33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeसंपादकीयपंडित नेहरूंनी चुकींच्या लोकांवर भरवसा ठेवला, अन् देशाचे नुकसान झाले ( माधव...

पंडित नेहरूंनी चुकींच्या लोकांवर भरवसा ठेवला, अन् देशाचे नुकसान झाले ( माधव भांडारी यांचा लेख – भाग ३)

पं. नेहरू ज्यांच्या सल्ल्याने चालत होते ते दोघेही - व्ही. के. कृष्ण मेनन आणि के. एम. पणिक्कर - कट्टर कम्युनिस्ट होते. पणिक्कर नावापुरते भारताचे राजदूत होते, प्रत्यक्षात मात्र ते चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे प्रवक्ते असल्यासारखे वागत बोलत असत. पणिक्कर यांच्या ह्या भूमिकेमुळेच सरदार पटेलांनी त्यांच्याबद्दल कडवट शब्दात नाराजी व्यक्त केली होती... माधव भांडारी यांचा लेख.

पं. नेहरूंच्या ह्या भूमिकेमुळे तिबेटमध्ये चिनी सेना घुसली तेव्हा भारताच्या राजनैतिक वर्तुळात त्याबद्दल पूर्ण अनास्था होती. भारताचे चीनमधील त्यावेळचे राजदूत के. एम. पणिक्कर तर असा दावा करत होते की, ‘तिबेटमध्ये चिनी लष्करी तुकड्या घुसल्या आहेत, ह्या बातमीला दुजोरा मिळत नाही.’ ज्यावेळेला भारताचे राजदूत या नात्याने बीजिंगमध्ये बसून पणिक्कर ही खोटी माहिती देत होते, त्यावेळेला चीनने आपल्या लष्करी कारवाईची अधिकृत घोषणा केलेली होती. पुढे जाऊन पणिक्कर ह्यांचे असेही म्हणणे होते की, “चीनने तिबेटवर केलेल्या आक्रमणाचा भारताने ह्यावेळेला निषेध केला तर चीनला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व मिळावे ह्यासाठी भारत जे प्रयत्न करीत आहे त्यांना बाधा पोचेल.” चीनला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारे पं. नेहरू आणि पणिक्करसारखे त्यांचे सहकारी भारताला हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व मिळावे ह्यासाठी काय प्रकारचे प्रयत्न करीत होते ते दाखवणारी नोंद मात्र कोणत्याही कागदपत्रांमध्ये सापडत नाही.

pandit nehru krishna menon pannikar

चीनमधील भारताच्या राजदूतांना भारताच्या हितसंबंधांची काहीही चिंता नव्हती, त्यांना फक्त चीनच्या भल्याची चिंता होती. अर्थात, त्यात विशेष आश्चर्य वाटण्यासारखे काही नव्हते. कारण, पणिक्कर हे भारताचे राजदूत म्हणून वावरत असले तरी कडवे कम्युनिस्ट होते. भारतातील कम्युनिस्टांना भारतापेक्षा रशिया व चीनबद्दल अधिक आत्मीयता होती. खऱ्या अर्थाने आश्चर्याचा भाग म्हणजे पं. नेहरू तिबेट व चीनशी संबंधित सर्वच विषयांत पणिक्करबरोबर सहमत होते. तिबेटवर चीनने केलेल्या आक्रमणाबद्दल आपण ठोस भूमिका घेतली तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चीनची कोंडी होईल असे मानणारे पं. नेहरू तिबेटबद्दल सांगत होते की, “जागतिक शांतता ही आपली जबाबदारी आहे. कोरियामध्ये सध्या जे सुरू आहे त्यामुळे चीन आधीच अडचणीत आला आहे. भारताने जर तिबेटमध्ये काही आक्रमक पावले उचलली तर त्यांच्या अडचणीत आणखी भर पडेल.” वास्तविक चीनने कोरियामध्ये केलेला हस्तक्षेप हे सरळ सरळ कोरियावर केलेले आक्रमण होते. कोरियातील यादवी हा कोरियाचा अंतर्गत विषय असताना केवळ विस्तारवादी आकांक्षेतून चीन कोरियात लष्करी कारवाई करत होता. ‘कोरियातील पेचप्रसंगामध्ये मध्यस्थी करा’ असे आपल्याला कोणीही, खुद्द कोरियाने अथवा चीनने सुद्धा सांगितले नव्हते. आपणच परभारे उठून तिकडे ढवळाढवळ करत होतो. भारताच्या पंतप्रधानपदावर बसलेल्या व्यक्तीला भारताच्या सीमांच्या संरक्षणापेक्षा चीनच्या हितसंबंधांचे रक्षण अधिक महत्त्वाचे वाटत होते! कोणत्याही देशाचे दुर्भाग्य ह्यापेक्षा वेगळे असू शकत नाही.

pandit nehru krishna menon pannikar
ह्या सगळ्या काळात पं. नेहरू ज्यांच्या सल्ल्याने चालत होते ते दोघेही – व्ही. के. कृष्ण मेनन आणि के. एम. पणिक्कर – कट्टर कम्युनिस्ट होते. पणिक्कर नावापुरते भारताचे राजदूत होते, प्रत्यक्षात मात्र ते चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे प्रवक्ते असल्यासारखे वागत बोलत असत.

हे सुद्धा वाचा

महात्मा गांधी यांनी देशातील पहिली राज्यघटना लिहिली होती (वरिष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांचा विशेष लेख)

सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते सरदार पटेल,महात्मा गांधी यांच्या पत्रव्यवहारावरील ग्रंथ प्रकाशित

शरद पवारांनी सांगितले, गांधी – नेहरू यांचे महात्म्य

पणिक्कर यांच्या ह्या भूमिकेमुळेच सरदार पटेलांनी त्यांच्याबद्दल कडवट शब्दात नाराजी व्यक्त केली होती. पणिक्कर ह्यांच्या ह्या वर्तणुकीवर टीका करताना ते म्हणाले होते, “Panikkar has been at great pains to find an explanation or justification for Chinese policy and actions.” सरदार पटेल ह्यांनी कम्युनिस्ट चीनबद्दल देखील पं. नेहरूंना एका पत्राद्वारे स्पष्ट सुनावले होते की, “आपण जरी स्वत:ला चीनचे मित्र म्हणवत असलो तरी चीन तसे मानत नाही.” विशेष म्हणजे मौ. अबुल कलाम आझाद ह्यांनीसुद्धा नेहरूंना इशारा दिला होता की, “कृष्ण मेनन, पणिक्कर कम्युनिस्ट आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही.” पण चीन, मेनन किंवा पणिक्कर ह्यांच्या बाबतीत कोणाचेही काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नेहरू नव्हते.

pandit nehru krishna menon pannikar
वास्तविक, “तिबेट हा आमच्या हाताचा तळवा असून लडाख, नेपाळ, सिक्कीम, भूतान व आसाम त्या तळव्याची पाच बोटे आहेत. हे पाचही प्रदेश भारताच्या गुलामगिरीतून मुक्त करणे हे आपले ध्येय आहे,” असे माओने १९४९ साली कम्युनिस्ट राजवटीच्या स्थापनेची घोषणा करताना केलेल्या भाषणात म्हटले होते. लडाख, आसाम हे भारताचे भाग नसून भारताने आक्रमण करून त्यांचा ताबा घेतला आहे असा आरोप माओ १९५० सालापासून आपल्यावर सतत करत होता. त्याने केलेल्या ह्या जाहीर आरोपाला आपल्याकडून वेळच्या वेळी आक्षेप घेतला गेला नाही किंवा ठोस उत्तरही दिले गेले नाही. माओच्या ह्या विधानामागील साम्राज्यविस्ताराची भूकही आपण कधी लक्षात घेतली नाही. केवळ तिबेटच नाही तर सिक्कीम, भूतान, नेपाळसह संपूर्ण ईशान्य भारत कब्जात घेणे हे कम्युनिस्ट चीनचे उद्दिष्ट आहे हे स्पष्ट दिसत असून व खुद्द चीनने १९५० सालीच ते जाहीर केलेले असूनही पं.नेहरूंच्या सरकारने त्याकडे डोळेझाक का केली, ह्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर कधीच मिळाले नाही.

pandit nehru krishna menon pannikar
तिबेटवर कब्जा केल्यानंतर चीनची वाकडी नजर आपल्याकडे वळेल हे आपल्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आले नव्हते का? तर चीनची पुढची पावले काय असतील याचा बऱ्यापैकी अंदाज त्यावेळच्या सरकारला व स्वत: पं. नेहरूंना आलेला होता हे आपण सुरुवातीलाच पाहिले आहे. कम्युनिस्ट चीनच्या संभाव्य वागणुकीचा असा अंदाज आलेला असूनही नेहरूंनी तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले? त्यावेळचे उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी ह्या मंत्रिमंडळातील प्रमुख सहकाऱ्यांसह देशाच्या विविध क्षेत्रांमधील अनेक जबाबदार व्यक्तींनी पं. नेहरूंना चीनच्या ह्या संभाव्य आक्रमणाच्या बाबतीत खूप आधीपासून सतत इशारे दिले होते. त्या इशाऱ्यांची पं. नेहरू तेवढ्याच सातत्याने उपेक्षा का करत होते, हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.
तिबेटमध्ये आपण सैनिकी कारवाई सुरू केली असल्याची अधिकृत घोषणा चीनने २५ ऑक्टोबर रोजी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. त्यावर भारताने २७ ऑक्टोबरला ‘आश्चर्य व खेद व्यक्त करणारी’ प्रतिक्रिया दिली. २८ ऑक्टोबरला तिबेट सरकारने चीनच्या लष्करी आक्रमणाविरुद्ध भारताकडे मदत मागितली. आपल्या वतीने संयुक्त राष्ट्र संघात मुद्दा उपस्थित करावा अशी विनंतीही त्यांनी भारताला केली.
२९ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नेहरूंनी श्रीनगर येथे एका ब्रिटिश वार्ताहराला दिलेल्या मुलाखतीत ह्या विषयावर सविस्तर भाष्य केले. “पूर्व तिबेटच्या काही भागांत चीनला पूर्वापार मिळालेले सैनिकी अधिकार प्रस्थापित करण्याच्या हेतूने चीनने हे आक्रमण केले असावे,” असा एक अंदाज त्यांनी या मुलाखतीत बोलून दाखवला. पं. नेहरूंचा दुसरा दावा असा होता की, “चँग कै शेकला पाठिंबा देऊन चीनमधील कम्युनिस्ट राजवट संपवण्याचा प्रयत्न अमेरिका करीत आहे, असे चिनी राज्यकर्त्यांना वाटत आहे. तीच अमेरिका तिबेटमध्येही हस्तक्षेप करील अशी भीती वाटत असल्यामुळे चीनने हे पाऊल उचलले असावे.” ‘आम्ही तिबेटला भारताच्या गुलामगिरीतून मुक्त करत आहोत’ या शब्दात चीन आपल्या तिबेटवरील आक्रमणाचे समर्थन करत होता आणि त्याचवेळेला भारताचे पंतप्रधान पं. नेहरू मात्र चीनची पाठराखण करत होते (क्रमश:)

(लेखक भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत)

‘गांधी – नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?’ या नावाने ‘लय भारी’ने नुकताच एक विशेषांक प्रसिद्ध केला आहे. या अंकात राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रातील ४५ पेक्षा जास्त नामवंत मान्यवरांनी लेख लिहिले आहेत. यांत शरद पवार, राजदीप सरदेसाई, भाऊ तोरसेकर, श्रीराम पवार, यशवंतराव गडाख, तुषार गांधी, राजू परूळेकर, प्रा. एन. जी. राजूरकर, कुमार सप्तर्षी, अशोक चौसाळकर, संजय आवटे, श्रीमंत माने, राजेंद्र साठे, अतुल भातखळकर, माधव भांडारी, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार, सत्यजित तांबे, चंद्रकांत दळवी, प्रभाकर देशमुख, प्रसाद काथे, बंधुराज लोणे, प्रमोद चुंचूवार, रफिक मुल्ला, प्रफुल्ल फडके, राजन वेळूकर, नाना पटोले, उल्हास पवार, , विश्वास काश्यप, राज कुलकर्णी, राजेश खरात आदींचा समावेश आहे. या अंकातील निवडक लेख आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. हा विशेषांक खरेदी करण्यासाठी संपादक श्री. तुषार खरात यांच्याशी ९८२१२८८६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी