29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeसंपादकीयपंडित नेहरूंना एका मराठी खासदाराने चीनबद्दल सावध केले होते (माधव भांडारी यांचा...

पंडित नेहरूंना एका मराठी खासदाराने चीनबद्दल सावध केले होते (माधव भांडारी यांचा लेख – भाग ८)

तिबेटचा विश्वासघात व आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चीनची अनाहूत पाठराखण ह्या दुहेरी चुकांच्या जोडीला चीनसंबंधीच्या सर्व विषयात पं. नेहरूंनी भारतीय जनतेची नेहमीच दिशाभूल केली. ‘तिबेटवरचे आक्रमण असो किंवा भारतावरील चढाई असो, चीनने नेहरूंचा विश्वासघात केला’ असे जे नेहमी सांगितले जाते ते मात्र बिलकुल खरे नाही... माधव भांडारी यांचा विशेष लेख.

तिबेटच्या संदर्भात पं. नेहरू व भारत सरकारने स्वीकारलेल्या एकूण धोरणांबद्दल त्या काळातील काँग्रेसचेच एक मराठी खासदार त्र्यं. र. देवगिरीकर ह्यांनी केलेले भाष्य खूप बोलके होते. हे देवगिरीकर महाराष्ट्रातील काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते होते व १९५० ते ६२ या काळात राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी लिहिले आहे की, ‘हिंदुस्तानने तिबेटच्या प्रश्नाबाबत स्वत:ला चीनच्या मायाजालात गुरफटून घेतले. तिबेटसारख्या गरीब व निरुपद्रवी देशाचा बळी जात असताना आपण त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. ब्रिटिशांचे आपण वारसदार आहोत असा पुकारा केला, जगातील लोकशाही देशांचे प्रेम संपादन केले नाही व हे सर्व करून चीनचे शत्रुत्व टळले नाही… स्वतंत्र हिंदुस्तानने चीनची मैत्री संपादन करण्याचा प्रयत्न केला यात चूक केली असे सिद्ध झाले असले तरी ती चूक दुरुस्त करण्यास पुष्कळ प्रसंग होते. तिबेटमधील अमानुष घटना पाहून तरी हिंदुस्तानने त्या मैत्रीचा त्याग करावयास पाहिजे होता व तिबेटची बाजू घ्यावयास पाहिजे होती.’ पं. नेहरू तिबेटबाबत इंग्रजांचेच धोरण पुढे चालवत होते असे स्पष्ट मत देवगिरीकर यांनी नोंदवून ठेवले आहे.

हे सुद्धा वाचा

पंडित नेहरूंच्या तुलनेत नरेंद्र मोदी सुमार दर्जाचे (भाग ४)

महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. आंबेडकर, वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्यात आपण भांडणे लावतो – भाग २ (राजदीप सरदेसाई यांचा विशेष लेख)

गांधी – नेहरू यांच्यामुळे देशाचे भलेच झाले – उत्तरार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)

विश्वगुरू होण्यासाठी गांधी-नेहरूंची बदनामी – पूर्वार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)
एकूणच नेहरूंनी तिबेट व चीनबाबत स्वीकारलेले धोरण वास्तवापासून फारकत घेतलेले व अव्यवहार्य, त्याचप्रमाणे भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या विरुद्ध होते. त्या धोरणामुळे भारताचे जे अपरिमित नुकसान झाले ते आपण अजूनही भोगतो आहोत. विशेष म्हणजे स्वत:च्या राष्ट्राच्या हिताचा बळी देऊन सतत चीनची बाजू घेणाऱ्या पं. नेहरूंबद्दल माओ व झौ ह्या दोघाही चिनी नेत्यांचे मत अत्यंत वाईट होते. त्यांनी ते अनेकदा व्यक्तही केले होते. त्याच्या अनेक अधिकृत नोंदी उपलब्ध आहेत.
ह्या सगळ्या कहाणीची आणखी एक बाजू आहे. तिबेटचा विश्वासघात व आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चीनची अनाहूत पाठराखण ह्या दुहेरी चुकांच्या जोडीला चीनसंबंधीच्या सर्व विषयात पं. नेहरूंनी भारतीय जनतेची नेहमीच दिशाभूल केली. ‘तिबेटवरचे आक्रमण असो किंवा भारतावरील चढाई असो, चीनने नेहरूंचा विश्वासघात केला’ असे जे नेहमी सांगितले जाते ते मात्र बिलकुल खरे नाही.
पं. नेहरू व त्यांचे संरक्षणमंत्री कृष्ण मेनन ह्या दोघांनाही चीनच्या कारवायांची, विशेषत: अक्साई चीन व लडाखमधील घुसखोरीची पूर्ण माहिती होती. अक्साई चीन, लडाखच्या काही भागांमध्ये चीन करत असलेल्या घुसखोरीची माहिती वेगवेगळ्या मार्गाने पं. नेहरुंना सुरुवातीपासून सतत मिळत होती. भारताचा गुप्तचर विभागसुद्धा त्याबद्दलची माहिती सातत्याने देत होता. पण त्या माहितीकडे लक्ष देऊन त्यावर आवश्यक ती कारवाई करायला नेहरू कधीच तयार नव्हते.
तिबेटनंतर भारताच्या प्रदेशात चीन करत असलेल्या घुसखोरीकडे नेहरू दुर्लक्ष करत असले तरी चीनच्या घुसखोरीची माहिती भारतीय जनतेपर्यंत पोचू नये ह्याची काळजी मात्र ते कायम घेत असत. संसदेमध्ये ह्या संदर्भात विचारले गेलेले प्रश्न किंवा उपस्थित झालेल्या चर्चांमध्ये देखील ते कायम दिशाभूल करणारी माहिती देत गेले. चीन भारतावर आक्रमण करीत आहे हे सत्य भारतीय जनतेपासून लपवण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी कायम केला. चीन करत असलेल्या आक्रमक कारवायांची माहिती देऊन त्यांना तसेच देशातील जनतेला सावध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांना ‘वेडगळ व युद्धखोर’ (Lunatic and Warmongers) ठरवून मोडीत काढण्याचे काम मात्र पं. नेहरू न चुकता, न थकता करत होते. चीनला अशा पद्धतीने सांभाळून घेण्याची जबाबदारी नेहरूंनी स्वत:च्या अंगावर का घेतली होती आणि त्यासाठी निकराचे प्रयत्न करताना भारताच्या हितसंबंधांचा बळी जाऊ देण्याइतक्या टोकाला नेहरू का गेले होते, ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नाही.
चीनने भारताच्या भूभागात चालवलेल्या घुसखोरीची वस्तुस्थिती भारतीय लष्कराचे त्यावेळचे प्रमुख ज. थिमय्या ह्यांनी नेहरूंच्या निदर्शनाला ठोस पुराव्यांसह आणून दिली होती. तीसुद्धा चीनने प्रत्यक्ष आक्रमण करून युद्ध करण्यापूर्वी किमान सात वर्षे अगोदर! हे पुरावे मिळवण्यासाठी त्यांनी सिडनी विग्नाल (Sydney Wignall) नामक एका इंग्लिश गिर्यारोहकाची मदत घेतली होती. ह्या विग्नालने १९५५ साली नेपाळ व तिबेट ह्यांच्या सीमेवरील ‘गुर्ला मांधाता’ ह्या शिखरावर चढाई केली होती. ह्या मोहिमेच्या नियोजनाची माहिती मिळाल्याबरोबर थिमय्यांनी विग्नालबरोबर संधान साधले व त्या भागात चीनच्या नेमक्या काय हालचाली चालल्या आहेत याची माहिती जमा करून ती आपल्याला देण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवली. विग्नाल ह्यानेदेखील अक्षरश: जीवावर खेळून ती माहिती जमा केली. त्या नादात तो चिनी सैनिकांच्या ताब्यात सापडला. चिन्यांनी त्याला काही महिने कैदेत ठेवले व नंतर अत्यंत अवघड दुर्गम प्रदेशात, कडाक्याच्या थंडीत, अक्षरश: मरण्यासाठी सोडून दिले. केवळ दैव बलवत्तर म्हणून अनंत अडचणींना तोंड देत तो भारतात परत आला व त्याने आपला सर्व अहवाल, नकाशांसकट थिमय्यांना दिला. थिमय्यांनी तो अहवाल पं.नेहरूंसमोर ठेवला. त्यावेळेला कृष्ण मेननसुद्धा हजर होते.
सिडनी विग्नाल हे नाव ऐकताच थिमय्यांचे बोलणे अर्धवट तोडून ‘ही सर्व सी.आय.ए.च्या प्रचाराची खेळी आहे, हे ऐकत बसण्यात आपण वेळ घालवण्याचे कारण नाही,’ असे सांगून कृष्ण मेनन ह्यांनी ती बैठक उधळून टाकली. नेहरूंनी सुद्धा त्याला मान डोलावली. कृष्ण मेनन थेट चीनची अधिकृत भाषा वापरत होते. वास्तविक विग्नाल हा अमेरिकन नव्हता, ब्रिटिश होता. तो हौशी अथवा व्यावसायिक गुप्तहेर नव्हता. तो निखळ हौशी गिर्यारोहक होता. कोणत्याही देशाच्या कोणत्याही गुप्तचर यंत्रणेशी त्याचा अप्रत्यक्षसुद्धा काही संबंध नव्हता. मात्र, कम्युनिस्टांचे हिंसक विस्तारवादी राजकारण त्याला पूर्णत: अमान्य होते. त्या एका वैचारिक व भावनिक मुद्द्यामुळे त्याने भारतीय लष्कराला मदत करण्याच्या प्रामाणिक हेतूने ते जीवावर बेतलेले धाडस केले होते. पण कृष्ण मेनन ह्यांनी त्याला सीआयएचा हस्तक ठरवून त्याचा अत्यंत मोलाचा अहवाल कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिला. चीनच्या विरोधात येणारी माहिती अशा पद्धतीने दडपून टाकून चीनच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याचे काम तत्परतेने व निष्ठेने करणारी व्यक्ती भारताच्या संरक्षणमंत्रीपदावर बसलेली होती.

‘गांधी – नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?’ या नावाने ‘लय भारी’ने नुकताच एक विशेषांक प्रसिद्ध केला आहे. या अंकात राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रातील ४५ पेक्षा जास्त नामवंत मान्यवरांनी लेख लिहिले आहेत. यांत शरद पवार, राजदीप सरदेसाई, भाऊ तोरसेकर, श्रीराम पवार, यशवंतराव गडाख, तुषार गांधी, राजू परूळेकर, प्रा. एन. जी. राजूरकर, कुमार सप्तर्षी, अशोक चौसाळकर, संजय आवटे, श्रीमंत माने, राजेंद्र साठे, अतुल भातखळकर, माधव भांडारी, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार, सत्यजित तांबे, चंद्रकांत दळवी, प्रभाकर देशमुख, प्रसाद काथे, बंधुराज लोणे, प्रमोद चुंचूवार, रफिक मुल्ला, प्रफुल्ल फडके, राजन वेळूकर, नाना पटोले, उल्हास पवार, , विश्वास काश्यप, राज कुलकर्णी, राजेश खरात आदींचा समावेश आहे. या अंकातील निवडक लेख आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. हा विशेषांक खरेदी करण्यासाठी संपादक श्री. तुषार खरात यांच्याशी ९८२१२८८६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी