेटवर चीनने हिंसक सैनिकी आक्रमण करणे ही आमच्या दृष्टीने अत्यंत खेदाची घटना आहे. शांततामय चर्चेचा मार्ग उपलब्ध असताना चीनने असे वागणे हे अधिक क्लेशदायक आहे. तिबेट हा भारताचा केवळ शेजारी देश नाही. आपल्याबरोबर त्यांचे अनेक शतकांचे सांस्कृतिक व अन्य संबंध आहेत. त्यामुळे तेथे घडत असलेल्या ह्या घटनांबाबत भारताला स्वाभावीक चिंता आहे. काही झाले तरी तिबेटची स्वायत्तता अबाधित राहील अशी आशा आम्ही बाळगत आहोत.”

Pandit Nehru ignored to tibet made friendship with China
ह्या सगळ्या संदर्भांवरून एक मुद्दा स्पष्ट होतो की, चीनच्या विस्तारवादी कारवायांची पं. नेहरू व त्यांच्या सरकारला १९५० सालच्या आधीपासून पूर्ण माहिती होती. चीनच्या या कारवाया पुढे जाऊन आपल्यासाठी धोकादायक ठरणार आहेत, हेही सरकारला माहिती होते. देशाचे तेव्हाचे राष्ट्रपती, उपपंतप्रधान ते विरोधी पक्षातले जबाबदार नेते सर्व जण एका सुरात ह्याबाबतीत बोलत होते व आपल्या सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करीत होते. पण पं. नेहरू कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. दुसऱ्या बाजूला आपला आक्रमक पवित्रा अधिक उग्र करत चीनने भारतीय संसदेतील चर्चेलाच आक्षेप घेतला होता. ‘भारताच्या संसदेत तिबेटबद्दल होत असलेली चर्चा आमच्या अंतर्गत कारभारात थेट ढवळाढवळ आहे, आमच्या सार्वभौमत्वाला हे आव्हान आहे’ अशी भाषा चीन वापरत होता. ‘चीनचे भारताबरोबरचे वागणे व बोलणे कोणत्याही अर्थाने मित्रत्वाची भावना राखणाऱ्या देशाचे वागणे नव्हते,’ हे सरदार पटेलांचे बोल सतत खरे ठरत होते.
चीनने तिबेटवर केलेल्या या आक्रमणाच्या संदर्भात ७ नोव्हेंबर १९५१ रोजी लखनौ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “India has failed to develop a strong foreign policy. Tibet has been garrisoned by China; it will have long-term threat to India.” तिबेट हे स्वतंत्र राष्ट्र असून ते स्वतंत्रच राहिले पाहिजे अशी भूमिका त्यांनी सातत्याने मांडली होती. पं. नेहरूंबरोबर मंत्रिमंडळात असताना सुद्धा त्यांनी ही भूमिका मांडली होती व नंतरही त्याच भूमिकेचा त्यांनी पाठपुरावा केला. पण, डॉ. आंबेडकरांनी तिबेट व कम्युनिस्ट चीनबद्दल मांडलेल्या मुद्द्यांची पं. नेहरूंनी नेहेमीच उपेक्षा केली.

Pandit Nehru ignored to tibet made friendship with China
आपल्या डोळ्यांसमोर झालेली तिबेटची हत्या ताजी असतानाच पं. नेहरूंनी चीनबरोबर २९ एप्रिल १९५४ रोजी ‘पंचशील करार’ केला. पण चीनबरोबर हा करार करत असताना व केल्यानंतरही आपल्या आसपास घडत असलेल्या अनेक महत्त्वाच्या घटनांकडे, चीनने चालवलेल्या आक्रमक व खोडसाळ कारवायांकडे आपले सरकार पूर्ण दुर्लक्ष करत होते. पं. नेहरूंच्या ह्या भूमिकेमागचे कारण काय होते? त्या प्रश्नाचे उत्तर कधीच मिळाले नाही. चीनच्या व्यवहाराच्या आधारावर आपल्या समजुती किंवा धारणा तपासून घ्यायला व त्यात देशहिताच्या दृष्टीने आवश्यक बदल करायला नेहरू कधीच तयार नव्हते. चीनबद्दल नेहरूंचे हे धोरण १९६२ मध्ये चीनने प्रत्यक्ष आक्रमण करेपर्यंत कायम राहिले होते. नेहरूंच्या ह्या हटवादी भूमिकेची फार मोठी किंमत भारताला मोजावी लागली, अजूनही मोजत आहोत. (क्रमश:)

(लेखक भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत)

‘गांधी – नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?’ या नावाने ‘लय भारी’ने नुकताच एक विशेषांक प्रसिद्ध केला आहे. या अंकात राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रातील ४५ पेक्षा जास्त नामवंत मान्यवरांनी लेख लिहिले आहेत. यांत शरद पवार, राजदीप सरदेसाई, भाऊ तोरसेकर, श्रीराम पवार, यशवंतराव गडाख, तुषार गांधी, राजू परूळेकर, प्रा. एन. जी. राजूरकर, कुमार सप्तर्षी, अशोक चौसाळकर, संजय आवटे, श्रीमंत माने, राजेंद्र साठे, अतुल भातखळकर, माधव भांडारी, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार, सत्यजित तांबे, चंद्रकांत दळवी, प्रभाकर देशमुख, प्रसाद काथे, बंधुराज लोणे, प्रमोद चुंचूवार, रफिक मुल्ला, प्रफुल्ल फडके, राजन वेळूकर, नाना पटोले, उल्हास पवार, , विश्वास काश्यप, राज कुलकर्णी, राजेश खरात आदींचा समावेश आहे. या अंकातील निवडक लेख आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. हा विशेषांक खरेदी करण्यासाठी संपादक श्री. तुषार खरात यांच्याशी ९८२१२८८६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी