थिमय्यांच्या माहितीचा विग्नाल हा काही एकमात्र आधार नव्हता. असे सांगितले जाते की, एका भारतीय लष्करी अधिकाऱ्याला ह्या कामावर नेमून थिमय्यांनी पुष्कळ माहिती पूर्वीपासून जमा केली होती. अक्साई चीनमधील चीनची घुसखोरी, रस्त्याचे बांधकाम, सैनिकी चौक्या अशा अनेक गोष्टींची माहिती त्यांनी योजनाबद्ध प्रयत्न करून मिळवली होती. आपल्याला मिळालेल्या त्या माहितीची वेगळ्या मार्गाने अधिक खातरजमा करण्यासाठी त्यांनी विग्नालची मदत घेतली होती. पण त्या कर्तबगार व दूरदृष्टीच्या सेनापतीने कष्टाने जमा केलेल्या राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या माहितीकडे व त्या आधारे दिलेल्या इशाऱ्यांकडे नेहरूंनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
चीनच्या संदर्भात थिमय्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांचा पाणउतारा करण्याचा उद्योग कृष्ण मेनन ह्यांनी सतत केला व नेहरूंनी त्यांना कधीही रोखले नाही. केवळ थिमय्याच नाहीतर ज्या ज्या लष्करी अधिकाऱ्यांनी चीनबद्दल जागरूकता दाखवण्याचा आग्रह धरण्याचा प्रयत्न केला त्या त्या सर्व अधिकाऱ्यांना कृष्ण मेनन व त्यांच्या कह्यात गेलेले पं. नेहरू ह्या दोघांनीही अशीच अपमानास्पद वागणूक दिली. चीनच्या संदर्भातील सैनिकी धोरण अथवा व्यूहरचना ठरवण्याच्या कामापासून अशा अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवले. भारताच्या संरक्षणमंत्रीपदावर बसून कृष्ण मेनन रक्षण मात्र चीनच्या हितसंबंधांचे करत होते, चीनच्या आक्रमक कारवाया भारतीय जनतेपासून लपवून ठेवत होते, भारतीय लष्कराचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम सतत करत होते आणि पंतप्रधान नेहरू त्यांना पूर्ण मोकळीक देऊन त्यांची भक्कम पाठराखण करत होते.
ह्या सर्व घटना, पं. नेहरू व कृष्ण मेनन, पणिक्कर ह्यांचे वर्तन ही १९६२च्या भारत चीन युद्धाच्या संदर्भातली नाकारता येणार नाही अशी वस्तुस्थिती आहे. मात्र ते तसे का वागत होते हा त्या बाबतीतला खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. कृष्ण मेनन व पणिक्कर ह्यांच्या वर्तनाबद्दल किमान स्पष्टीकरण उपलब्ध आहे. ते दोघेही इंग्लंडमध्ये शिकत होते, तेव्हापासून सक्रिय कम्युनिस्ट होते, त्यांनी कधीही कम्युनिझमचा त्याग केला नव्हता. त्यांना भारतापेक्षा कम्युनिस्ट चीनबद्दल अधिक प्रेम होते, तेही त्यांनी कधी दडवून ठेवले नव्हते.
हे सुद्धा वाचा
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे लोकशाहीची पायाभरणी (भाग ३)
विश्वगुरू होण्यासाठी गांधी-नेहरूंची बदनामी – पूर्वार्ध (शरद पवार यांचा विशेष लेख)
पणिक्कर भारताचे चीनमधील राजदूत व कृष्ण मेनन भारताचे संरक्षणमंत्री म्हणून भारताच्या हिताची चिंता करत नव्हते. उलट भारताच्या हितसंबंधांचा बळी देऊन चीनला मदत होईल अशाच कारवाया करत होते, हे सगळ्या जगाला स्पष्ट दिसत होते. पण पं. नेहरू त्यांना आळा घालण्याचा काहीही प्रयत्न करत नव्हते. ह्या दोघांच्या आहारी ते इतके का गेले होते किंवा ह्या दोघांची नेहरूंवर इतकी पकड का होती, ह्या प्रश्नाचे उत्तर आजतागायत मिळालेले नाही. खरे तर स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अनेक रहस्यांपैकी हे एक फार मोठे रहस्य आहे.
चीनने आपल्यावर लादलेल्या १९६२च्या युद्धामुळे आपले अनेक प्रकारांनी नुकसान झाले. २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर असा एक महिना चाललेल्या त्या युद्धात आपले १३८३ सैनिक शहीद झाले, १०४७ जखमी झाले, १६९६ बेपत्ता झाले, त्यांचा कधीच शोध लागला नाही तर ४०० जवान युद्धकैदी म्हणून चीनने ताब्यात घेतले, अशी आकडे वारी काही पत्रकारांनी आपल्या लेखनात दिली आहे. विशेष म्हणजे १९६२च्या युद्धानंतर युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतलेल्या भारतीय जवानांच्या संख्येबाबत चिनी सूत्रांनी वेळोवेळी नेमकी हीच आकडेवारी दिलेली आहे. ‘ह्या सर्वाना अत्यंत प्रेमाची व जिव्हाळ्याची वागणूक देऊन १९६३ सालच्या उत्तरार्धात आम्ही त्यांना भारतात परत पाठवले,’ असा दावाही चीनची प्रचारयंत्रणा सातत्याने करत आलेली आहे.
भारत सरकारने संसदेत दिलेल्या अधिकृत आकडेवारीशी मात्र ही आकडेवारी जुळत नाही. सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार ‘आपले ६७६५ सैनिक जायबंदी झाले व ६००० सैनिक शत्रूच्या कैदेत सापडले होते.’ किती जवान शहीद अथवा बेपत्ता झाले ह्याचा आकडा सरकारने ह्या अहवालात दिला नव्हता. त्याच वेळेला, या युद्धात ७२२ चिनी सैनिक मारले गेले आणि १६९७ चिनी सैनिक जखमी झाले, असा आपला दावा होता. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकही चिनी सैनिक युद्धकैदी म्हणून आपल्या ताब्यात आला नव्हता किंवा आपण कोणालाही ताब्यात घेतले नव्हते. जगातील युद्धांच्या इतिहासातील ही एक अभूतपूर्व आणि अनोखी नोंद आहे. चीनच्या कैदेत सापडलेल्या जवानांना परत आणण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत आणि कैदेत सापडलेल्या अशा जवानांपैकी किती परत आले ह्याची माहितीसुद्धा त्यावेळच्या सरकारने संसदेला दिली नव्हती. ह्याचा अधिकृत आकडा अद्यापही उपलब्ध झालेला नाही (क्रमश:)
(लेखक भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत)
‘गांधी – नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?’ या नावाने ‘लय भारी’ने नुकताच एक विशेषांक प्रसिद्ध केला आहे. या अंकात राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रातील ४५ पेक्षा जास्त नामवंत मान्यवरांनी लेख लिहिले आहेत. यांत शरद पवार, राजदीप सरदेसाई, भाऊ तोरसेकर, श्रीराम पवार, यशवंतराव गडाख, तुषार गांधी, राजू परूळेकर, प्रा. एन. जी. राजूरकर, कुमार सप्तर्षी, अशोक चौसाळकर, संजय आवटे, श्रीमंत माने, राजेंद्र साठे, अतुल भातखळकर, माधव भांडारी, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार, सत्यजित तांबे, चंद्रकांत दळवी, प्रभाकर देशमुख, प्रसाद काथे, बंधुराज लोणे, प्रमोद चुंचूवार, रफिक मुल्ला, प्रफुल्ल फडके, राजन वेळूकर, नाना पटोले, उल्हास पवार, , विश्वास काश्यप, राज कुलकर्णी, राजेश खरात आदींचा समावेश आहे. या अंकातील निवडक लेख आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. हा विशेषांक खरेदी करण्यासाठी संपादक श्री. तुषार खरात यांच्याशी ९८२१२८८६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
ल