27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeसंपादकीयपंडित नेहरूंना सरदार वल्लभभाई पटेल यांनी चिनी आक्रमणापासून सावध केले होते (माधव...

पंडित नेहरूंना सरदार वल्लभभाई पटेल यांनी चिनी आक्रमणापासून सावध केले होते (माधव भांडारी यांचा लेख – भाग ४)

भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल ह्यांनी ३ नोव्हेंबर व ७ नोव्हेंबर १९५० रोजी पं. नेहरू ह्यांना दोन पत्रे लिहिली होती. ‘चीन सैनिकी कारवाई करून तिबेटवर जबरदस्तीने कब्जा करू पाहात आहे’ ही माहिती देऊन त्यानंतर ‘भारताला सुद्धा चीनच्या सैनिकी आक्रमणाचा धोका निर्माण होईल’ अशी आशंका सरदार पटेल ह्यांनी त्या पत्रांमध्ये व्यक्त केली होती... माधव भांडारी यांचा लेख

भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल ह्यांनी ३ नोव्हेंबर व ७ नोव्हेंबर १९५० रोजी पं. नेहरू ह्यांना दोन पत्रे लिहिली होती. ‘चीन सैनिकी कारवाई करून तिबेटवर जबरदस्तीने कब्जा करू पाहात आहे’ ही माहिती देऊन त्यानंतर ‘भारताला सुद्धा चीनच्या सैनिकी आक्रमणाचा धोका निर्माण होईल’ अशी आशंका सरदार पटेल ह्यांनी त्या पत्रांमध्ये व्यक्त केली होती. सरदार पटेल ह्यांनी ७ नोव्हेंबर १९५० रोजी नेहरूंना लिहिलेल्या विस्तृत पत्रामध्ये तिबेट व चीन ह्या विषयावरील आपल्याला वाटणारी चिंता अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये नोंदवली होती. त्या पत्रात सरदार पटेलांनी लिहिले होते, ‘Their last telegram to us is an act of gross discourtesy not only in the summary way it disposes of our protest against the entry of Chinese forces into Tibet but also in the wild insinuation that our attitude is determined by foreign influences. It looks as though it is not a friend speaking in that language but a potential enemy’ (ठळकपणा माझा). त्याच पत्रात ‘कम्युनिस्ट चीनला संयुक्त राष्ट्र संघात प्रवेश मिळवून देण्यासाठी आपण जे प्रयत्न करीत आहोत त्यांचा फेरविचार करणे आवश्यक आहे,’ असेही सरदार पटेलांनी पं.नेहरूंना सुचवले होते.

Sardar Vallabbhai Patel written letter to Pandit Nehru
त्यांच्या ह्या दोन्ही पत्रांना पं. नेहरूंनी पंधरा दिवसांनी उत्तर दिले. १८ नोव्हेंबर १९५० रोजी सरदार पटेल ह्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले होते की, ‘तिबेटबद्दलची तुमची माहिती चुकीची आहे व चीनकडून भारतावर भविष्यकाळात आक्रमण होण्याची काहीही शक्यता नाही.’ पं. नेहरू जेव्हा हे पत्र सरदार पटेलांना लिहीत होते तेव्हा चीनने तिबेट गिळंकृत केला होता व पं. नेहरूंना त्याची पूर्ण माहिती होती. तरीही ते सरदार पटेलांना सुद्धा अक्षरश: खोटी माहिती देत होते. पंतप्रधान नेहरूंच्या ह्या पत्रानंतर अवघ्या तीन आठवड्यांनी तिबेटबद्दल आपल्या संसदेत – त्यावेळच्या संविधान सभेत झालेल्या चर्चेचा काही भाग मी पुढे देत आहे. त्या चर्चेत ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे.
चीनने तिबेटवर केलेले आक्रमण आपल्याला माहीत होते ह्याची कबुलीच पं. नेहरूंनी त्या चर्चेत दिली होती. या लेखाच्या सुरुवातीला मी पं. नेहरूंनी १९४९ सालात देशातील मुख्यमंत्र्यांना व केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या काही पत्रांचा संदर्भ दिला आहे. ‘चीन तिबेटवर लवकरच कब्जा करेल’ अशी शक्यता त्या पत्रांमध्ये त्यांनी नि:संदिग्धपणे व्यक्त केली होती. म्हणजे चीनच्या आक्रमक कारवायांबाबत पं. नेहरू कधीही अनभिज्ञ नव्हते हे त्यांच्याच पत्रांवरून स्पष्ट दिसते. त्यामुळे हा सर्व घटनाक्रम बघताना नेहमीच हा प्रश्न पडतो की, पं. नेहरू असे का वागत होते? सरदार पटेलांसह कोणाचाही सल्ला न ऐकण्याची नेहरूंची मन:स्थिती कशामुळे तयार झाली होती? त्या मागील नेमकी कारणे काय होती, ह्या प्रश्नांची उत्तरे तेव्हा मिळाली नाहीत, आता तर ती मिळणे अशक्य आहे.

हे सुद्धा वाचा

गांधी – नेहरू यांच्यामुळे देशाचे भलेच झाले – उत्तरार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)

महात्मा गांधी आणि केशव हेडगेवार यांच्यातील नातेसंबंध (प्रफुल्ल फडके यांचा लेख – भाग २)

विश्वगुरू होण्यासाठी गांधी-नेहरूंची बदनामी – पूर्वार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)
भारताच्या संसदेत, तेव्हाच्या संविधान सभेत, ६ डिसेंबर १९५० रोजी पहिल्यांदा तिबेटवर चर्चा झाली. त्यावेळेला तिबेटवरील चीनची सैनिकी कारवाई पूर्ण झाली होती आणि तिबेटचे सरकार व चीन ह्यांच्यामध्ये ‘शांततेची बोलणी’ सुरु झाली होती. आपल्या संविधान सभेतील ह्या चर्चेचा प्रारंभ व शेवटही पंतप्रधान नेहरूंनीच केला होता. ह्या चर्चेचा प्रारंभ करताना त्यांनी काही विलक्षण परस्परविरोधी विधाने केली होती. त्या वेळेला बोलताना पं. नेहरू म्हणाले होते की, “चीनच्या तिबेटवरील सार्वभौम हक्काबद्दल आमचा काही आक्षेप नाही हे आम्ही त्यांना, चीनला कळवले आहे. पण तिबेटच्या स्वायत्ततेचा सन्मान राखला गेला पाहिजे, असा आमचा आग्रह आहे.” एखाद्या प्रदेशावर दुसऱ्या देशाचा सार्वभौम हक्क आहे, हे एकदा मान्य केल्यानंतर त्या प्रदेशाची ‘स्वायत्तता’ कशी शिल्लक रहाते, हा प्रश्न पं. नेहरूंना त्यावेळी पडला नाही. पण इतरांना तो पडला आणि अनेक सदस्यांनी तो प्रश्न विचारला. Suzerainty and Sovereignty ह्या शब्दांचा खेळ करून नेहरूंनी त्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर द्यायचे टाळले. ह्या दोन शब्दांचा वापर पं. नेहरू ज्या पद्धतीने करत होते त्याला समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. ‘चीनने तिबेटवर केलेले आक्रमण म्हणजे भ्रूणहत्या आहे’ असे म्हणणारे डॉ. लोहिया sovereignty and suzerainty ह्या शब्दांच्या खेळाला ‘silly but fatal distinction’ म्हणाले होते.
‘आम्ही तिबेटला स्वतंत्र करत आहोत’ असा दावा चीनने केला होता. त्याचा उल्लेख करून नेहरू म्हणाले होते, “चीनने आम्हाला आश्वासन दिले आहे की आम्ही तिबेटचा प्रश्न शांततेने सोडवू. पण आम्ही तिबेट स्वतंत्र करणार आहोत, हे त्यांचे म्हणणे कायम आहे. ते तिबेटला कोणाच्या ताब्यातून मुक्त करणार आहेत, हे मात्र आम्हाला कळत नाही…” ‘(In their replies, they always said that they would very much like to settle the question peacefully but that they were, in any event, going to liberate Tibet. From whom they are going to liberate Tibet is, however, not quite clear…)’ संसदेतील त्या भाषणात नेहरूंचा संभ्रम वाक्यावाक्यातून स्पष्ट होत होता. ‘तिबेटने काहीही आगळीक केलेली नसताना चीन आक्रमण करीत आहे,’ असेही ते ह्या भाषणात म्हणाले होते.
वास्तविक, चीन सरळ सरळ भारताला ‘आक्रमक’ ‘साम्राज्यवादी’ म्हणत होता, ‘भारताने तिबेटवर बेकायदेशीर कब्जा केला असून भारताच्या बेकायदेशीर पकडीतून आपण तिबेटला स्वतंत्र करत आहोत’ असा कमालीचा उफराटा व उर्मट दावा चीन साळसूदपणाने करत होता. पण चीनचे खोटे दावे, त्यांनी आपल्यावर केलेले आरोप खोडून काढण्याची गरज असतानाही पं. नेहरूंनी अथवा भारत सरकारने ते काम केले नाही. पं. नेहरूंचे हे वागणे तेव्हाही सगळ्यांच्या दृष्टीने कोडे होते, आज तर ते कोडे अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.

Sardar Vallabbhai Patel written letter to Pandit Nehru
Mrs. Nixon with Premier Chou En-lai at the State Dinner at the Great Hall of the People

संसदेतील त्या चर्चेत प्रा. एन. जी. रंगा, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, आचार्य कृपलानी, मिनू मसानी, एम. ए. अय्यंगार, फ्रँक अँथनी, जोआकिम अल्वा आणि ब्रजेश्वर प्रसाद ह्या सदस्यांनी भाग घेतला होता. त्यापैकी ब्रजेश्वर प्रसाद हे एकमेव काँग्रेस सदस्य असे होते की ज्यांनी चीनचे समर्थन केले होते. एम. ए. अय्यंगार, फ्रँक अँथनी, जोआकिम अल्वा हे सगळे काँग्रेसच्या बाकांवरून बोलले तरी त्यांनी चीनच्या कारवाया भारतासाठी घातक आहेत असेच प्रतिपादन केले होते. प्रा. रंगा, मिनू मसानी, डॉ. मुखर्जी, आचार्य कृपलानी हे सर्व विरोधी बाकांवरचे सदस्य होते. त्यांनी तर अत्यंत कठोर शब्दात टीका करून अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
प्रा. रंगा ह्यांनी आपल्या भाषणात एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. ते म्हणाले, “चीनने हे अनेक वेळा सूचित केले आहे की, ‘भारत ही बाह्य ताकद तिबेटमध्ये आहे, त्यांच्यापासून तिबेट मुक्त करण्याची भाषा वापरली जात आहे, ह्याबद्दल आपली काय भूमिका आहे? चीनचे आजचे नेतृत्व विस्तारवादी आहे व शेजारच्या शांतताप्रिय राष्ट्रावर बळजबरीने कब्जा करण्याचा उद्योग ते करीत आहेत. त्यांच्यापासून, चीनपासून आपल्या देशाच्या सीमांना धोका आहे. आपल्या संरक्षणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत हे आपण लक्षात घेत आहोत का?” चीनने आपल्यावर केलेल्या आरोपाला आपण काय उत्तर देत आहोत, हाच प्रा. रंगा यांचा प्रश्न होता. त्याखेरीज, ‘जो चीन कोणत्याही अर्थाने आपल्यासोबत मित्रत्वाने वागत नाही त्या चीनला आपण मित्र का मानत आहोत?’ हा त्यांचा दुसरा प्रश्न होता. त्यांच्या एकाही प्रश्नाला पं. नेहरूंनी उत्तर दिले नव्हते.

‘गांधी – नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?’ या नावाने ‘लय भारी’ने नुकताच एक विशेषांक प्रसिद्ध केला आहे. या अंकात राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रातील ४५ पेक्षा जास्त नामवंत मान्यवरांनी लेख लिहिले आहेत. यांत शरद पवार, राजदीप सरदेसाई, भाऊ तोरसेकर, श्रीराम पवार, यशवंतराव गडाख, तुषार गांधी, राजू परूळेकर, प्रा. एन. जी. राजूरकर, कुमार सप्तर्षी, अशोक चौसाळकर, संजय आवटे, श्रीमंत माने, राजेंद्र साठे, अतुल भातखळकर, माधव भांडारी, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार, सत्यजित तांबे, चंद्रकांत दळवी, प्रभाकर देशमुख, प्रसाद काथे, बंधुराज लोणे, प्रमोद चुंचूवार, रफिक मुल्ला, प्रफुल्ल फडके, राजन वेळूकर, नाना पटोले, उल्हास पवार, , विश्वास काश्यप, राज कुलकर्णी, राजेश खरात आदींचा समावेश आहे. या अंकातील निवडक लेख आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. हा विशेषांक खरेदी करण्यासाठी संपादक श्री. तुषार खरात यांच्याशी ९८२१२८८६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी